आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरापतखोर पाकिस्तान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान व भारतादरम्यान नववर्षाच्या प्रारंभापासून वाढलेला तणाव लवकर निवळण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. गेल्या 31 डिसेंबर रोजी रात्री दोन पाकिस्तानी मच्छीमार बोटींनी भारतीय हद्दीत संशयास्पदरीत्या घुसखोरी केल्याची माहिती अमेरिकी तपास यंत्रणांनी तटरक्षक दलाला दिली.
या बोटींमध्ये स्फोटके असण्याची शक्यता असून त्या पोरबंदरच्या दिशेने चालल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या दोन बोटींपैकी एक बोट माघारी फिरली. पण तटरक्षक दलाने दुसऱ्या बोटीला घेरताच तिच्यातील चार व्यक्तींनी ही बोट उडवून दिली. या बोटींवरच्या लोकांचे वायरलेसवरून जे संभाषण सुरू होते ते तटरक्षक दलाने मिळविले असून त्यातून हे लोक पाकिस्तानी लष्कराच्या तसेच थायलंडमधील एका व्यक्तीच्या सातत्याने संपर्कात होते हे उघड झाले आहे. या सबळ पुराव्यांमुळे आता पाकिस्तानची विलक्षण कोंडी झालेली आहे. समुद्रमार्गे घुसखोरी करून २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर भीषण हल्ला चढविला होता. तशाच पद्धतीने १ जानेवारी रोजी पाक दहशतवादी पुन्हा भारतात हल्ले घडविण्याच्या मोहिमेवर निघाले होते अशी शक्यता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. सुदैवाने पाकिस्तानचे हे प्रयत्न तटरक्षक दलाने हाणून पाडले. पेशावरमधील शाळेत जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारतातही अशाच प्रकारचा घातपात करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होईल अशी शक्यता होतीच.
दुस-या बाजूस शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून सीमेवर पाकचे सैनिक भारतीय लष्करावर तुफानी हल्ले चढवत होते. डिसेंबरमध्ये थोडा खंड पडला होता. गेल्या तीन-चार दिवसांत हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. जम्मू-काश्मिरातील कठुआ व सांबा भागामध्ये शनिवारी भारतीय हद्दीतील १३ गावांवर व लष्करी ठाण्यांवर केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद तर एक महिला मृत्युमुखी पडली. आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेले हल्ले व दुस-या बाजूने पाकिस्तानी बोटींची समुद्रमार्गे भारतीय हद्दीत होणारी घुसखोरी हा एका व्यापक कटाचा भाग असल्याचे गुप्तचर संस्थांना वाटते. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणे हाच त्या देशाची घातक वृत्ती चेचण्यासाठी उत्तम उपाय होऊ शकतो. भारतीय लष्कर सध्या नेमके तेच करीत आहे.