आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजभाषा मराठी व सद्य संदर्भ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंथन- व्यावसायिक लेखकांची संकल्पना रुजणे महत्वाचे आहे.
मराठी ही राज्याची अधिकृत राजभाषा असल्याचा कुठेही स्पष्ट उल्लेख नव्हता. मात्र, देवनागरी लिपीतील मराठी भाषा असा उल्लेख होता. त्यामुळे मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे, असा उल्लेख महाराष्ट्र राजभाषा अधिनियमात करून ते दुरुस्ती विधेयक नुकतेच विधानसभेत संमत करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने २० जुलै १९६२ रोजी शिक्षण व समाजकल्याण विभागाच्या एका शासन आदेशान्वये मराठी ही शासन कारभाराची भाषा राहील, असे जाहीर केले होते. फक्त या दर्जाला कायद्याचे पाठबळ मिळाले नव्हते. ते आता महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मध्ये दुरुस्ती करून साध्य करण्यात आले आहे. अाता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्याकरिता बळकट पार्श्वभूमी निर्माण झाली आहे. आज मराठीच्या विकासाशी निगडित सर्वच यंत्रणा अत्यंत हलाखीच्या व अकार्यक्षम अवस्थेत खितपत पडलेल्या आहेत. मराठीच्या विकास व संवर्धनासंबंधी काही अपवाद वगळता एकूणच शैक्षणिक क्षेत्रात, मराठी भाषकांतही अनास्था आहे. मराठी भाषकांमध्ये मराठीच्या सुप्त सामर्थ्याबद्दल अनास्था वेगाने वाढीस लागलेली असणे आणि मराठीच्या विकासाला हातभार लावणाऱ्या वाङ््मयीन-व्यवहाराच्या मर्यादा उघड होणे या विसंगत पार्श्वभूमीवर मराठीला कायदेशीरदृष्ट्या राजभाषेचा दर्जा प्राप्त होणे ही घटनाच महत्त्वाची आहे. आजच्या नवआर्थिक सामाजिक-सांस्कृतिक-विज्ञान-तंत्रज्ञान-संगणकीय पर्यावरणाच्या दृष्टीने मराठीचा विचार करायला प्रवृत्त करणारी ही घटना आहे. एखाद्या भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला की त्याची पुढची पायरी या भाषेला अभिजाततेचा दर्जा प्राप्त होणे ही आहे. तो मान मिळणे म्हणजे ती भाषा व तिच्या विविध कलात्मक भाषिक रूपांच्या दीर्घ परंपरेच्या समृद्धतेची पावतीच असते. मराठीला भविष्यात अभिजाततेचा दर्जा मिळाला तरी ती त्या भाषेच्या पायातली बेडी ठरू नये. कारण अभिजाततेच्या विळख्यात अडकून संस्कृतसारखी गहन व समृद्ध भाषा जशी शेकडो वर्षे बहुजनांपासून फटकून वागली व शेवटी मृत झाली, तशी अवस्था मराठीची होऊ नये. कारण अभिजनांची भाषा, अभिजनांचे साहित्य म्हणजेच अनुक्रमे अभिजात भाषा व अभिजात साहित्य होय, अशी धारणा अभिजाततेतून सूचित होते. मुळात ‘अभिजातता’ हा आज तरी एक कालबाह्य विचार आहे. कारण आजचे युग हे अनेक भाषा व तद्नुषंगिक अस्मिता-संस्कृतींच्या-सीमारेषा धूसर होण्याचे युग आहे. त्यात कुठल्याही भाषेला, संस्कृतीला स्वतःची अस्मिता अबाधित ठेवणे अवघड आहे. म्हणून मराठीने राजभाषा, अभिजातता व तद्नुषंगिक मर्यादांच्या विळख्यात न अडकता आपले ‘लोकभाषा’ हे लोकशाही रूपच जतन व अधिकाधिक समृद्ध, सशक्त कसे करता येईल याचाच विचार करावा.

दुसरे असे की आज मराठी भाषेसमोर इंग्रजीच्या वाढत्या प्राबल्याचा प्रश्न उभा आहे. या प्रश्नातूनच मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण झालेला दिसून येतो. अर्थात, हा प्रश्न इंग्रजीसमोर नाही. तो का नाही? याचे उत्तर म्हणजे इंग्रजी ही रोजगाराभिमुख भाषा आहे. तिची रोजगारक्षमता ही मराठीपेक्षा अधिक व्यापक आहे. माणसाला चांगला रोजगार वा व्यवसाय प्राप्त करून देण्यासाठी भाषेचा उपयोग करता आला पाहिजे. मराठीसंदर्भात अशी परिस्थिती आहे का? आजच्या वेगाने बदलत्या परिप्रेक्ष्यामध्ये मराठीने रोजगार क्षमता कितपत कमावली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘अर्थ’पूर्ण जगण्याला मराठीने हातभार लावला पाहिजे, अशी अपेक्षा बाळगता येणे शक्य आहे का? असेल तर काय करता येणे शक्य आहे, याचा विचार झाला पाहिजे. आणि जर नसेल तर का नाही याचा विचार झाला पाहिजे. कारण एखादी भाषा एखाद्या समाजाचे जगणे ‘अर्थ’पूर्ण करत असेल, तर तो समाज दुसऱ्या कुठल्याही भाषेच्या प्रभावाखाली जाऊन आत्मनाश करून घेत नाही हे जपानमधील जपानी, चीनची चिनी आणि जर्मनीची जर्मन या भाषांनी यशस्वीपणे दाखवून दिले आहे. तिथे इंग्रजीचे काहीएक चालत नाही, हा अनुभव मराठीसमोर आहे.

तिसरी बाब म्हणजे त्या देशातले तंत्रज्ञान कुठल्या भाषेचा स्वीकार करते यावरही त्या भाषेची ‘अर्थ’पूर्ण उपयोगिता अवलंबून असते. भारतासारख्या देशात जे तंत्रज्ञान विकसित होते, ते कितपत भारतीय असते हा प्रश्नच आहे. कारण देशात जर खास देशी तंत्रज्ञान विकसित होत असेल, तर त्या तंत्रज्ञानाची भाषा ही त्या देशाची राष्ट्रभाषा वा प्रादेशिक भाषाच असावी, तरच देशी भाषा या तंत्रज्ञानाच्या भाषा बनतील; परंतु दुर्दैवाने भारतामध्ये जे काही तंत्रज्ञान विकसित होते ते इंग्रजीच्या मदतीने होते, ही वस्तुस्थिती आहे. परिणामतः इंग्रजीच्या तुलनेत देशी भाषा दुय्यम ठरतात, हे वास्तव आहे.

कुठल्याही भाषेची समृद्धता ही त्या भाषेतल्या साहित्य व त्याच्या स्वरूपावरून निर्देशित होते. साहित्य हे भाषाविष्काराचे एक महत्त्वाचे ‘अर्थ’पूर्ण रूप आहे. आज साहित्याच्या स्वरूपाचा पुनर्विचार होण्याची प्रक्रिया जगभरातून गतिमान झाली आहे. साहित्य लेखन हा आता स्वान्तसुखाय उपक्रम राहिलेला नाही. समाजाचे, समाजातले दोष, वास्तव समाजाच्या नजरेस आणून देणे, हे एकच एक प्रयोजन आज साहित्यामागे राहिलेले नाही. आजचा जागतिक समाज हा संस्कृती विकणारा-विकत घेणारा समाज होत चालला आहे. भाषा ही एकाच वेळी भाषाही असते आणि संस्कृतीची वाहकही असते. जागतिक वाङ््मयीन क्षेत्रात ‘बेस्ट सेलर्स’ची जी प्रथा निर्माण झाली आहे त्या प्रथेपासून मराठी लेखक अद्यापही अलिप्त आहेत. बेस्ट सेलर्सच्या या यादीत एकही मराठी लेखक नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे जगातल्या अनेक अस्पर्शित राहिलेल्या संस्कृती वेगाने जागतिक प्रवाहाशी जोडल्या जात असताना मराठी लेखकांची मजल जास्तीत जास्त ज्ञानपीठापर्यंतच गेलेली आढळून येते. जागतिक वाङमय बाजारपेठेत खपणाऱ्या साहित्याच्या लेखनाचा जो व्यवसाय नावारूपाला आलेला आहे, त्या व्यवसायात एकाही मराठी लेखकाला अद्यापही यश आलेले नाही, याचे कारण काय? याचाही विचार होणे गरजेचे आहे. कारण व्यावसायिक लेखकाची संकल्पना अजून मराठीत रुजलेली दिसत नाही, हे वास्तव आहे. ती संकल्पना रुजणे हे मराठीच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ‘मराठीतून लेखन’ हे करिअर म्हणून मराठी लेखकांनी स्वीकारले, तर ते मराठी भाषा साहित्याला त्याच्या विकास-समृद्धतेला हातभार लावणारेच ठरेल.
लेखक भाषा अभ्यासक आहेत
arke.rajiv@gmail.com
बातम्या आणखी आहेत...