आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोची सेंच्युरी (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१२ च्या स्वातंत्र्यदिनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळावर यान पाठवण्याच्या मोहिमेची घोषणा केली होती व त्यानंतर केवळ सव्वा वर्षात अहोरात्र परिश्रम करत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारताचे पहिले मंगळयान पाठवले होते. भारतीय अवकाश संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी आजपर्यंत अवकाश संशोधनासोबत, देशाची दळणवळण यंत्रणा मजबूत करताना अनेक आव्हाने पार केली आहेत. वास्तविक इस्रो ही सरकारी संस्था आहे आणि अवकाश संशोधन हा तिचा खरा हेतू आहे. पण परिवर्तन अपरिहार्य असते आणि स्पर्धा हा नव्या युगाचा व्यावसायिक भाग झाला असल्याने काळाची पावले ओळखूनच इस्रोने कमीत कमी खर्चात अवकाशात उपग्रह पाठवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे व त्याचा उपयोग व्यावसायिक स्तरावर करण्यास सुरुवात केली आहे.
 
आता २०१७ साल सुरू असून येत्या १५ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे इस्रो एक-दोन नव्हे तर तब्बल १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करणार आहे. २०१४ मध्ये रशियाने एकाच रॉकेटवरून (पीएसएलव्ही) एकाच वेळी ३७ उपग्रह सोडले होते, हा विक्रम इस्रो मोडीत काढत असून १०१ परदेशी उपग्रह व ३ भारतीय बनावटीचे उपग्रह अवकाशात सोडणार आहे. इस्रोच्या रॉकेटचे हे उड्डाण यशस्वी झाल्यास भारत अवकाश संशोधन बाजारपेठेत एक महत्त्वाचा व सशक्त भागीदार बनेल आणि या बाजारपेठेत अवकाशात उपग्रह पाठवण्याबरोबर संशोधनातही त्याला उल्लेखनीय काम करण्याची संधी मिळेल. या संधीचा एक भाग म्हणजे इस्रोकडून शुक्र ग्रहावर यान पाठवण्याची घोषणा होणार आहे. मानवजातीचे शुक्राशी असलेले नाते रोमँटिक असे आहे. केवळ चंद्रच नव्हे तर शुक्र आणि मंगळाचे मर्म शोधण्याचा प्रयत्न कविमनापासून खगोलशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांचाच अाहे. ही अभिलाषा इस्रोनेही राखली असून मंगळापाठोपाठ शुक्राचेही अंतरंग जाणण्याची इच्छा इस्रोला आहे. 

महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात अंतराळ संशोधन खात्यासाठी सुमारे २३ टक्के अधिक खर्चाची तरतूद केली असून मंगळ मोहिमेचा दुसरा टप्पा व शुक्र मोहिमेचा उल्लेख अर्थसंकल्पात केला आहे. यानुसार इस्रोच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारने अवकाश संशोधनासाठी पर्याप्त मदत करण्याची चर्चा अनेक वर्षे सुरू आहे. पण आर्थिक मर्यादेमुळे अवकाश संशोधन मोहिमांना मर्यादा येतात. तरीही गेले दशकभर इस्रोने मर्यादित आर्थिक निधीत अवघड वाटणारी मंगळ मोहीम यशस्वी करून दाखवली.
 
आता मंगळावरील दुसऱ्या मोहिमेत या ग्रहावर स्वनिर्मित रोबोट पाठवण्याचा इस्रोचा उद्देश आहे. शिवाय शुक्र मोहिमेसाठी इस्रोची अमेरिकेची अवकाश संस्था नासाशी चर्चा सुरू आहे. नासाच्या मते शुक्र ग्रहाची फार कमी माहिती मानवाला असल्याने इस्रोच्या मदतीने या ग्रहाचा अभ्यास अधिक करण्याची संधी नासालाही मिळू शकते. हा परस्पर सहकार्याचा कार्यक्रम निश्चितच एकूण अवकाश संशोधनाला भरारी देणारा ठरू शकतो. आजपर्यंत काही देश स्वत:चे अवकाश संशोधनाचे सामर्थ्य जगाला दाखवण्यासाठी अवकाश मोहिमा हाती घेत होते. ही परिस्थिती बदलली असून बरेच विकसित-विकसनशील देश एकमेकांच्या मदतीने आपल्या आकाशगंगेतील गुह्ये उलगडण्यासाठी प्रयत्नशील झाली आहेत. 
 
अवकाश संशोधन ही आता कुण्या एका देशाची मक्तेदारी राहिलेली नाही. विविध कल्पनांपासून संशोधन, तंत्रज्ञानापर्यंत सर्वच गोष्टींचे आदानप्रदान हा आता रिवाज होत चालला आहे. भारताच्या अवकाश संशोधन प्रयत्नांना सुमारे ६० वर्षांचा इतिहास आहे. गेल्याच वर्षी इस्रोने २० उपग्रहांचे यशस्वी उड्डाण करून दाखवले होते. त्यात गुगल या कंपनीच्या उपग्रहांबरोबर पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेला स्वयम् व चेन्नईतील सत्यभामा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला सत्यभामा सॅट असे दोन उपग्रह होते. १५ फेब्रुवारीला पाठवण्यात येणाऱ्या उपग्रहांत तीन उपग्रह भारताचे आहेत. पण ८५ उपग्रह सिलिकॉन व्हॅलीतील एका स्टार्टअप कंपनीचे अाहेत. या १०१ उपग्रहांचे एकूण वजन ६६४ किलोग्रॅम असून एखाद्या बसमधून प्रवासी जसे प्रत्येक थांब्यावर उतरतात तसे हे उपग्रह आपापल्या कक्षेनुसार इस्रोच्या रॉकेटमधून स्वत:ला वेगळे करतील. या उपग्रहांचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग ताशी २७ हजार असून ६०० सेकंदांच्या आत १०१ उपग्रह अवकाशात आपापल्या कक्षेत जाणार आहेत. हे सर्व पाहिल्यास तांत्रिकदृष्ट्या अतिशय काटेकोर व नाजूक अशी योजना आहे. इस्रोने अवकाशात पाठवलेल्या आजपर्यंतच्या मोहिमेत एकही अपघात झाला नव्हता. तशीच कार्यक्षमता इस्रो या मोहिमेत दाखवेल, यात शंका नाही. इस्रोला शुभेच्छा…
बातम्या आणखी आहेत...