आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैसा बोलता है!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची प्रतिमा मलिन असूनही त्यांच्या हाती आयसीसीची सूत्रे सोपवण्याची घाई जागतिक संघटनेने केली नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो.

आयपीएल क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे जावयामार्फत उडालेले शिंतोडे अंगावर झेलत, बीसीसीआयमधील सत्तेच्या नाड्या हातात ठेवणार्‍या एन. श्रीनिवासन यांना अखेर आयसीसीच्या चेअरमनपदाची खुर्ची बळकावण्यात यश आले आहे. भारतीय जनतेचे प्रचंड क्रिकेटप्रेम आणि त्यामुळे मिळणार्‍या जाहिराती ही आपलीच मक्तेदारी मानणार्‍या बीसीसीआयचे आयसीसीवरील वर्चस्व वाढले आहे. तेदेखील आपल्यामुळेच घडल्याचे मानणार्‍या श्रीनिवासन यांनी ते नामधारी सदस्यांच्या गळी उतरवण्यात यश मिळवले. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य सदस्यांशी पंगा न घेता त्यांनाही सत्तेच्या आणि लाभाच्या वाट्यात त्यांनी सहभागी करून घेतले. वेस्ट इंडीजपासून न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान या देशांच्या डबघाईला आलेल्या क्रिकेट बोर्डांनाही नमते घ्यावे लागले. 54 देशांच्या आयसीसीमधील अन्य सदस्यांचे अस्तित्व ते काय? त्यांच्यापुढे त्यांनी आर्थिक लाभाचे दाणे टाकले आणि आपली नियुक्ती करून घेतली. ज्या देशाचे एन. श्रीनिवासन हे प्रतिनिधित्व करतात, त्या देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेनेही ज्या व्यक्तीच्या सचोटीबद्दल शंका व्यक्त करून त्यांना बीसीसीआयपासून दूर ठेवले आहे. अशा व्यक्तीला निष्कलंक म्हणून सिद्ध होण्याआधीच आयसीसीने जागतिक क्रिकेटच्या विकासाच्या, धोरणाच्या, आर्थिक निर्णयाच्या चाव्या दिल्या आहेत. स्वत:च्या पदाचा गेले दशकभर वापर करून आयपीएल व अन्य ठिकाणी लाभ घेण्याचा स्पष्ट आरोपही श्रीनिवासन यांच्यावर आहे. आपलीच माणसे त्यांनी बीसीसीआयमध्ये पेरली तीदेखील बीसीसीआयच्या तिजोरीतून मानधन देऊन. आयपीएल घोटाळ्यात ज्या व्यक्तीचा जावई गोवला गेला आहे, ती व्यक्ती योग्य प्रकारे चौकशी करू देणार नाही, हे वारंवार स्पष्ट करूनही श्रीनिवासन यांनी खुर्ची सोडली नाही. याच श्रीनिवासन यांनी आयसीसी चेअरमनपदावरील नियुक्ती झाल्यानंतर मेलबर्न येथे धडधडीत खोटे विधान केले. त्यांनी म्हटले की, ‘मला न्यायालयाने काढले नाही, तर मी स्वत:हून बाजूला झालो आहे’. मात्र, या निमित्ताने खेदाने म्हणावेसे वाटते की, मलिन प्रतिमा असलेल्या व्यक्तीच्या हाती आयसीसीची सूत्रे सोपवण्याची घाई, तर जागतिक संघटनेने केली नाही ना की भारताच्या प्रचंड आर्थिक दबावाखाली येऊन आयसीसीने ही कृती केली?