आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे, ‘आप’चा प्रभाव ओसरला?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये महाराष्ट्रात मनसे व देशात आम आदमी पार्टी हे प्रादेशिक पक्ष आपला ठसा उमटवतील असे वाटत होते. प्रारंभी या पक्षांच्या सभांना होणारी गर्दी पाहता मोठ्या पक्षांनीही त्यांची धास्ती घेतली होती. पण जसजसा प्रचार रंगत आला तसे मूळ मुद्दे जाऊन वेगळेच वातावरण निर्माण झाले. उदाहरणार्थ - राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामधील आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर घसरल्याने राज ठाकरेंकडून वेगळ्या राजकारणाची अपेक्षा करणारा मतदार नाराज झाला. आता गर्दी जमत नसल्याने त्यांच्या 10 ते 12 सभा रद्द कराव्या लागल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठीचा मुद्दा व ठाकरे घराण्यातील भाऊबंदकी याशिवाय दुसरे काहीच नसल्याने त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे मनोरंजन अशीच भावना सर्वत्र पसरली आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी लाख-दीड लाखाहून अधिक मते मिळवल्याने या मतविभाजनाचा फटका शिवसेना-भाजप युतीला बसला होता. आता 2014च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे प्रतिपक्षांना अडचणीत आणतील असे अपेक्षित असताना प्रत्यक्षात बार फुसकाच ठरला. तीच गत अफाट लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेल्या आम आदमी पार्टीचीही आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी करून या पक्षाने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. लोकसभेच्या निवडणुकीत आप महाराष्ट्राच्या राजकारणात घुसळण करेल असेही वाटत होते. पण तसे चित्र दिसत नाही. खुद्द केजरीवाल यांनी मुंबईचा रोड शो वगळता महाराष्ट्राकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आपच्या उमेदवारांचे मनोबल उंचावलेले दिसत नाही. आपचे अनेक उमेदवार स्वत:च्या ताकदीवर निवडणुका लढवत आहेत. पक्षाचे धोरण स्पष्ट नसल्याचे हे चिन्ह आहे. आता प्रचारही भ्रष्टाचार, महागाईपासून दूर होत जातीयवादावर केंद्रित झाला आहे. या दोन पक्षांकडून लोकांना फार अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या असे वाटत नाही.