सुरेश कलमाडी, अभयसिंह चौटाला यांना न्यायालयाने अद्याप गुन्हेगार ठरवलेले नाही. त्यामुळे त्यांना तूर्त अकलंकित मानावे, असा सोयीस्कर अर्थ बाळ लांडगे, आदिल सुमारीवाला प्रभृती लावू पाहत आहेत. त्यातून एवढेच स्पष्ट होते की, असली माणसे मिंधी आहेत!
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे ज्येष्ठ सहकारी एकनाथजी खडसे यांची शिफारस पद्मश्री किताबासाठी केली, तर साऱ्या महाराष्ट्राच्या मनात कोणत्या भावना उचंबळून येतील? समजा शरदराव पवार साहेबांनी, त्यांचे निष्ठावान सहकारी छगन भुजबळ यांचे नाव आपले शिष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पद्मभूषण या बहुमानासाठी सुचवले तर खुद्द भुजबळजींना काय वाटेल? अन्् विचार करून बघा : मुकेश व अनिल या अंबानी बंधूंनी आपापसातील सारे मतभेद बाजूस सारून कृतज्ञतापूर्वक स्वर्गीय प्रमोद महाजन यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली तर कॉर्पोरेट जगतास काय वाटेल? प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही. निदान तूर्त तरी! घडलेय तरी काय? एवढी खळबळ कशामुळे माजलीय?
सांगायची गोष्ट अशी की : घटना सत्तावीस डिसेंबरची. म्हणजे पंधरवड्यापूर्वीची. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा, अध्यक्ष रामचंद्रन यांच्या चेन्नईत संपायला आलेली. त्याप्रसंगी शेवटच्या काही क्षणांत एका सन्माननीय सदस्याने (राकेश शुक्ल) ठराव मांडला : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेशभाई कलमाडी व अभयसिंह चौटाला या दोघांचीही आजीव अध्यक्षपदी नियुक्ती केली जावी. या प्रस्तावाला कोणीही विरोध केला नसल्याने सर्वांनी मूक संमती दिली असेच मानले गेले. आणि कलमाडी-चौटाला आजीव अध्यक्ष झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या. विशेष म्हणजे कलमाडींच्या राज्यातील बाळ लांडगे (महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस) व आदिल सुमारीवाला (अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष) यांनीही मूक संमती दर्शवली. शरद पवारांनी भुजबळांना किंवा फडणवीसांनी नाथाभाऊ खडसेंना किंवा अंबानी बंधूंनी स्वर्गवासी प्रमोद महाजनांना बहुमान देण्याचा कोणताही प्रस्ताव मांडलेला नाही. पण बाळ लांडगे, आदिल सुमारीवाला व भारतीय ऑलिम्पिक संघटनेवरील महाराष्ट्रातील व मराठी भाविक सदस्यांनी कलमाडी (व चौटाला) यांना गौरवान्वित करण्यास मूक संमती दाखवली!
बाळ लांडगे पुण्यातले, आदिल सुमारीवाला मुंबईतले. कलमाडींच्या गैरकारभारांचे गेल्या पंचवीस वर्षांतील साक्षीदार. पण त्या गैरकारभाराचे दुरान्वये साक्षी अशा अर्थाने की लाभार्थीच बाळ लांडगेंचा महिमा काय वर्णावा? गेल्या पंचेचाळीस वर्षांतील त्यांचा लौकिक साऱ्या महाराष्ट्राला परिचित. ते कधी शरद पवारांचे (अलीकडे अजित पवारांचे) उजवे हात व सुरेशभाईंचे डावे हात, तर कधी सुरेशभाईंचे उजवे हात अन्् शरद पवारांचे (अलीकडे अजित पवारांचे) डावे हात!
आदिल सुमारीवाला हे शंभर मीटर्स शर्यतीतील राष्ट्रीय विजेते, पण राष्ट्रकुल व आशियाई पातळीवर निष्प्रभ. अॅथलेटिक्सच्या क्षेत्रात सुरेशभाईंचा उदय झाल्यापासून सरशी तिथे पारशी या म्हणीला ते जागले. सुरेशभाईंचा आशीर्वाद मिळावा, अशीच त्यांची खेळी. राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेवरील महाराष्ट्रातील व मराठी-भाषक प्रतिनिधींनी लांडगे-सुमारीवाला यांचा कित्ता गिरवला. कलमाडी-चौटाला यांना गौरवान्वित करण्याच्या अन्् शक्य झाल्यास राजकीय पुनर्वसन करण्याच्या मोहिमेत ते सामील झाले, अन्य महाराष्ट्रीय व मराठी भाषकांना त्यांनी सामील करून घेतले, यात नवल ते कोणते?
कलमाडी-चौटाला यांचा परिचय काय नव्याने करून द्यायला हवा? दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार माजला, त्याचे केंद्रबिंदू होते सुरेशभाईच. या गैरव्यवहारातील काही मोजक्या गोष्टींबाबत त्यांच्यावर आरोपपत्र ठेवले गेले. चौटालांवर आरोप आहेत बेसुमार संपत्ती-संपादनाचे. या दोघांनाही काही महिने तुरुंगवास भोगावा लागला. आजमितीस ते जेलबाहेर असले तरी ते केवळ जामिनावर बाहेर आलेले आहेत. न्यायालयाने त्यांना अद्याप गुन्हेगार ठरवलेले नाही. त्यामुळे त्यांना तूर्त अकलंकित मानावे, असा सोयीस्कर अर्थ लांडगे, सुमारीवाला प्रभृती लावू पाहत आहेत. त्यातून एवढेच स्पष्ट होते की, असली माणसे मिंधी आहेत!
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा असो, वानखेडे स्टेडियमच्या नूतनीकरणातील वारेमाप फुगलेला खर्च असो, क्रिकेट विश्वचषक वा सचिन तेंडुलकरची शेवटची कसोटी असो, त्यात हात धुऊन घेणारा एखाद-दुसरा प्रभावशाली संघटक कधीच नसतो. पैसे ओरबाडण्यास त्याला दोन हात कसे पुरतील? त्याला गरज असते शेकडो हातांची. अशा शेकडो व डझनवारी हातांच्या टोळ्या कामाला लागतात, जोराने!
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये गर्दी अशा लाभार्थींची. फुकट परदेशी वाऱ्या, परदेशीच्या नाइट क्लबना भेटी, मॉलमध्ये मद्य ते रिव्हॉल्व्हर ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी, बीचवर अय्याशी व महिलांच्या बीच व्हॉलीबॉलचे दर्शन व चित्रण अशा अय्याशीमुळे जीवन धन्य झाले, अशा चंगळवाद्यांचे हे कंपू. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा निमित्तमात्र. त्यांच्या फुकट तिकीट वाटपात, आजन्म ही बुभुक्षित मंडळी रांगेत उभी लाचारासारखी! कलमाडी-चौटाला प्रभृतींकडे डोळे लावून बसलेली. असे टोळीवाले, कलमाडी-चौटाला अशा सत्ताधीशांवर टीका कशी करणार? ऑलिम्पिक संघटनेची ती सभा संपल्यानंतर अध्यक्ष रामचंद्रन यांना तब्बल दोन आठवड्यांनी खुलासा करण्याचा मुहूर्त लाभला! ठराव मांडण्यास सात दिवसांची मुदत (नोटीस) द्यावी लागते, त्यामुळे असा कोणताही ठराव मंजूर झालेलाच नाही, असे ते आता सांगतात. पण तो ठरावच क्रीडाद्रोही होता, असा सूरही काढत नाहीत. त्यातील तांत्रिक चूक ते दाखवतात अन् भाजप सरकार त्यांना माफ करते. अजूनही नारा तोच : कलमाडी-चौटाला अमर रहे!
वि. वि. करमरकर
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक