आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Meeting Of Leaders Of Old Janta Dal

जगप्रवाह - पुनश्च हरिओम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार व उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पूर्वाश्रमीच्या जनता दलातील नेत्यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात नेत्रदीपक यश मिळवत समाजवादी पार्टी व बसपाचा पार धुव्वा उडवला होता. तसेच यश त्यांना बिहारमध्ये मिळाले नसले तरी नितीशकुमार यांचा जनता दल (सं) व लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल या पक्षांचा मोठा जनाधार आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आले होते. भाजपने हिंदुत्व व विकासाला घातलेली साद एकीकडे दोन्ही राज्यांच्या जातीय समीकरणाच्या राजकारणाला धक्का देणारी होती व शिवाय ती यादवकुलीन नेत्यांना इशाराही देणारी होती. त्यातच खुद्द मोदींचा झंझावात इतका होता की तिसऱ्या आघाडीची शकले उडाली होती. त्यामुळेच २०१५ मध्ये बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका व २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचा रथ रोखण्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत बिगर भाजप राजकारणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. हे नवे राजकारण कसे असेल याचे स्वरूप स्पष्ट होण्यास थोडा वेळ लागेल; पण संसदेत व संसदेबाहेर भाजपला रोखण्याची गरज जुन्या जनता दलातील नेत्यांना वाटू लागली आहे, हे महत्त्वाचे आहे. या बैठकीत मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, शरद यादव, देवेगौडा उपस्थित होते. हेच नेते २४ वर्षांपूर्वी स्वत:च्या स्वार्थासाठी एकमेकांना शह-काटशह देत एकमेकांना दूषणे देत वेगळे झाले होते. सध्याच्या राजकीय परिप्रेक्ष्यात कमकुवत झालेली काँग्रेस यांच्यासाठी जमेची बाजू आहे. भाजपकडे मध्यमवर्ग असला तरी बाकीचे समाजगट आपल्याकडे वळू शकतात, असा विश्वास या नेत्यांना वाटत आहे. १९९८ मध्ये जनता दलाने देशाची सत्ता मिळवली होती; पण नंतर हेव्यादाव्यात या पक्षाच्या फुटून ठिकऱ्या झाल्या होत्या. सध्या या नेत्यांकडे लोकसभेत १५ व राज्यसभेत २५ खासदार असून उत्तर प्रदेश व बिहार ही महत्त्वाची राज्ये ताब्यात आहेत. हे राजकीय चित्र नवे राजकारण उभे करण्यास पुरेसे आहे. या राजकारणाची सूत्रे ज्येष्ठ नेते म्हणून मुलायमसिंह यादव यांच्याकडे दिली आहेत. त्यांना लालू, नितीश, शरद यादव यांना समजून उमजून हा गाडा पुढे रेटायचा आहे. भाजपविरोधात उभी झालेली ही आघाडी संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारला कसा विरोध करते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.