आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Ministers Whose Portfolio's Has Changed

जगप्रवाह - मंत्रिपदाची कार्यक्षमतेशी गाठ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनहिताच्या महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात सदानंद गौडा, हर्षवर्धन यांना अपयश आले. त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. एकंदरीत कार्यक्षमता दाखवा असाच मोदीमंत्र आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा व केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन या दोघांची मंत्रिपदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी काढून घेतल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरणे साहजिकच होते. कारण पाच महिन्यांपूर्वी सदानंद गौडा यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कारभार सोपवण्याचा निर्णय मोदींनी विचारपूर्वक घेतल्याचे सांगितले जात होते. गौडा हे संघाचे कट्टर व निष्ठावान स्वयंसेवक तर आहेतच; पण त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपदही भूषवले होते. प्रशासन सांभाळण्यात ते नवखे नसल्याने मोदींना हवे असलेले रेल्वेचे आधुनिकीकरण ते सहजगत्या करतील असे वाटले होते; पण प्रत्यक्षात पाच महिन्यांच्या कालावधीत गौडा यांनी रेल्वेमध्ये आणल्या जाणाऱ्या बहुचर्चित एफडीआय धोरणाचा रोडमॅपही पंतप्रधानांना सादर केलेला नाही. मोदींना देशातील काही निवडक रेल्वेस्थानकांवर मोफत वाय-फाय तंत्रज्ञान तातडीने सुरू करायचे होते. त्याबाबतही गौडा यांच्याकडून फारशी हालचाल दिसली नाही. ज्याचा गाजावाजा केला जात होता ती बुलेट ट्रेन योजनाही अशीच गटांगळ्या खात पडली आहे. वास्तविक, रेल्वे मंत्रालयाचा कारभार चालवण्याला प्रचंड प्रशासकीय कौशल्य लागते. येथे रेल्वेमंत्र्याला स्वत:च्या बळावर निर्णय घेऊन चालत नसते तर त्याला रेल्वे बोर्ड, रेल्वेतील विविध अंतर्गत खाती, देशव्यापी पसरलेल्या नोकरशाहीतील शहकाटशहाचे राजकारण यांनाही सामोरे जावे लागते. एकंदरीत त्यांना नोकरशाहीवर अंकुश ठेवता आला नसल्यामुळे मोदी समाधानी नव्हते. हर्षवर्धन यांच्या कारभारावरही मोदी नाराज होते. सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदींनी नॅशनल हेल्थ अॅशुरन्स या योजनेवर आरोग्य खात्याने वेगाने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या योजनेनुसार गरिबांना मोफत औषधे, उपचार व विमा कवच मिळणार असल्याने मोदींच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाकांक्षी अशी होती. या योजनेचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने १५ सप्टेंबरला आपला मसुदा आरोग्य खात्याला सादरही केला होता; पण हर्षवर्धन यांच्याकडून या संदर्भातील फायली पुढे जाण्यास विलंब झाला. त्यातच हर्षवर्धन यांनी तंबाखूविरोधी मोहिमा हाती घेतल्यामुळे तंबाखू उत्पादकांची लॉबीही नाराज होती. ही नाराजी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्याने त्यांना मंत्रिपद गमवावे लागले, असे बोलले जाते. एकंदरीत काम दाखवा असाच मोदीमंत्र भाजपच्या मंत्र्यांना या निमित्ताने पोहोचवण्यात आला आहे.