आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशास्त्रीय निवड (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपेक्षेप्रमाणे रवी शास्त्री यांची निवड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी झाली. अष्टपैलू खेळाडू म्हणून बऱ्यापैकी कारकीर्दीच्या शास्त्रीला या कामाचा तसा अनुभव नाहीच. आपत्कालीन स्थितीत क्रिकेट संघाचा तो अल्पकाळ ‘डायरेक्टर’ होता. ‘कर्णधार’ म्हणून विराटसाठीही ते दिवस नवे होते. याच काळात विराट-शास्त्रीच्या संघाने देश-विदेशात जोरदार कामगिरी नोंदवली म्हणून विराटला शास्त्रीबद्दल भरवसा. प्रशिक्षकपदाचा अनुभव गाठीशी नसला तरी विराटचा विश्वास जिंकला ही शास्त्रीची जमेची बाजू. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, लक्ष्मण यांच्या समितीने अनेकांच्या मुलाखती घेतल्या. अंतिम नावाची घोषणा मात्र त्यांनी विराटशी बोलूनच केली. विराटच्या पसंतीचा प्रशिक्षक दिल्याचे यातून लक्षात येते. शास्त्रीच्या कर्तृत्वाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) बहुधा साशंक असणार. म्हणूनच परदेशातील सामन्यांसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जहीर खान यांचीही निवड झाली. विराटच्या एकाधिकारशाहीला लगाम लावण्याचा हा प्रयत्न असू शकतो. एकूणच सर्व निवड प्रक्रियेची, विराट कोहलीची क्रिकेटप्रेमींनी ‘सोशल मीडिया’तून यथेच्छ टिंगल केली आहे. याचे कारण ‘राव गेले, पंत चढले’ इतक्या सोप्या पद्धतीने प्रशिक्षकपदाची नियुक्ती झाली नाही. जेमतेम वर्षभरासाठी अनिल कुंबळे यांना प्रशिक्षक केले गेले. खेळाडू म्हणून कुंबळेची जिगर आणि लढाऊ वृत्ती सर्वांनीच पाहिली आहे. त्यामुळे मुदत संपण्याआधीच कुंबळेची ‘विकेट’ ज्या पद्धतीने पडली ते क्रिकेटप्रेमींना आवडले नाही. भारतीय संघाची कामगिरी खालावली म्हणून कुंबळेची गच्छंती झाली नाही. विराटबरोबर सूर जुळले नाहीत, या एकमेव कारणापायी कुंबळेनी नाराज होऊन स्वतःहून पद सोडले. 
 
खेळाडू म्हणून कुंबळे शास्त्रीपेक्षा फारच मोठा. पण मोठा खेळाडू तितकाच चांगला प्रशिक्षक बनतो असे नाही. ग्रेग चॅपलच्या काळात संघाची घडी कशी विस्कटली याचे साक्षीदार स्वतः कुंबळे होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंना शाळकरी मुलांसारखे वागवून चालत नाही. ‘मॅन मॅनेजमेंट’ हे फक्त खेळातील त्रुटी दूर करण्यापुरते ठेवावे लागते. ही सीमा ओलांडून सर्वांगीण विकास वगैरे भानगडीत प्रशिक्षकाने शिरायचे नसते. दुसऱ्या बाजूने खेळाडूंनाही स्वतःची ‘ब्रँड व्हॅल्यू’, अहंकार, ज्येष्ठत्व बाजूला ठेवून संघाचा घटक बनण्याची परिपक्वता दाखवावी लागते. हा समतोल बिघडला की दोन्ही बाजूने खटके उडतात. त्याचा परिणाम संघाच्या एकोप्यावर आणि निर्णयक्षमतेवर होतो. कुंबळे आणि विराटमध्ये हे घडले. स्वाभाविकपणे बीसीसीआयने कुंबळेचा उत्तराधिकारी निवडताना विराटचा शब्द अंतिम मानला. एक लक्षात घ्यायला हवे की बीसीसीआयचे वार्षिक उत्पन्न तब्बल दीड हजार कोटी रु.च्या घरात आहे. या अर्थकारणाचा सध्याचा बादशहा विराट असल्याने त्याचा शब्द वजनदार आहे. कोणत्याही खेळाला प्रेक्षकांना बांधून ठेवणारा एक नायक हवा असतो. हा नायक सध्या विराट आहे. कधीकाळी तो सचिन तेंडुलकर होता. त्याही वेळी संघ निवड, प्रशिक्षक निवड किंवा कर्णधाराची निवड करताना सचिनचा शब्द ऐकला जायचा. सचिनच्याच शिफारशीने महेंद्रसिंग धोनी कर्णधार झाला होता हे विसरून चालणार नाही. हे अर्थामागे लपलेले व्यक्ती महात्म्य आहे. या पार्श्वभूमीवर सचिन-सौरव-लक्ष्मण या त्रिकुटाने विराटचे ऐकताना शास्त्रीचे पंखही छाटले आहेत.. कर्णधाराला मान्य नसलेला प्रशिक्षक लादून कायमची वात पेटती ठेवण्यात काहीच मतलब नव्हता. आता मुद्दा इतकाच की विराटला त्याच्या पसंतीचा प्रशिक्षक दिल्यानंतर संघाची कामगिरी उंचावणार का? २०१९ च्या विश्वचषकापर्यंत विराट-शास्त्रीकडे संघाची सूत्रे असणार आहेत. द्रविड-जहीरच्या मदतीने विराट आणि कंपनीला शास्त्री कुठे घेऊन जाणार हे महत्त्वाचे. खेळाडू असल्यापासून शास्त्री गुलछबू गुणांसाठी ओळखला जातो. राजकारण साधत स्वतःची संघातली जागा टिकवून ठेवण्याचा धूर्तपणा त्याच्याकडे होता. निवृत्तीनंतर बीसीसीआयची छाया हरतऱ्हेने स्वतःवर राहील याची काळजी त्याने घेतली आहे. त्याच्या या गुणांची लागण सध्याचा क्रिकेट संघाला होऊन बेशिस्ती माजू नये म्हणजे मिळवले. बीसीसीआयच्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने अंकुश ठेवला तो संस्था व्यक्तिकेंद्रीत होऊ नये व त्यामध्ये सामूहिक नेतृत्वाची घडी बसावी म्हणून! झहीर व द्रविडची नेमणूक शास्त्रीबरोबर करून बीसीसीआयने ही घडी साधल्याचे चित्र उभे केले. परंतु शास्त्री व विराटचा स्वकेंद्रीत स्वभाव पाहता ही घडी कितपत बसेल याची शंका वाटते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दिशादिग्दर्शनाचा विचार करता शास्त्रीची निवड अशास्त्रीय म्हणावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...