आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा ‘जनता’ प्रयोग (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोदींविरोधात सर्व, अशी राजकीय फेरमांडणी करण्याची धडपड दिल्ली दरबारी सुरू झाली आहे. विरोधी पक्षांतर्फे एकच उमेदवार देऊन मोदींचा पराभव घडवून आणायचा बेत विरोधी पक्षांनी आखला आहे. यासाठी सोनिया गांधी यांच्या घरी भोजन समारंभ झाला. भाजपविरोधी पक्ष त्याला हजर होते. एकमेकांना अखंड पाण्यात पाहणारे समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष हे मैत्रीचा हात पुढे करत होते. मायावतींची राजकीय धोरणे राजकीय स्वार्थापलीकडे कधी जात नाहीत. त्यामुळे कोणताच पक्ष त्यांना भरवशाचा मानत नाही. मायावतींना याची कल्पना असल्याने या वेळी मी शंभर टक्के तुमच्याबरोबर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्या वेळी टाळ्या पडल्या असे म्हणतात. मायावतींना आता राजकीय आधाराची अतोनात गरज आहे. कारण उत्तर प्रदेशातील पराभवामुळे बसपचे राजकीय भविष्यच काळवंडले. भाजपच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे हक्काचा मतदार बसपने गमावला. ही जखम मायावतींच्या मनात ठसठसते. मतदान यंत्रात गोलमाल केल्यामुळे उत्तर प्रदेशात पराभव झाला असे त्यांना वाटते. पराभवाचे प्रामाणिक राजकीय चिंतन करण्याची मायावतींची मानसिकता नाही. धर्मातील एकेश्वरी पंथांप्रमाणे राजकारणातील एकेश्वरी पक्षांमध्ये स्वतःचे परीक्षण करण्यास वाव नसतो. त्यापेक्षा कटकारस्थानाची हवा उठवून देणे सोपे असते. आत्मपरीक्षणाचा अभाव हा फक्त मायावतींचा दोष नाही. सध्या काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना या मानसिक रोगाने ग्रासले आहे. भाजपच्या विजयी धडाक्याने धास्तावलेल्या विरोधी पक्षांनी म्हणून एकत्र येऊन मोदींचा सामना करण्याचे ठरवले. राष्ट्रपती निवडणूक ही त्याची पहिली चाचणी आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष यशस्वी होण्याची शक्यता जवळपास नाही. एकट्या अण्णाद्रमुक पक्षाची मदत भाजपला पुरेशी आहे. शिवसेना भाजपच्या विरोधात गेली तरी त्या मतांची घट अन्य पक्ष भरून काढू शकतात. गेल्या दोन वेळेला शिवसेनेने काँग्रेससाठी मतदान केल्यामुळे या वेळीही तसेच होईल, असे विरोधी पक्षांना वाटते. सत्ताधारी कणखर असला की शिवसेना नमते घेते असा इतिहास आहे. काँग्रेसला मदत करण्यामागे तेच कारण होते. सध्या शिवसेनेसमोर अनेक समस्या आहेत. मोदीविरोधामुळे त्यांना माध्यमांत स्थान मिळत असले तरी जनतेत शिवसेनेचे स्थान कमी होत चालले असल्याचे प्रत्येक निवडणूक दाखवून देते. मतदार घटले की राजकीय तडजोडी अपरिहार्य ठरतात. शरद पवारांनी हे वारंवार दाखवून दिले आहे. तशाच तडजोडी करणे उद्धव ठाकरे यांना भाग पडेल. मोदींना आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे फडणवीसांनाही निपटू शकत नाहीत, हे महाराष्ट्रात दिसले. शिवसेना काँग्रेसच्या तंबूत गेली तर पक्षाची उरलीसुरली विश्वासार्हता संपुष्टात येईल. उद्धव ठाकरे असा आततायीपणा करणार नाहीत. आततायी राजकारण हा त्यांचा स्वभाव नाही. यामुळेच ते टिकून आहेत. नाहीतर शिवसेनेची मनसे होण्यास वेळ लागला नसता. 

राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेच्या भूमिकेला माध्यमांतील प्रसिद्धीपलीकडे राजकीय महत्त्व नाही. राजकीय महत्त्व आहे ते नितीशकुमार यांना. सोनिया गांधींकडील बैठकीला जाण्याचे नितीशकुमार यांनी टाळले. त्यासाठी त्यांनी दिलेली सबब कुचकामी आहे. सोनियाजींकडे न जाणारे नितीशकुमार मोदींकडे गेले. त्यामागे राजकारण नाही असे नितीशकुमार म्हणत असले तरी नेत्याची प्रत्येक कृती ही राजकीयच असते, हे नितीशकुमार यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी जाणून असतो. तेव्हा या कृतीमागेही संदेश होता. विरोधी पक्षांचे ऐक्य हा फसवा प्रयोग ठरेल, असा संदेश नितीशकुमार विविध वक्तव्यांतून उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतर देत आहेत. या संदेशामागची राजकीय भूमिका नितीशकुमार यांचे निकटचे सहकारी पवन वर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडियातील लेखातून अधिक स्पष्टपणे दिली आहे. वैफल्यातून येणारा सिनिसिझम हे विरोधी पक्षांचे दुखणे आहे. तो टाळून आजच्या युगाचे राजकारण करणारा नेता पुढे यावा, अशी अपेक्षा पवन वर्मा यांनी व्यक्त केली आहे. राजकारणाची नवी परिभाषा सापडत नसल्याने विरोधी पक्ष गोंधळले आहेत. विरोधी पक्षांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज मोठी असली तरी ती मोदींचा पराभव करू शकत नाही. गोळाबेरजेतून पुढे आलेल्या सरकारचे काय होते हे आणीबाणीनंतरच्या जनता सरकारकडून जनता शिकली आहे. तोच प्रयोग पुन्हा करण्यात अर्थ नाही. राजकारणाची गणिती फेरमांडणी करण्यापेक्षा राजकीय विरोधाची परिभाषा बदलण्याची गरज अधिक आहे. मोदींना पर्याय त्यातून निर्माण होऊ शकतो, राजकीय गोळाबेरीज करून नव्हे, असे नितीशकुमारांना सांगायचे आहे व तेच बरोबर आहे.
बातम्या आणखी आहेत...