आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपटी हे रान सारे, मोतियाचे दाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आली दन दन दन दन, पावसाची धार
नाव घेऊ देवाजीचे, मानू उपकार
पोपटी हे रान सारे, मोतियाचे दाणे
सालभर भाकरी खाऊ आनंदाने
राबूया मजेत, करू सुखाचा संसार

या लोकगीताची आठवण व्हावी असे वातावरण वरुणराजाने यंदा सर्वत्र निर्माण केले आहे. गेली दोन वर्षे महाराष्ट्रासह देश दुष्काळात होरपळून निघाला. पण हवामान खात्याने केलेल्या अंदाजानुसार पावसाने यंदा चांगली कृपा केली. सुरुवातीला आशेला लावून त्याने मध्येच मोठी विश्रांती घेतली तेव्हा हे वर्षही अस्मानी संकट गडद करते की काय, अशी भीती वाटू लागली होती. पण गेल्या आठवड्यात त्याने देशभर बरसात केली. देशात गेल्या बुधवारअखेर सरासरी ७६६ मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीपेक्षा केवळ पाच टक्क्यांनी कमी आहे. देशाच्या ३६ पैकी २८ विभागांत तो सरासरीइतका किंवा त्यापेक्षा अधिक झाला आहे. आणि गेले दोन-तीन दिवस त्याने अशी आगेकूच केली आहे की आता मोतियाचे दाणे येणार, याची खात्री झाली आहे.
भारतीय शेतकरी कष्टाळू आहे आणि त्याने धनधान्याची देशाला कधी कमी पडू दिली नाही. देशाची लोकसंख्या आज १३० कोटींच्या घरात गेली आहे आणि वेगवेगळ्या कारणांनी शेतजमिनीचे क्षेत्र कमी होते आहे, तरीही या देशाला आज अन्नसुरक्षेची चिंता नाही. अन्नधान्याची टंचाई म्हणजे काय असते, हे देशाने १९७२ च्या भीषण दुष्काळात अनुभवले आहे. त्या वर्षी सुकडी, मका, मिलो खाऊन जगण्याची वेळ आली होती. पण त्यानंतरच्या हरितक्रांतीने देशाची गोदामे खचाखच भरून काढली. इतकी की धान्य कोठे ठेवायचे, याची व्यवस्था सरकारला करता आली नाही. निसर्गाने जे भरभरून दिले आहे, ते सांभाळण्यात आम्ही कमी पडलो, हे मान्यच केले पाहिजे. मग ते पाणी असो की धनधान्य असो.
निसर्गाने या वर्षी अशीच कृपा केली असून त्यामुळे धनधान्याच्या राशी उभ्या राहतील, असे संकेत मिळू लागले आहेत. गरिबांना रडवले, त्या डाळींचे खरिपातील उत्पादन ८.२२ दशलक्ष टनांवर जाईल, असा अंदाज जाहीर झाला आहे. ज्यात हरभरा, उडीद आणि मुगाचा ८५ टक्के वाटा आहे. खरिपातील डाळीचे क्षेत्र या वर्षी १४.४० लाख हेक्टरवर गेले असून गेल्या वर्षीपेक्षा त्यात २९ टक्के वाढ झाली आहे. तर धान्याच्या उत्पादनाचे २७०.१० दशलक्ष टन इतके विक्रमी उद्दिष्ट साध्य करण्यासही त्याने साथ दिली आहे. गेली दोन वर्षे दुष्काळामुळे ते २५२ दशलक्ष टनांवर थांबले होते. तांदळाचे उत्पादन ९१.३ दशलक्ष टन, उसाचे तीन हजार २९२ दशलक्ष टन (६.५ टक्के कमी), कापसाचे उत्पादन ३३०.३ दशलक्ष टन होणार, असे अंदाज प्रसिद्ध झाले आहेत, जे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत खूपच चांगले आहेत. भारत नावाच्या या खंडप्राय देशात केरळच्या किनारपट्टीवर धो धो पाऊस कोसळत असतो तेव्हा मध्य आणि उत्तर भारत उन्हाने भाजून निघत असतो. तब्बल महिनाभराने मान्सून तेथे पोचतो. तोपर्यंत तर दक्षिणेतील राने हिरवीगार झालेली असतात. सप्टेंबरच्या सुरुवातीस तो परत फिरण्याची वर्दी पश्चिम राजस्थानमधून देतो, तेव्हा कर्नाटक, महाराष्ट्रातील काही भागात तर मुगासारखे पीक हातात येण्याची वेळ झालेली असते. ईशान्य भारत आणि बिहारमध्ये त्या वेळी भातलावणी सुरू असते. सुरुवातीला त्याने चांगला झटका मारला असेल तर धरणे तुडुंब भरलेली असतात आणि रब्बी हंगाम चांगला जाईल, असे संकेत देण्यासाठी तो मध्य तसेच दक्षिण भारतात पुन्हा सक्रिय होतो. गुडघ्यापर्यंत आलेल्या पिकांना पुन्हा तरारी येते. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानचा ईशान्य मान्सूनने जर साथ दिली तर मग मागे पाहण्याचे काही कारणच नाही. तसा योग या वर्षी जुळणार, असे संकेत त्याने दिले आहेत.
देशात पाणीटंचाई नाही आणि महाराष्ट्रातच आहे, असे खरे म्हणजे अजिबात नाही. पण वाढते शहरीकरण, जमिनीचा पोत, उसासारख्या नगदी पिकांना लागणारे पाणी, जमिनीच्या पोटातील पाण्याचा झालेला प्रचंड उपसा यामुळे महाराष्ट्र पाणीटंचाईने दरवर्षी अधिकाधिक ग्रासतो आहे. त्यात भर पडते ती पावसाच्या विषम वाटपाची. सातारा आणि नगर हे असे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांत ज्यांच्या पश्चिम टोकाला भीमाशंकर, महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणीवर म्हणजे सह्याद्रीवर देशातील विक्रमी पाऊस पडतो, तर त्याच जिल्ह्यात पूर्वेच्या टोकाला म्हणजे कोपरगाव, श्रीरामपूर, म्हसवड, खटाव भागात सर्वात कमी! पर्जन्यछायेचा प्रदेश मनमाडपासून जो सुरू होतो, तो औरंगाबादचा काही भाग, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली जिल्हा करत कर्नाटकात जातो. मराठवाड्याची पावसाची सरासरी इतर भागापेक्षा कमी असली तरी नांदेड, हिंगोली, परभणीला तो कमी पडला असे सहसा होत नाही. पण औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूरला त्याने कायम तणावात ठेवले आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावला तो सहसा धोका देत नाही. पश्चिम विदर्भाचा बुलडाणा, अकोला, यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग सोडला तर विदर्भावरही तर त्याने कायम कृपा केली आहे. विशेषतः पूर्व विदर्भाला त्याने जणू वरदान दिले आहे. म्हणून तर त्या भागात जंगलाचे सर्वात मोठे क्षेत्र पाहायला मिळते. एका राज्यात एवढे वैविध्य खरे; पण मग आधुनिक माणसाला हे पेलू नये, एवढे त्यात काय आहे? भाग नियोजनाचा आहे आणि त्याचे महत्त्व गेल्या वर्षी आपल्याला पटले आहे. बारा महिन्यांतून पावसाचे चार महिने वजा केले की काहीच उरत नाही, असे म्हटले जाते. कारण भारतात या चार महिन्यांत ७० टक्के पाऊस पडतो. माणसासह सर्व जीवसृष्टीचे चक्रच त्यावर अवलंबून आहे. निसर्गात नेमके काय होते आणि निसर्गाचे हे घड्याळ चालते, याची आधुनिक जगाला अजूनही पूर्ण उकल झालेली नाही. मात्र या महाकाय देशाची तहान तो नित्यनियमाने घालवतो. कधी उशिरा तर कधी लवकर, कधी कमी तर कधी जास्त, अशी खात्रीही तो देतो. मग आज एवढी विसंगती का माजली आहे, असा प्रश्न विचाराल तर त्याचे उत्तर तो देणार नाही, ते उत्तर तर माणसानेच शोधले पाहिजे.
यमाजी मालकर
ymalkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...