आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिगरी जितूची यशस्वी सांगता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जितू राय मूळ नेपाळचा. बटाटे व मका यांची छोटीशी शेतजमीन त्याच्या वडिलांची. अनेक नेपाळी गुरख्यांप्रमाणे तो भारतीय लष्करात भरती झाला. त्याने प्रथम पिस्तोल पाहिले व चालवले तेही भारतीय सेनादलात. 
 
आपला आवडता क्रीडा प्रकार इतिहासजमा होणारच असेल (अन् तोही ‘आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स अॅथलिट्स कमिशन’ या जागतिक शूटिंग संघटनेच्या खेळाडू मंडळाचे अध्यक्षपद अभिनव बिंद्रासारख्या भारतीयाकडे असताना!) तर त्याला कसे सामोरे जावे? याचा एक आदर्श खेळाडूंपुढे, शूटिंग-विश्वापुढे ठेवलाय जितू रायने. 

दिल्लीत नुकत्याच संपलेल्या विश्वचषक शूटिंगमध्ये, पन्नास मीटर्स फ्री पिस्तोल स्पर्धेत जितू रायची सलामी कामगिरी खराब होती. पन्नास मीटरवरून लक्ष्यभेदाचे (बुल्स आय), म्हणजे सर्वात आतील, सर्वात छोट्या वर्तुळातील थेंबाएवढ्या सूक्ष्म केंद्रबिंदूचा निशाणा साधून १०.९ असे सर्वाधिक गुण कमावण्याचा त्याचा इरादा- पण प्रत्यक्षात तो शॉट त्याच्या खात्यात जमा करत होता १०.९ गुण नव्हे, तर केविलवाणे ६.६ गुण! भोवती अतिखराब. त्याच्या खात्यात १०.९ उणे ६.६ अशी ४.३ गुणांची पिछाडी दर्शवणारी! 
 
भारतीय लष्करातील या लढवय्याने हे दारुण अपयश पचवले अन् अखेरीस गरुडभरारी मारली ती सुवर्णपदकाच्या शिखरावर. या झुंजीसाठी त्याला प्रेरणा व आत्मविश्वास देत होती २०१४चे एशियाड अन् २०१६चा बँकॉकमधील विश्वचषक येथील जगज्जेतेपदे. तशीच काही प्रमाणात २०१४मधील मॅरिबोर येथील विश्वचषक अन् ग्रॅनडा येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, तसेच गतवर्षी बोलोगवा येथील अंतिम विश्वचषक स्पर्धातील रौप्यपदके. चार वर्षांतील तीन रौप्य व दोन सोनेरी पदके त्याला स्फूर्ती देत होती तिसऱ्या सुवर्णासाठी!  
 
सोनेरी मोहिमेची यशस्वी सांगता झाल्यावर हा शूरवीरासारखा बोलला “ऐसे लडाई लडते लडते, एकेक को पिछे करके (आगे आगे) जाने मे मजा आता है.” त्यानंतर त्याने आठवण काढली गेल्या एशियाडची “तिथे सुवर्णपदकाला सर्वप्रथम गवसणी घातली होती, तीही अक्षरश: शेवटच्या शॉटवर, अतिअचूक लक्ष्यभेदाच्या नेमबाजीवर!” 
 
पिस्तोल नेमबाजीत जितूचा हातखंडा. दहा मीटर्स पिस्तोल स्पर्धेत गेल्या चार वर्षांत त्याची कमाई एक सुवर्ण, तीन रौप्य व तीन ब्राँझ अशा दोन आशियाई पदकांसह सात पदकांची. आणि पन्नास मीटर्स फ्री पिस्तोलमधील चुरस त्याला अधिकच फलदायी. दोन विश्वचषक व एक एशियाड यात अजिंक्यपदे व तीन विश्वचषकात रौप्यपदके. आता अभिनव बिंद्रांसारख्यांच्या सहमतीने पन्नास मीटर्स फ्री पिस्तोल हा क्रीडाप्रकार (निदान तूर्त तरी) कालबाह्य व म्हणून इतिहासजमा होणार असेलच तर जिगरी जितू त्याला सामोरा गेला तो; जागतिक प्रभुत्वाचा शेवटचा ठसा आपल्या व भारताच्या नावावर उमटवूनच. 

पन्नास मीटर्स फ्री पिस्तोल यापुढे ऑलिम्पिकमध्ये असणार नाही. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या निर्णयावर का आली? 

इथे समजून घेतले पाहिजे ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवणाऱ्या, स्थान टिकवणाऱ्या अन् स्थान गमावणाऱ्या खेळाचे रूप, बदलते रूप, शूटिंगमधील पंधरा स्पर्धांतून पन्नास मीटर्स फ्री पिस्तोलसह, पन्नास मीटर्स रायफल प्रोन व डबल ट्रॅप यांनाही अर्धचंद्र देण्यात येत आहे. कुस्तीचे ऑलिम्पिकमधील स्थान २०१२ नंतर धोक्यात आले होते. काही वजनी गटांना अर्धचंद्र देण्याची आणि महिलांच्या स्पर्धांची संख्या आस्ते आस्ते वाढवत जाण्याची तडजोड कुस्ती संघटनेला करावी लागली होती. 
 
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती याबाबतचे निर्णय घेताना, सर्वाधिक महत्त्व देते खेळाच्या प्रेक्षणीयतेचा. प्रेक्षकांचा कौल निर्णायक महत्त्वाचा, तो आजमावण्याची एक कसोटी म्हणजे टीआरपी उर्फ टेलिव्हिजन रेटिंग्ज. शूटिंगमधील पिस्तोल, रायफल व शॉटगन नेमबाजीमधील १५ स्पर्धांत, प्रेक्षणीयतेच्या टीआरपी रेटिंग्जमध्ये, पन्नास मीटर्स फ्री पिस्तोलचा क्रमांक लागला खालून दुसरा, चौदावा? तिथेच या स्पर्धेस कालबाह्य ठरवून इतिहासजमा केले जातेय. 
 
प्रेक्षणीयतेसह ऑलिम्पिक समितीची दुसरी कसोटी स्त्री-पुरुष समानतेची. पुरुष व महिला यांच्या स्पर्धांची संख्या सारखी, निदान जवळपास सारखी असावी, असा नवयुगात, एकविसाव्या शतकाचा आग्रह. नेमबाजीसह नऊ वैयक्तिक खेळांना, २०२०च्या टोकियो-ऑलिम्पिकपासून महिलांच्या स्पर्धांची (व साहजिकच पदकांची) संख्या वाढवावी लागेल किंवा पुरुषांच्या काही स्पर्धांना कात्री लावावी लागेल. त्यासह मिश्र स्पर्धांचे उपक्रम हाती घेण्याचा विचार करावा लागेल. 
 
ऑलिम्पिक समितीच्या नव्या धोरणाच्या दबावाखाली, नेमबाजीस असेच फेरबदल करावे लागत आहेत. सर्वप्रथम पुरुष व महिला यांच्यासाठी समसमान १२-१२ स्पर्धांचे संयोजन गेल्या ऑलिम्पिकमध्ये ३९० नेमबाजांना प्रवेश देताना, पुरुष-महिला स्पर्धक ५०:५० असे समसमान संख्येत नव्हते. ते प्रमाण आगामी ऑलिम्पिकमध्ये समपातळीवर आणले जाईल! त्यापेक्षाही किंवा तितकाच मूलगामी बदल लेसर गन्सचा. पर्यावरणासाठी हा बदल क्रमप्राप्त ठरतो, असा ऑलिम्पिक समितीचा दावा. त्यामुळे खेळाच्या मुळावरच घाव घातला जातो, असे नेमबाजांचे मन सांगते. या नव्याने उद््भवलेल्या समस्येचे सांगोपांग-विचारमंथन करण्यासाठी, शूटिंग फेडरेशनने  खास समिती नेमलीय. शूटिंगचे विश्वच बदलतेय! 
 
शूटिंगच्या बदलत्या विश्वाची दखल आपण ज्या जितू रायपासून घेतली, त्याच्याविषयी आणखी थोडेसे. भारतीय नेमबाजीत एका बाजूला आजी-माजी संस्थानिक, डॉ. करणी सिंग, पटियालाच्या राजघराण्यातले व भारतीय ऑलिम्पिक असो.च्या सरचिटणीसपदाच्या खुर्चीस चिकटलेले रणधीर सिंग, रोंजन सोंधी व हजारो कोटींचा वारसा लाभलेला अभिनव बिंद्रा. दुसऱ्या बाजूस मध्यमवर्गीय अंजली वेदपाठक (भागवत), तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, पूजा घाटकर...अन् जॉयदीप कर्मकार व अर्थातच जितू राय. 
 
जितू राय मूळ नेपाळचा. बटाटे व मका यांची छोटीशी शेतजमीन त्याच्या वडिलांची. छोट्या खेड्यातून जवळपासच्या छोट्या गावाकडे चालत जाण्यासाठी एक टेकडी चढावी-उतरावी लागायची. अनेक नेपाळी गुरख्यांप्रमाणे तो भारतीय लष्करात भरती झाला. त्याने प्रथम पिस्तोल पाहिले व चालवले तेही भारतीय सेनादलात. त्याच्या सुवर्णपदकाचा किस्सा स्फूर्तिदायक, तितकाच ब्राँझ पदकाचा रंजक. 
 
दहा मीटर्स पिस्तोल स्पर्धेत तीन मुख्य दावेदार जितू राय. ऑलिम्पिक विजेता व्हिएतनामी विन झुआन होआंग अन् जपानी तोमोयुकी मातसुदा. प्राथमिक फेरीत प्रत्येकाने साठ-साठ शॉट मारायचे. सहाच शॉट बाकी. पण तेव्हा जितूचे चक्क वीस शॉट नऊ-नऊ गुणांचेच. कशीबशी त्याने पात्रता फेरी पार केली. त्याचे गुरू स्मिरनॉव अस्वस्थ. त्यांनी जितूला गुुरुमंत्र दिला : “”डोके भडकले, तर तुझा पराभव अटळ. कुणाशीही पंगा घेण्याआधी स्वत:शी पंगा घे!’’ पण ते शब्द त्याने एका कानातून स्वीकारले व दुसऱ्या कानातून सोडून दिले! मग वेगळीच कलाटणी मिळत गेली. स्पर्धेच्या दडपणाखाली इतर स्पर्धक चुका करू लागले. अखेर जितूला ब्राँझ पदक हस्तगत करता आले ते इतरांच्या चुकांमुळे! रिओ ऑलिम्पिकमधील अपयश जितूने पचवले, याची ही आणखी एक पण नशीबवान पावती !
 
(ज्येष्ठ क्रीडा समीक्षक)
बातम्या आणखी आहेत...