आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगांची धट्टीकट्टी दुनिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धट्ट्याकट्ट्यांचं ऑलिम्पिक अन् अपंगांचं पॅरालिम्पिक. दोन आठवड्यांच्या अंतरानं पंचखंडातील साडेदहा हजार ते साडेचार हजार खेळाडूंतील हे महामेळावे रंगले ब्राझीलमध्ये रिओ द जानेरिअोत. ऑलिम्पिकमध्ये आपल्या ११७ खेळाडूंच्या हाती लागली दोन पदकं. पण वीसपेक्षाही कमी अपंगांनी भारताच्या खात्यात जमा केली एका सुवर्णासह चार पदकं. धट्टेकट्टे व अपंग यांना एका पंगतीत न बसवताही रसिकजन निष्कर्ष काढू लागले. भारतात धट्ट्याकट्ट्या खेळाडूंची संघटन व संयोजन यंत्रणा आहे. अपंग वा लुळीपांगळी, पण त्यामानाने अपंगांची अगदी छोटी यंत्रणा मात्र भ्रष्ट असूनही थोडीशी तरी धट्टीकट्टी आहे!

अपंगत्वाच्या एफ-४६ विभागातील भालाफेकीत राजस्थानी देवेंद्र झाझरियाचे २००४ पॅरालिम्पिक्सपाठोपाठ दुसरे सुवर्णपदक (२००८ व २०१२ च्या पॅरालिम्पिक्समध्ये या स्पर्धेस वगळण्यात आलं होतं). त्याला राजस्थाननं ७५ लाखांचं इनाम जाहीर केलं. गोळाफेकीत रौप्यपदक पटकावणारी दीपा मलिक ही पॅरालिम्पिकमधील पहिलीच भारतीय पदक विजेती. हरियाणा तिला चार कोटी रु. देऊन सन्मानित करणार आहे. उंच उडीतील अजिंक्यवीर थांगवेलू मय्यपनने तामिळनाडू सरकारच्या घोषित दोन कोटी रु. इनामातील किमान दहा टक्के रक्कम आपल्याला घडवणाऱ्या संस्थेस देण्याचा मनोदय व्यक्त केलाय. चौथा मानकरी उंच उडीतील ब्राँझपदक जेता वरुण भाटिया. हात वा पाय पूर्णपणे वा अंशत: गमावणाऱ्यावर एखाद्या कोपऱ्यात रडत -कुढत न बसणाऱ्या या जिगरबाजांना सलाम.

देवेंद्र झाझरियाच्या दोन सुवर्णांचे दोन भागीदार : १९९७ ते २००४ चे अथेन्स पॅरालिम्पिक या प्राथमिक व खडतर वाटचालीतील त्याचे मूळ प्रशिक्षक रिपुरमन सिंग अन् २०१६ मध्ये त्याला मार्गदर्शन करणारे भारतीय क्रीडा प्राधिकरणातील प्रशिक्षक सुनील तनवर. रिपुदमन सिंग मोठ्या हौशीने हनुमानगडला आपलं केंद्र चालवतात. जयपूरपासून अंदाजे चारशे किलोमीटर दूर असलेल्या या केंद्राचं रंगरूप आधुनिक नसेलही अन् नाहीही! पण रेतीच्या टेकडीवजा ढिगाऱ्यांवर वर-खाली आणि खाली-वर धावणं, धावताना कमरेला रबरी टायर लपेटणं, शाबूत हातापायांवर वाकून भरभर पुढे जाणं, पुढे जाताना शाबूत हाताच्या बाजूस ठेवलेली लाठी-काठी आपल्याबरोबर पुढे नेत राहाणं, असे बिनखर्चाचे किमान साधत- काही त्याचे कल्पक व्यायाम हे रिपुदमनजींचं वैशिष्ट्य.
अथेन्स पॅरालिम्पिकमधील यशाने देवेंद्रला अर्जुन पुरस्काराने व गुरू रिपुदमन सिंगना द्रोणाचार्य पुरस्काराचे मानकरी बनवले. त्यानंतर देवेंद्रची वृत्ती बदलू लागली. ‘रिपू दमन हे चांगले गुरुजी आहेत अन् त्यापेक्षाही उत्तम माणूस आहेत. आम्हाला चांगला मानव, इन्सान बनवणे हेच त्यांचं ध्येय होतं,’ अशी भाषा तो करू लागला. केंद्र सरकारच्या ‘टॉप्स’ ऊर्फ ऑलिम्पिक पदक जेते घडवण्याच्या योजनांकडे त्याचे लक्ष वेधले गेले. १९९७ मध्ये त्याची कारकीर्द राजस्थानात हनुमानगडात उभारू लागली तेव्हा रिपुदमन गुरुजींना पॅरालिम्पिक्सचा थांगपत्ताही नव्हता. आता २०१५-१६ मध्ये सुनील टंडन या नवीन गुरुजींनी त्याला ‘टॉप्स’ योजनेमार्फत आधुनिक प्रशिक्षण, सोयी-सुविधांचं व परदेशी वास्तव्याचं शास्त्रशुद्ध आणि आकर्षक दालन खोलून दिलं अन्् प्रभावित केलं.
देवेंद्रच्या २००४ मधील पदकाने सरकारचे डोळे उघडले. रिपुदमन गुरुजींनी २०१० चा आशियाई विजेता जगसीर सिंग आणि २०१० व १४ च्या आशियाई उपविजेता संदीप सिंग यांना घडवलं. पण पॅरालिम्पिक हे सर्वोच्च यश संपादल्यानंतर देवेंद्रला वेध लागले होते आगामी पॅरालिम्पिकचेच. २०१६ मध्ये अपंगत्वाच्या एफ-४६ विभागातील भालाफेकीचा समावेश आहे हे कळल्यावर साईचे गुरू सुनील टंडन यांचा गंडा त्यानं बांधला. भालाफेकीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या फिनलंडचा प्रशिक्षण दौरा त्यातून त्यांना लाभला.

फिनलंडमधील कुओर्टेन केंद्रात ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता केनियाचा ज्युलियस येगोचा सहवास देवेंद्रला स्फूर्तिदायक ठरला. साठ मीटर्सच्या पलीकडे त्याची भालाफेक सतत जात राहिली. रोज सकाळी तेथील आल्हाददायक हवामानात चार-चार तासांच्या सरावानंतर त्याला दोन तासांची विश्रांती पुरेशी वाटायची. पण पुढे पुढे हा ताण त्याला झेपेना. ‘मग जीव तोडून साठ-बासष्ट मीटर्सची भालाफेक करण्याऐवजी काही ताकद हातची राख व सरावात चाळीस मीटर्सचीच भालाफेक कर,’ हा तज्ज्ञांचा सल्ला त्यानं मानला. ती ताकद वापरली ती थेट रिओत. ६२.१५ मीटर्सच्या सुवर्णविजयी व विक्रमी फेकीसाठी!

विश्वविक्रमी शिष्य आपल्याला सोडून गेला यापेक्षाही रिपुदमन गुरुजींना दु:ख देतोय त्यांचा आवडता चेला - २१ वर्षीय सुंदर गुर्जर. शिष्य देवेंद्रने डावा हात गमावलेला, तर गुर्जरने गेल्या १५ डिसेंबरला डावं मनगट गमावलेलं. तरीही ६८ मीटर्सची त्याची फेक देवेंद्रपेक्षा सहा मीटर्सनी सरस. रिओमध्ये देवेंद्रसह तोही बसमधून निघाला. भालाफेकीसाठी तयार राहण्याची शेवटची हाक देईपर्यंत तो रिपोर्टिंग टेबलकडे गेलाच नाही! सारं काही संशयास्पद! संशयास्पद अशासाठी की आपल्या शीतपेयात स्टिरॉइड मिसळण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी एका फळविक्रेत्याला एक लाख रुपयांचं आमिष दाखवलं गेलं, अशा तक्रारी पॅरालिम्पिकआधीच्या महिन्यात केल्या गेल्या होत्या. त्या तशाच पोलिस ठाण्यावर पडून आहेत! पॅरालिम्पिक्समधील नरसिंग यादवसारखं हे प्रकरण तेही आता सोपवून मोकळे व्हा सीबीआयकडे!
बातम्या आणखी आहेत...