आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्या कवीची अखेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवी तुळसी परब याचा जीव चांदणओल्या शब्दांत कधीच अडकून पडला नाही. कवितेकडे उपजीविकेचे साधन म्हणून न पाहणाऱ्या तुळसीने नेहमीच नुकसानीचा व्यवहार केला. त्यानं कधी स्वतःचा उत्सव साजरा केला नाही.
प्रख्यात कवी तुळसी परब गेल्याची बातमी आली अन् माझा काही केल्या त्या बातमीवर विश्वास बसेना. कदाचित अफवेची बातमी झाली असावी, असेही क्षणभर वाटले. मरणाला वय नसतं. तरीही कवीला मरण्याचा अधिकार नसतोच. कवी शंभर मरणे परतवून उभाच असतो आपल्यात. अन् तुळसी तर एक ठळक कवी होता. एकटं असल्यावर कवी आपल्यासोबत असतो. तो आपल्याशी बोलतो, भांडतो. आपल्याला नेहमी जगण्याचा आणि जगाचा आरसा दाखवत असतो. हयातभर तुळसीनं तरी काय केलं? माणसं जोडत राहिला. त्यांच्या दुःखाला शब्द दिला. माणसाला अधिक सुसंस्कृत, अधिक सजग, अधिक सृजनशील बनवत राहिला. माणसाला माणूस बनवत राहिला.

तुळसीचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. त्याने मराठी आणि भाषाशास्त्र विषयात पदवी संपादन केल्यानंतर काही काळ मंत्रालयात कारकुनी केली. पत्रकारिता केली. परंतु त्याचं मन नोकरीत कधीच रमलं नाही. मार्क्सवादी विचारांनी झपाटल्यानं त्यानं नोकरीवर पाणी सोडलं नि तो लाल निशाण आणि श्रमिक संघटनेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागला. कार्यकर्ता कवी असलेल्या तुळसीने त्याच्या ७५ वर्षांच्या आयुष्यात विपुल लेखन केलं असं नाही. त्याच्या नावावर माझ्या माहितीप्रमाणे चार काव्यसंग्रह आहेत. ‘हिल्लोळ’, ‘धादान्त आणि सुप्रेमय्य मधल्या मधल्या मधल्या कविता’, ‘कुबडा नार्सिसस‘, आणि शेवटचा ‘हृद’. चंद्रकांत पाटील यांच्या कवितांचे संकलनही त्यानं केलेलं आहे.

मराठी काव्यक्षेत्रात आपल्या चार काव्यसंग्रहांची भर टाकून तुळसीने आपले स्थान ठळक केलेलं आहे. जे काही लिहिले ते सकस आणि मनुष्यकेंद्रित होते. अरुण कोलटकर, सतीश काळसेकर, दिलीप चित्रे आणि मनोहर ओक यांनी आपल्या कवितेत केलेला महानगरीय संवेदनांचा विशेष विस्तार तुळसीनं आणखी पुढं नेऊन ठेवला. मार्क्सवादी विचारांची जोड आपल्या कवितेला दिली. शहरी जीवनातील तुटलेपण, अंतर्विरोध त्याने आपल्या कवितेत नेमकेपणानं अधोरेखित केला. आधुनिक जाणिवांच्या वेगवेगळ्या नकारातून त्याची कविता बोलत होती. मराठीतील प्रस्थापित साहित्याला नकार देऊन काही तरुण लेखक मंडळी लिटल मॅगझिनच्या चळवळीत एकवटली होती. त्यात गिरणगावातून सतीश काळसेकर, राजा ढाले, चंद्रकांत खोत, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ यांचा समावेश होता. दलित कवींप्रमाणं बंडखोर, विद्रोही कवी म्हणून तो ओळखला जाऊ लागला.

स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्याचा विचार करताना दोन कालखंड महत्त्वाचे आहेत. १९४७ ते १९६० व १९६० नंतरचा दुसरा कालखंड. १९६० च्या सुमारास स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भ्रमनिरास अधिक तीव्र झाला. दलित जाणिवेला अन्यायाची प्रखर जाणीव झाली. आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीचा वाङ््मयावर प्रभाव पडत होता. संतप्त तरुण पिढी आणि दलित साहित्य ही दोन जे वाङ््मयीन बंड झाले त्यांची प्रखर अभिव्यक्ती मुख्यत: कवितेतून झाली. या संतप्त तरुणपिढीने लघु अनियतकालिकांची चळवळ केली. तिचा आरंभ ‘शब्द’ या अनियतकालिकाने केला. कामू, काफ्का हे साहित्यिक या कवींची दैवते होती. न आवडणाऱ्या प्रत्येक नावडत्या गोष्टीकडे बोट करण्याची हिंमत दाखविणारी ही असंतुष्ट पिढी आपला इतिहास मागे ठेवून गेली आहे. मराठी कवितेचं आधुनिकीकरण करण्यात तुळसीचा मोलाचा वाटा आहे. विसंवाद, कंटाळा, एकाकीपणा, अर्थशून्यता ही अस्तित्ववादी जाणिवेची वैशिष्ट्ये तुळसीच्या काव्यलेखनात कमी-अधिक प्रमाणात दिसतात. माणूस आणि मित्र म्हणून तुळसी दिलखुलास होता. १९८४-८५ च्या काळात तो औरंगाबादहून मुंबईला आला होता. कविकुळातला असल्यानं माझ्याशी त्याची दोस्ती होती. दैनिक “नवशक्ती’त नोकरी मिळेल का म्हणून त्यानं मला विचारलं. मी तडक त्याला भाऊ जोशी यांच्यापुढं उभं केलं. तुळसीनं औरंगाबादेत पत्रकारिता केल्यामुळं भाऊंनी त्याला कामावर ठेवलं. मी, परेन जांभळे आणि तुळसी असे तीन कवी एकाच वेळी ‘नवशक्ती’त होतो. त्या दोघांमध्ये मी नवखा आणि कच्चा कवी होतो. ‘सत्यकथे’ची होळी करणारा कवी म्हणून मला तुळसीबद्दल विशेष आस्था होती. तसेच आणीबाणीच्या काळात तो दहा महिन्यांचा कारावास भोगून आलेला आहे हेही माहीत असल्यानं मी त्याच्या प्रेमात पडलो होतो. आम्ही अधूनमधून सातरस्त्याला नामदेव ढसाळच्या घरी गप्पा हाकायलाही जायचो. रात्रपाळीला पायाखाली नरिमन पॉइंट आणि गेट वे ऑफ इंडिया घातल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.

तुळसी नवशक्तीत रमला नाही. दोन वर्षांतच त्याने नोकरी सोडली. सर्व राजमार्ग वहिवाटीचे करण्यासाठी तो पुन्हा रस्त्यांवर लढण्यासाठी उतरला. तुळसी परब याचा जीव चांदणओल्या शब्दांत कधीच अडकून पडला नाही. कवितेकडे उपजीविकेचे साधन म्हणून न पाहणाऱ्या तुळसीनं नेहमीच नुकसानीचा व्यवहार केला. त्यानं कधी स्वतःचा उत्सव साजरा केला नाही. कारण सामाजिक उत्तरदायित्वाची भावना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. वागण्यात आणि भाषेत रांगडेपणा असलेला परंतु अतिशय संवेदनशील मित्र म्हणून तुळसी सतत माझ्यासोबत असेल. आता तो नाही; पण त्याच्या कवितेतून मला हवा तेव्हा तो भेटेलच. फक्त त्याचे पाणेदार टपोरे डोळे आता कधीच दिसणार नाहीत, ही खंत आहे.
बातम्या आणखी आहेत...