आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रेसफुल लिएंडर पेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजय अमृतराजनंतर आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचा ध्वज फडकवत ठेवला असेल तर तो लिएंडर पेसने. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुहेरीचा अंतिम सामना जिंकून त्याने वयाच्या ४१व्या वर्षी आपले १५ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. त्याने स्विस खेळाडू मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीत नेस्टर-माल्देनोविक या गतविजेत्यांवर मात केली. १९९० मधील विम्बल्डन टेनिस स्पर्धेत एकेरीच्या विजेतेपदाबरोबरच नावारूपाला आलेल्या लिएंडरने तेव्हापासूनच भारताचा तिरंगा सतत फडकवण्याची जिद्द बाळगली. केवळ खिसा भरणार्‍या, व्यावसायिक किंवा आर्थिक लाभांच्या टेनिसच्या मोहात न पडता त्यापलीकडे जाऊन त्याने देशप्रेमाला प्राधान्य दिले. आशियाई स्पर्धा, एशियाड किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत सातत्याने भारताचे प्रतिनिधित्व करीत त्याने राष्ट्राचा ध्वज फडकवण्याचे स्वप्न बाळगले.

अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणार्‍या लिएंडरने आपल्या वडिलांची परंपरा पुढे चालवली. िलएंडरचे वडील वेस पेस १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे कांस्यपदक पटकावणार्‍या भारतीय संघाचे सदस्य होते. लिएंडरची आई जेनिफर ही बास्केटबॉल संघाची कर्णधार होती. अशा खेळाडू कुटुंबाची परंपरा त्याने आणखी प्रभावीपणे पुढे चालू ठेवली आहे. लिएंडर आणि महेश भूपती ही दुहेरीची जोडी प्रदीर्घ काळ जागतिक टेनिसच्या दुहेरीच्या क्रमवारीत अग्रेसर होती. या दोघांनी काही ग्रँडस्लॅम पटकावले होते. मात्र भूपतीबरोबर फारकत घेतल्यानंतर या दोघांच्याही कारकीर्दीला ग्रहण लागले. जगातील दुहेरीतील ही अव्वल जोडी भारताला ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीचे एकही सुवर्णपदक काय, परंतु पदकही देऊ शकली नाही. अशा परिस्थितीत पेसने स्वत:ला सावरून पुन्हा उमेदीने ऑस्ट्रेलियन ओपनवर आपला ठसा उमटवला. एटीपी वर्ल्ड टूरच्या आपल्या २५ व्या हंगामातही लिएंडर ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकू शकतो ही गोष्टच मुळी भारतीय युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत पेसचे हे तिसरे विजेतेपद होते व मार्टिना हिंगीसच्या साथीने पहिले होते.

हिंगीसला एके काळी टेनिस कोर्टवर राज्य करणारी सम्राज्ञी मार्टिना नवरातिलोवाने पेसबरोबर खेळण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला योग्य ठरला. १९९५ ला ग्रँडस्लॅम विजेतेपद प्रथम पटकावणारी हिंगीस तब्बल २० वर्षांनंतरही ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावू शकते हे तिच्या मेहनत व कष्टाचे फळ आहे.