आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बावन्नकुळी सत्ताचातुर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकारितेत काही अनुभव नेहमीच येत असतात. त्यातला एक अनुभव म्हणजे अवैध धंद्यांच्या विरोधात बातमी दिली किंवा काही टीका-टिप्पणी केली की पोलिस त्या धंदेवाल्यांकडे जातात. त्यांना सांगतात, आम्हाला आता तुमच्यावर कारवाई करावी लागेल आणि तुमचा धंदा बंद करावा लागेल. कारण तो अमुक-अमुक पत्रकार तुमच्या विरोधात बातम्या देतो आहे, लेख िलहून आमच्यावर टीका करतोय. तुम्ही त्याला भेटून समजवा आणि बातम्या, लेख बंद करायला सांगा. नाही तर उद्यापासून तुमचा धंदा बंद. मग तो अवैध धंदेवाला त्या पत्रकाराला भेटण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही कसे उपाशी मरू, आमच्या धंदा कसा प्रामाणिकपणे आम्ही करतोय हे पटवून देण्याचा आटापिटा करतो. त्याने काम भागले नाही तर कधी धमकी देतो, तर कधी लालूच दाखवतो. हे आठवण्याचे कारण विद्यमान सरकारमधील उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवलेली ‘तत्परता’ आहे. 

अहमदनगरमध्ये ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात बनावट दारूमुळे १३ जणांचे बळी गेले. त्यातले ९ बळी तर निवडणूक प्रचारकांना उमेदवारांनी दिलेल्या पार्टीतले आहेत. ही बनावट दारू जिल्हा रुग्णालयाच्या अधिकृत कँटीनमध्ये बनवली जात होती आणि वर्षानुवर्षे तो गोरखधंदा बिनदिक्कत चालत होता. विषबाधा होऊन बळी गेले नसते तर आजही तो प्रकार सुरूच असता. बळी गेल्यानंतर त्यावरचा (की प्रशासनाच्या डोळ्यांवरचा?) पडदा उघडला आणि तो कारखाना उजेडात आला. कँटीन चालकाला आणि तिथल्या परवानाधारकाला अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागातल्या काही कर्मचाऱ्यांची बदली केली आणि विषय संपला. आज सारे काही नगरकरांच्याही विस्मरणात गेल्यासारखे आहे.  

माध्यमांमधून फारसा गवगवा न होता लवकर विषय संपला म्हणून मंत्री आणि अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला होता; पण त्याच जिल्ह्यातले अण्णा हजारे स्वस्थ बसतील तेव्हा ना! त्यांनी विषय मिळत नसलेल्या पत्रकारासारखा अहमदनगर जिल्ह्यातल्या अवैध दारू व्यवसायाचा मुद्दा उकरून काढला आणि थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहिले. या प्रकरणात ठोस कारवाईची गरज प्रतिपादन करीत जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी केली. 

खरे तर अण्णांनी ही मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीच त्यांना प्रतिसाद देणे अपेक्षित होते; पण संपूर्ण राज्याचा कारभार पाहायचा असल्याने त्यांनी हे काम राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोपवले. बावनकुळेंनीही अण्णांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेणे अपेक्षित होते. नाही प्रत्यक्ष भेट, तर निदान त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करायला हवा होता. तोही नाही तर निदान स्वत: त्यांना पत्र लिहून कारवाईबाबतची वस्तुस्थिती समजावून सांगायला हवी होती; पण त्यांनाही ५०० मीटर्सच्या अटीमुळे सध्या बरेच काम करावे लागत असावे आणि त्यात वेळ मिळत नसावा. त्यामुळे त्यांनी ज्यांच्याविरुद्ध अण्णांची तक्रार आहे त्यांनाच अण्णांना भेटायला पाठवले. 

तुम्ही संबंधितांवर कशी कारवाई केली आहे आणि अवैध धंद्यांवर कसे प्रामाणिकपणे नियंत्रण आणले आहे हे समजावून या असे फर्मानच त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना काढले. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव शनिवारी अण्णांना भेटायला जाऊन आल्या. अण्णांनी त्यांना जे काही सुनवायचे ते सुनावले आहे, अशी माहिती आहे. आहे ना मंत्री बावनकुळे यांची तत्परता पोलिसांसारखी! 

अण्णा हजारेंच्या भूमिकांचेच भांडवल करीत भाजपने सत्तास्थान जवळ केले, हा इतिहास फार जुना नाही. आजच्या विरोधकांना तसे भांडवल करता येत नाही हे विद्यमान सरकारचे भाग्य आहे. कारण आजच्या विरोधी पक्षांना अण्णांनी आधीच उघडे पाडले आहे. व्यक्ती टेबलाच्या कोणत्या बाजूला बसली आहे यावर त्याची भाषा आणि भूमिका ठरते, असे म्हटले जाते. विद्यमान सत्ताधाऱ्यांचे तसे झाले आहे आणि म्हणून अण्णा हजारेंना एखादा फोन करण्याचीही तसदीही ते आता घेऊ इच्छित नाहीत. उलट ज्यांच्यावर अण्णांचे आक्षेप आहेत त्यांनाच चर्चेसाठी पाठवण्याची हिंमत ते करीत आहेत.

याला उद्दामपणा म्हणायचा की खुळेपणा हे ज्याने त्याने ठरवावे. बनावट दारूमुळे ज्ञात १३ जणांचे बळी गेले त्याच वेळी संबंधित दोन्ही अधीक्षकांवर कारवाई होणे अपेक्षित होते. कारण आपल्या खात्याच्या कारभारावर या दोन्ही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही हेच त्या घटनेने दाखवून दिले होते. तसे करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्याचे काम सरकार करते आहे.  मग सगळे सत्ताधारी सारखेच, असा विचार सर्वसामान्यांनी का करू नये? 
- दीपक पटवे, निवासी संपादक, औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...