आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुल शेक्सपियर असले तरी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पु.ल.देशपांडे यांचे ‘ती फुलराणी’ हे एक एव्हरग्रीन नाटक व त्या नाटकाचे नव्या संचातले प्रयोग पाहणे, हा मराठी प्रेक्षकांचा एक आवडता उद्योग बनून राहिला आहे. वामन केंद्रे यांनी बसवलेल्या प्रयोगात नायक सतत खिशातील नाणी खुळखुळत असे. आता हे काही प्रयोगात लिहिलेले नाही. परंतु ही एक वामन केंद्रे यांनी केलेली गंमत होती. अशा गमतीजमती दिग्दर्शक, नट करत असतात. पदरची वाक्ये घालू नयेत हे बरोबर आहे. पण ४० वर्षांनंतर नाटकात काहीच बदल करू नये, असा आग्रह करणे मात्र चुकीचे आहे. ‘ती फुलराणी’चा सध्याचा प्रयोग खूप रंगतोय पण त्यावर नुकतीच टीकाही झालीय ती संहितेत बदल केल्याने. दिनेश ठाकूर हे पुलंचे जवळचे नातेवाईक आणि प्रसिद्ध गणितज्ञ ते परदेशात असतात. (‘गणगोत’मधील व्यक्तिचित्र कोण विसरेल?) महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी हा प्रयोग पहिला आणि त्यांना तो नापसंत पडला. याचे कारण दिग्दर्शकाने केलेला संहितेमधला फरक. त्यांनी असाही आरोप केला की नाटक फार्सिकल करण्याच्या नादात, टाळ्या घेण्याच्या नादात त्यात नको त्या लकबी घातलेल्या आहेत. मला असे वाटते हा दिग्दर्शकाचा अधिकार आहे आणि दिनेश ठाकूर त्याच्यावर अतिक्रमण करत आहेत.
संहितेमध्ये बदल करणे, अनावश्यक भाग काढून टाकणे, हे काही नवीन नाही. उदा- मॅक्बेथच्या नव्या सिनेआवृत्तीत लेडी मॅक्बेथला मुले आहेत असे दाखवले. शेक्सपियरपासून अनेक नाटककारांचे प्रयोग वेगवेगळ्या तऱ्हेने इंटरप्रिंट होत असतात. उदा. ‘ती फुलराणी’ ज्याच्यावरून घेतले आहे त्या नाटकाचे नाव ‘पिग्मॅलियन’- लेखक जॉर्ज बर्नार्ड शाॅ. या नाटकावर आधारित ‘माय फेयर लेडी’ हा चित्रपट करताना दिग्दर्शक आणि लेखकाने हवे तसे बदल केले होते. आणि त्या वेळी शॉ जिवंत नव्हते.

स्वतः पुलंनी ‘ती फुलराणी’ रूपांतरित करताना कितीतरी बदल केले आहेत. बर्नाड शॉच्या कलाकृतीत केलेले बदल मान्य आणि पुलंच्या संहितेत मात्र बदल नको, असा काहीसा दिनेश ठाकूर यांचा आग्रह दिसतो. दुसरा भाग असा की स्वतः दिग्दर्शकाने याबद्दल म्हटले आहे की, ४० वर्षांनंतर ती कलाकृती तशीच सादर करता येणार नाही. हे बरोबर आहे. याचे कारण असे की काळानुसार शेकडो गोष्टी बदलतात. उदा. - त्या काळात टॅक्सी चार आण्यात येत असे. आज चार आणे नावाचे नाणे नष्ट झाले आहे. हा झाला केवळ तांत्रिक बदल, पण या प्रकारे समाजमनात होणारे, बॉडी लँग्वेजमध्ये होणारे बदल हे आहेतच. ४० वर्षांपूर्वी जशा मुली कपडे घालत आणि वागत तशा आज वागत नाहीत. तेव्हाचे तरुण वागत तसे आज वागत नाहीत.
स्वतः पुलंनी अनेक रूपांतर केली आहेत. हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’ या कादंबरीचे रूपांतर करताना ‘एका कोळियाने’ नावाचे रूपांतर केले. लॅटिन अमेरिकन देशातील एक म्हातारा जो समुद्रात खोलवर जातो, त्याचे जगणे त्याचा स्वभाव मराठी स्वभावाशी जुळणारा नाही. तरी ‘एका कोळियाने’ असे त्याचे भाषांतर केले. ‘एका कोळियाने’ या कवितेच्या ओळीतील कोळी हा खरं तर विणणारा कोळी आहे. पण पुलंना कोटी करण्याचा मोह शीर्षकात आवरता आलेला नाही. तसेच या कादंबरीचा मोठा खून करणारा बदल पुलंनी केला आहे, हे विलास सारंग यांनी दाखवून दिले आहे. तो बदल कोणता? ‘ओल्ड मॅन अँड द सी’ मध्ये म्हातारा सतत मोठ्याने माशाशी/स्वत:शी बोलतो. किंवा मनात विचार करतो. अर्थातच हेमिंग्वे यांनी यातला फरक ‘he said’ अमुक अमुक ‘he thought ‘अमुक अमुक असे केले आहे. इंग्रजी कादंबरीत तसे आहे. पण मराठीत रूपांतर करताना मात्र पुलंनी त्याचं सपाटीकरण करून टाकले आहे. ‘तो बोलला’, ‘त्याने विचार केला’असे स्वतंत्र वर्णन ते करत नाहीत. he said आणि he thought त्यांनी कादंबरीत एकत्र करून टाकलेत. त्यामुळे म्हातारा बोलतोय कधी आणि विचार कधी करतोय याची सरमिसळ करून टाकली.

मला असे वाटते की, तर असा बदल करणारे पुलं आणि त्यांच्या ‘ती फुलराणी’बद्दल फार सोवळेपणा दाखवायची गरज नाही. कुठलीही परंपरा जशीच्या तशी जतन केल्यामुळे समृद्ध राहत नाही. त्यात बदल करणे अपरिहार्य असते. दिनेश ठाकूर यांच्याबद्दल मला काही व्यक्तिगत बोलायचे नाही. मला असे वाटते जी मंडळी परदेशात राहतात, ती ४० -५० वर्षांपूर्वीच्या काळात जगत असतात. त्यांचे आवडते विषय पुल, वपु काळे हे असतात. त्यांना मराठी कादंबरी कुठे गेली आहे, मराठी नाटक कुठपर्यंत पोहोचलेय याची जाणीव नसते. ही दिनेश ठाकूर यांच्यावरची व्यक्तिगत टीका नाही, पण कुठेतरी या जाणिवेमधून पुलंच्या अनेक चाहत्यांनी नाटकात बदल नको असा आवाज सुरू केला आहे. आणि तो वेळीच आवरणे आवश्यक आहे. पुल म्हणजे कोण? ते अगदी महाराष्ट्राचे शेक्सपियर जरी असतील तरी जिथे शेक्सपियरच्या संहितेत बदल होतात. तिथे पुलंचं काय?
शशिकांत सावंत
shashibooks@gmail.com
साहित्य अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...