आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑर्कुटचा निरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या आठवणींमध्ये रमण्याचा तसा प्रत्येकाचा छंद असतो. त्याकडे वय वाढत जाते तसे पाहण्याची दृष्टीही बदलत जाते. आपल्या आयुष्यात इंटरनेटने प्रवेश केला त्यालाही आता जुनी आठवण म्हणण्याची वेळ आली. त्याहून पुढे जायचे म्हटले तर फेसबुकसारख्या माध्यमाने संवादाचे जग व्यापले असताना दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ऑर्कुटविषयीदेखील आता लोकांमध्ये ‘नॉस्टेल्जिया’ निर्माण झाला आहे. खर्‍या अर्थाने व्हर्च्युअल संवादविश्व रुजवणारे ऑर्कुट येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सर्वांचा निरोप घेते आहे. यानिमित्ताने ऑर्कुटने युजरना पाठवलेले ई-मेल्स युजरच्या मनात नक्कीच जुन्या आठवणींना उजाळा देणारे ठरले असतील. ऑर्कुट सुरू झाले होते तेव्हा व्हर्च्युअल मैत्री, त्यातून चॅटिंग हे जी-मेलच्याही पलीकडे जाऊ शकते याचे प्रत्यंतर येऊ लागले. ऑर्कुटवर आपल्याच प्रतिमेच्या प्रेमात पडत आपले फोटो प्रसिद्ध करण्यापासून आपली प्रोफाइलदेखील इतरांसाठी उपलब्ध करणे, तिथे जमलेल्या ‘ई-फ्रेंड्स’शी गप्पा मारणे, एखाद्या विधानावर प्रतिक्रिया मिळवणे हे सगळे नवे व्यासपीठ सुरुवातीला जितके आकर्षित करणारे ठरले, तितकेच अनेक प्रश्नही उपस्थित करणारे ठरले. ऑर्कुटवर टाकल्या जाणार्‍या फोटोची व माहितीची सुरक्षितता, तिथल्या कधीही न भेटलेल्या मित्रांची विश्वासार्हता अशा शंका उपस्थित व्हायला लागल्या, त्यांना न जुमानता ऑर्कुट प्रायव्हसी सेटिंगच्या आधारे चालूच राहिले. स्क्रीनची थीम बदलून पेजचा लूक आकर्षक करण्याच्या कुतूहलापासून ‘यू मे नो धिस फ्रेंड...अ‍ॅड हिम’ अशा ऑर्कुटच्या मित्र सुचवण्याच्या पद्धतीपर्यंत युजर ऑर्कुटचा मनमुक्त वापर करत राहिले. अर्थात, ऑर्कुटने पाठवलेल्या निरोपाच्या ई-मेलमध्ये स्वत:च कबुली दिली आहे की फेसबुक, गुगल प्लस सारख्या माध्यमांनी युजरचे जग काबीज केले असताना सोशल नेटवर्किंगमध्ये आम्ही आता फारसे लोकप्रिय राहिलो नाही. म्हणूनच अत्यंत योग्य वेळी ऑर्कुटने माघार घेतली आहे. संवादविश्वातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ऑर्कुटकडे पाहता येईल. फेसबुकच्या काळात वाढलेल्या पिढीला ऑर्कुटची मजा कदाचित कळणार नाही, पण ऑर्कुटची साक्षीदार राहिलेली पिढी मात्र पुढील काही महिने नॉस्टेल्जियामध्ये रमणार हे मात्र नक्की!