आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवाचे ‘राज’ आणि कारण..(अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा त्रिस्तरीय निवडणुकांत सलग आपटी खाल्ल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याऐवजी कुणी आत्मप्रौढीच मिरवणार असेल तर अशांचा भविष्यकाळही चांगला निपजण्याची शक्यता तशी कमीच असते. ‘पडलो तरी नाक वर’ अशी एक समर्पक उक्तीही अशांसाठी वापरली जाते. राज ठाकरे यांची अवस्था सध्या काहीशी अशीच झाल्याचे त्यांच्या ताज्या वक्तव्यांवरून दिसते.  

मनसेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राज यांनी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पक्षाच्या दारुण पराभवाचे विश्लेषण ‘पैसा जिंकला आणि काम हरले’ एवढ्या एका ओळीत करून टाकले. पण, वास्तवात अशी समजूत करून घेणे म्हणजे स्वत:चीच फसवणूक करण्यासारखे आहे. कारण, केवळ पैशाच्या प्रभावाने निवडणुका जिंकता आल्या असत्या तर मोठमोठे उद्योगपती वा धनदांडगे केव्हाच ठिकठिकाणची सत्तास्थाने काबीज करून बसले असते. पण, आजवर तसे झालेले नाही आणि नजीकच्या भविष्यातही ती शक्यता दिसत नाही. तेव्हा केवळ पैशाला भुलून मतदान होते, असे म्हणणे हा मतदारांचा अपमानच म्हणायला हवा. सामान्य मतदार आपल्या हाती असलेले मतदानाचे अस्त्र अत्यंत विचारपूर्वक वापरत असतो, हे आजवर वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पैशाचा प्रभाव निवडणुकीवर नसतोच, हे म्हणणे जसे तर्कसंगत नाही तसेच केवळ पैशाच्या आधारेच निवडणुका जिंकल्या जातात हे म्हणणेसुद्धा वास्तवाच्या जवळ जाणारे नाही. नेतेमंडळींची विश्वासार्हता, उमेदवाराचे चारित्र्य, लोकसंपर्क, पक्षाची ध्येयधोरणे, प्रचारातले मुद्दे, विकासाची दिशा यांसह जात, धर्म, व्यक्तिगत संबंध आदी अनेक घटकांचा विचार करून मतदान केले जाते. तसे नसते तर पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकांत राज यांच्या नवख्या मनसेला एवढे लक्षणीय यशही मिळाले नसते. २००९ च्या  विधानसभा निवडणुकीत मनसेच्या आमदारांची संख्या दोन आकड्यांवर गेली. पाठोपाठ झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरी पट्ट्यात राज यांना भरभरून यश मिळाले. पुण्यात भाजप व शिवसेनेसारख्या पक्षांना मागे टाकत मनसे प्रमुख विरोधी पक्ष बनला, तर नाशकात थेट सत्तास्थानीच विराजमान झाला. हा करिष्मा होता तो राज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा. आपल्या आक्रमक स्वभावानुसार त्यांनी बेरोजगारी, मराठी माणसावरील अन्याय, भ्रष्टाचार, विकास अशा मुद्द्यांवरून जोरदार रान उठवले आणि मतदारांनी त्यांच्या शब्दावर भरवसा टाकत मनसेच्या पदरात मतांचे भरभरून दान टाकले. त्यानंतर खरे तर राज यांनी यशाचा हा आलेख चढता ठेवण्यासाठी संघटनात्मक बांधणी, नेत्यांची मजबूत फळी उभारणी, कार्यकर्त्यांसाठी रचनात्मक कामाचा आराखडा अशी पावले टाकणे आवश्यक होते. महाराष्ट्राच्या राजकारणाची उत्तम जाण असलेल्या शरद पवारांनी त्या वेळी राज यांना उपरोधाने का होईना, तसा सल्ला दिला होता. तथापि, त्या वेळी यशाच्या धुंदीत असलेल्या राज यांनी या सर्व बाबींकडे साफ दुर्लक्ष केले. पक्ष उभारणीसाठी लोकांमध्ये जावे लागते, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्या लागतात, जनतेसाठी वेळ द्यावा लागतो, सकाळपासून रात्रीपर्यंत पायाला भिंगरी लावून फिरावे लागते, स्वत:च्या म्हणण्याला, व्यक्तिगत आवडी-निवडींना मुरड घालावी लागते. पण, अशा पद्धतीने काम करण्याची वा पक्ष बांधणीसाठी लागणारे कष्ट उपसण्याची तयारी राज यांनी कधीच दाखवली नाही. त्याऐवजी स्वत:चे वक्तृत्व आणि नेतृत्व यावरच त्यांची सारी भिस्त राहिली. त्यामुळे स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलेल्यांचे कालांतराने जे होते तसेच सध्या राज यांचे झाले आहे. कारण, नुसत्याच ‘बोलबच्चनगिरी’ला लोक वारंवार फसत नाहीत. नाशिक पालिकेची सत्ता हाती आल्यानंतर खूप काही करण्यासारखे होते. पण, सत्ता येताच राज यांनी नाशिकककरांच्या आशा-आकांक्षांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. त्याऐवजी कुठे पुलाखाली सुशोभीकरण कर, कुठे एखादे उद्यान बनव, कुठे कारंजी उभार, अशी स्वत:ला वाटतील तशी फुटकळ कामे करून त्याचेच ढोल बडवणे सुरू केले. त्यातला फोलपणा राज व त्यांच्या निकटवर्तीयांना कळत नसला तरी लोकांनी तो अचूक ओळखला होता. त्यातून राज यांच्याकडे रचनात्मक कार्यक्रम काहीच नाही, फक्त इतरांची टिंगलटवाळी करण्यात ते धन्यता मानतात, अशी सर्वसामान्यांची धारणा होत गेली आणि निकालानंतर मनसेची अवस्था शोचनीय झाली. त्याचा विचार करता राज यांनी प्रथम स्वत:च्या चुका मान्य करायला हव्यात. त्याऐवजी ‘पैसा जिंकला आणि काम हरले’, ‘लोकांना जे हवे त्याचा ‘पुरवठा’ आता केला जाईल’, वगैरे स्वरूपाची वक्तव्ये करून ते इतरांना दोष देण्यात समाधान मानत असतील तर लोकही मनसेला चार हात दूर ठेवणेच पसंत करतील. ‘मनसेचा यापुढे पराभव नाही’ हे आपले शब्द राज यांना येत्या काळात खरे करून दाखवायचे असतील तर त्यांनी सर्वप्रथम या वास्तवाचे भान बाळगायला हवे.
बातम्या आणखी आहेत...