आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिघडलेले नवनिर्माण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे यांचे संपूर्ण राजकारण हे पराकोटीचे आत्मकेंद्री आहे. मी म्हणजेच पक्ष या धारणेतून हम करे सो कायदा या तत्त्वानुसार ते पक्ष चालवतात. राज यांना प्रथमच या शैलीला मुरड घालावी लागली आहे.
रोखठोक बोलणे आणि धक्कातंत्राचा वापर हा राज ठाकरे यांचा यूएसपी. पण ते तंत्र त्यांच्यावरच उलटण्याचा प्रसंग त्यांच्याच बालेकिल्ल्यात अर्थात नाशकात घडला तो आमदार वसंत गिते यांच्या नाराजीनाट्याने. राज यांच्या नाशिक दौर्‍याकडे चक्क पाठ फिरवून गिते यांनी ‘अरे’ ला ‘कारे’ करत द्यायचा तो संदेश नेतृत्वाला दिला आहे. अन्य पक्षांच्या वा नेत्यांच्या बाबतीत हे घडले असते तर राजकारणात असे चालतेच म्हणून त्याकडे पाहिले गेले असते. परंतु ज्या धाटणीने राज ठाकरे यांचे राजकारण चालते ते पाहता गिते यांचा पवित्रा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांची त्याला असलेली पार्श्वभूमी अधिक महत्त्वाची आहे. कारण राज ठाकरे यांचे संपूर्ण राजकारण हे पराकोटीचे आत्मकेंद्री आहे. मी म्हणजेच पक्ष या धारणेतून हम करे सो कायदा या तत्त्वानुसार ते पक्ष चालवतात. किंबहुना, घणाघाती वक्तृत्व हाच त्यांच्या नेतृत्वाचा पाया राहिला आहे. त्यामुळे अल्पावधीत मनसेची भरभराट झाली, या पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मतेही मिळाली. नाशिकमध्ये तर तीन आमदार आणि महापालिकेत सत्ता आली. अर्थात, त्यासाठी राज यांच्या वक्तृत्वाबरोबरच गिते यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांचे संघटन, लोकसंपर्क या बाबीही कारणीभूत होत्या. पण त्याकडे साफ डोळेझाक करत केवळ आपली बोलबच्चनगिरीच काय ती महत्त्वाची असा गंड बहुधा राज यांना झाला असावा. दरम्यानच्या काळात गिते यांच्याही कार्यपद्धतीबाबत कुरकुर सुरू झाली. त्याच वेळी खरे तर सामोपचाराने हा तिढा सोडवता आला असता, पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने काट्याचा नायटा झाला. त्यातूनच दस्तुरखुद्द राज हे नाशिक मुक्कामी आले असता त्यांच्या संपूर्ण दौर्‍याकडे कानाडोळा गिते करू धजले. अखेर आपल्या दोनदिवसीय दौर्‍याच्या उत्तरार्धात अन्य शिलेदारांना गितेंच्या निवासस्थानी धाडून व त्यांची समजूत घालून गिते यांच्या भेटीचे नाट्य पार पाडले गेले. त्यामुळे तूर्त हे पेल्यातले वादळ ठरले आहे. मात्र त्यामुळे राज यांना प्रथमच आपल्या शैलीला मुरड घालावी लागली, हे विसरून चालणार नाही. नजीकच्या भविष्यातील नवनिर्माणाचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे, त्याची ही एक चुणूकच म्हणावी लागेल.