आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेपूट वाकडेच! (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट व उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले. याबद्दल भारताच्या मनात तीव्र संताप होताच. पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानी राज्यकर्ते व लष्कराला योग्य तो इशारा दिलाच; मात्र त्यानंतरही पाकिस्तानी लष्कराचे वाकडे शेपूट सरळ होण्यास तयार नाही. सर्जिकल स्ट्राइकनंतरही शस्त्रसंधी मोडून पाकिस्तानी लष्कर सीमाभागात सातत्याने गोळीबार करत असून त्यात आतापर्यंत १८ भारतीय जवान शहीद झाले. मंगळवारी पहाटे पाकिस्तानी लष्कराने हद्दच केली. काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये गोळीबारात शहीद झालेल्या तीन भारतीय जवानांपैकी एका जवानाच्या मृतदेहाची पाकिस्तानी सैनिकांनी विटंबना केली. पाकिस्तानी लष्कराची ही विकृत मनोवृत्ती काही आजची नाही. गेल्या २८ ऑक्टोबरला बीएसएफचे जवान मनदीपसिंग तसेच २०१३ साली लान्सनायक हेमराज आणि सुधाकरसिंह या शहीद जवानांच्या मृतदेहांची विटंबना पाकिस्तानी सैनिकांनी केलेली होती. २००१ साली बांगलादेशच्या सैनिकांनी बीएसएफ जवानांच्या मृतदेहांची अशीच विटंबना केली, तेव्हा भारतीय लष्कराने खणखणीत धडा शिकविला होता. शत्रूसैन्याच्या मारल्या गेलेल्या सैनिकाचा मृतदेह हाती लागला तर त्याची विटंबना न करता तो मृतदेह त्याच्या मायदेशी सर्व काळजी घेऊन परत करावा, असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. त्या संकेतालाच पाकिस्तानी लष्कराने हरताळ फासला. मंगळवारी पाकिस्तानबरोबर झालेल्या चकमकीत जे तीन भारतीय जवान ठार झाले, त्या हानीनंतर भारतातील प्रसारमाध्यमांनी पुन्हा एकदा आपल्या देशाच्या लष्कराचे पाकिस्तानबरोबरच्या संघर्षात खूप नुकसान होत असल्याचा दांभिक सूर लावला आहे. शत्रूदेशाच्या सैनिकांबरोबर संघर्ष करताना लष्करी जवानांची प्राणहानी होणे हे अटळ असते. भारतीय लष्कराच्या अंगी व्यावसायिक शिस्त बाणलेली असल्याने ते या गोष्टीचा बाऊ अजिबात करत नाहीत. मात्र, देशातील प्रसारमाध्यमे नुकसानीच्या वेडगळ कल्पना रंगवत एक प्रकारे भारतीय लष्कराचे खच्चीकरण करत आहेत. हे आता त्वरित थांबायला हवे. सर्जिकल स्ट्राइकनंतरही पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवरील हल्ल्यात तसेच देशांतर्गत घातपाती कारवायांत वाढ होईल, हे वास्तव लष्करी तज्ज्ञांनीच सांगितले आहे. त्यानंतरही देशातील काही माध्यमपंडितांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही!

पाकिस्तानने सीमेवर हल्ले वाढविलेले असले तरी त्याला भारतीय लष्करानेही बुधवारी जोरदार चोख प्रत्युत्तर दिले. कोणत्याही लष्करी कारवाईत जशास तसे हा बाणा उपयुक्त असतो. एका बाजूला पाकिस्तानचा अशा कणखर पद्धतीने मुकाबला करत दुसऱ्या बाजूला विविध वादग्रस्त प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्या देशाबरोबर सातत्याने चर्चा करत राहणे हीच योग्य नीती आहे. त्या देशाशी जी युद्धे झाली त्यातूनही कोणतेच मतभेद मिटलेले नाहीत हे दिसले. पाकिस्तानशी संबंध पूर्णपणे तोडून टाकणे हा राजनैतिकदृष्ट्याही योग्य मार्ग असू शकत नाही. त्यामुळे भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, अशी भाषा करणाऱ्या शिवसेनेसारख्या उथळ विचारसरणीच्या पक्षाला कोणीही गांभीर्याने घेता कामा नये. पाकिस्तानात असलेली लोकशाही कचकड्याची आहे. पंतप्रधान आपण असलो तरी देशात अंतिम सत्ता ही लष्कराची आहे, हे नवाझ शरीफ यांना माहिती आहे. त्याचे चटकेही त्यांनी पूर्वी सोसलेले आहेत. या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होण्याची शक्यता असलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी आपल्या कारकीर्दीत वझिरिस्तान, बलुचिस्तानमध्ये लष्करी कारवाई करून तेथील स्वातंत्र्यवादी लोकांना दडपण्याचे व वेळप्रसंगी संपविण्याचे काम केले. सिंध प्रांतातही त्यांनी अशीच कारवाई केली. या भागांतील अस्वस्थतेमुळे पाकिस्तान फुटीच्या उंबरठ्यावर केव्हाही उभा राहू शकतो. मात्र, ती वेळ राहिल शरीफ यांनी लष्करी कारवाईने पुढे ढकलली इतकेच. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानने भारताला शस्त्रसंधीचा दिलेला शब्द पाळला होता. मात्र, तो नंतर त्या लष्कराने खुंटीवर टांगला. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे भारतद्वेष्ट्या राहिल शरीफ यांच्या कारकीर्दीच्या दिमाखाला जोरदार धक्का बसला आहे. राहिल आपल्या पदावरून निवृत्त होतील किंवा पुढेही कायम राहतील अथवा त्यांच्या जागी नवीन लष्करप्रमुख येईल, पण भारतीय लष्करावर हल्ले करण्याचे धोरण भविष्यातही पाकिस्तान सुरूच ठेवेल. सर्जिकल स्ट्राइक हा भारतीय लष्कराच्या व्यूहनीतीचा एक भाग होता. तो काही अंतिम हल्लाबोल नव्हता. भविष्यात असेच अनेक धक्के देत पाकिस्तानला वठणीवर आणावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...