आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी अन्नाच्या दर्जाचे प्रकरण गांभीर्याने घ्यावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीएसएफच्या एका जवानाने त्यांना मिळणारे निकृष्ट दर्जाचे अन्न व सुविधा दर्शवणारे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. यात कमी दर्जाचे अन्न तसेच अधिकारी जेवणाच्या साहित्याचा काळाबाजार कसा करतात, याकडे लक्ष वेधले आहे. ज्या देशात सैनिकांचे दाखले देत नागरिकांना दोन महिने रांगेत उभे केले , नागरिकांना याद्वारेच सैनिक होण्याचे आवाहन करण्यात आले, त्याच देशात सैनिकांशी असे वर्तन हे दुर्दैव आहे. स्वत:पूर्वी देशाचे हित पाहणाऱ्या सैनिकांना कधी वन रँक वन पेन्शनसाठी प्राण गमवावे लागले, तर कधी सर्जिकल स्ट्राइकच्या विश्वसनीयतेवरून त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले गेले. पण सध्याचा मुद्दा गंभीर आहे. 

चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच या  सैनिकाला दारुडा, उद्धट, बेशिस्त असे म्हटले आहे. चौकशी अहवाल अनेक प्रक्रियांतून पुढे येईल. त्यात ‘गरजेनुसार’ बदलही होतील; पण या सैनिकाने घेतलेला सत्य उघड करण्याचा निर्णय दुर्लक्षित करता येणार नाही. यामुळे तो स्वत: संकटात आहेच, पण जवानांच्या प्रतिमेवरही आघात झाला आहे. हा केवळ अपवाद मानून सैनिकांच्या अशा शोषणाची दखल न घेणे आपल्याला महागात पडू शकते. केवळ भारतीय लष्कराचा एक भाग म्हणून एखाद्या अधिकाऱ्याचा सन्मान होणे चुकीचे आहे.  अधिकाऱ्यांची निष्क्रियता, जवानांवर विश्वास नसणे या कारणांमुळे संबंधित सैनिकाने प्रत्यक्ष देशातील नागरिकांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले असावे.  ही घटना भविष्यासाठी एक चांगला धडा ठरू शकते. यामुळे भारतीय लष्कराला मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा दर्जाही सुधारू शकतो. दरम्यान, लष्करप्रमुखांनी सैनिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या तक्रारी मांडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर न करता लष्करातीलच यंत्रणेचा वापर करावा किंवा थेट त्यांच्याशी संपर्क साधावा. आता सैनिकांनी या संधीचा फायदा घेणे आवश्यक आहे.
 
अजय पवार,२०   
जेएनयू, नवी दिल्ली