आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अघळपघळ, वेशीला ओघळ (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाह हा खासगी मामला असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. कोणाच्या लग्नाचे वऱ्हाड किती मोठे आणि ते विमानातून उतरले की बैलगाड्यांतून, या पारावरच्या गप्पांमध्ये आम्हाला बिलकुल रस नाही. पक्वान्ने किती प्रकारची होती आणि पंगती किती उठल्या याची मोजदाद करण्याचा करंटेपणा आम्हाजवळ नाही. दोन जीवांना, दोन परिवारांना एकत्र जोडणारे भावनिक, नाजूक क्षण कोणत्या पद्धतीने रंगवावेत, हाही ज्याच्या-त्याच्या अभिरुचीचा प्रश्न. वरात, मंडप, स्वागत सोहळे, देखावे आदींच्या माध्यमातून ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्याबाबत मतमतांतरे असू शकतात. सार्वजनिक क्षेत्रात वावरत असताना जनतेला ‘मायबाप’ म्हणणाऱ्या राजकारण्यांसाठी मात्र वेगळे मापदंड ठेवावे लागतात. खासकरून सत्तेवर असणाऱ्या मंडळींसाठी तर नक्कीच! राजकारण्यांचे थाटमाट, मेजवान्या, गाड्या-घोडे रयत मुकेपणाने, परंतु उघड्या डोळ्याने पाहत असते. 

अशा सोहळ्यांच्या यजमान महाशयांची सुरुवात कधी, कुठून झाली आणि आज काय बहार उडवली जात आहे, याची तुलना लोकांच्या मनात चालू असते. स्वाभाविकपणे चर्चा तर होणारच! भाजप सत्तेत असल्याने त्यांच्या खासगी बाबी ऐरणीवर येत आहेत. त्याआधी ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या यायच्या. ‘राष्ट्रवादी’चे माजी मंत्री भास्कर जाधवांच्या घरच्या लग्नकार्याची वर्णने ऐकून शरद पवारांनी झोप उडाल्याचे सांगितले होते. तीन-चार महिन्यांपूर्वी तिकडे नागपुरात गडकरी वाड्यावरचा आणि गेल्या काही दिवसांत फुंडकर-दानवेंच्या घरचा थाट पाहून संघ परिवारातल्या कोणाची किंवा मोदी-शहांची झोप उडाल्याचे अजून ऐकिवात नाही. पवारांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केल्यानंतरही त्यांच्या झोपेचे खोबरे करणारे अनेक शाही सोहळे त्यांचे पाठीराखे दणक्यात साजरे करत राहिले, हा भाग अलाहिदा. यासाठीचा खुलासा या राजकारण्यांकडे नेहमीच तयार असतो. 

तो म्हणजे – “सार्वजनिक जीवनात वावरताना आम्ही सतत इतरांच्या शुभकार्यांमध्ये सहभागी होत असतो. स्वतःच्या घरच्या कार्याच्या निमित्ताने परतफेडीची संधी मिळते. आमचे सोहळे दिमाखदार असतीलही. यातून अर्थकारणाला चालनाच मिळते. अनेकांच्या हाताला काम मिळते.” अजिबातच चुकीचा नाही हा दावा. म्हणूनच वऱ्हाडी कोण आणि त्यांची सरबराई कशी झाली, या रसभरीत कहाण्यांमध्ये आम्हाला पडायचे नाही. मुद्दा येतो तो मूल्यांचा. तुमच्या संवेदनशीलतेचा. प्रश्न असतो तो नेता म्हणून तुम्ही समाजापुढे कोणता आदर्श ठेवता याचा. गडकरी-फुंडकर-दानवे, तुम्ही तर आता राज्यकर्ते बनलात, परंतु शाखांमधली राष्ट्र-चारित्र्य-दायित्व वगैरेंबद्दलची बौद्धिके रिचवतच तुमची वाटचाल झाली. दिमाखदार सोहळे या सगळ्या संस्कारात कसे बसतात बुवा, एवढीच शंका रयतेच्या मनात उत्पन्न झाली आहे. 
 
जेमतेम वर्षभरापूर्वी महाराष्ट्र दुष्काळात होरपळला होता. विदर्भ-मराठवाड्याच्या भाळी आलेला शेतकरी आत्महत्यांचा शाप अजून मिटायला तयार नाही. शाळेत जायला ‘एसटी’चा पास काढून देऊ शकत नसलेल्या शेतकरी बापावर माझ्या लग्नाचे ओझे नको, असा विचार करून आयुष्य संपवणाऱ्या कोवळ्या पोरी याच महाराष्ट्राने पाहिल्या. ज्यांच्या बळावर तुमच्या राजकीय यशाचे इमले चढतात तो शेतकरी चिंतामुक्त नाही. या सद्य:स्थितीची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवायची नाही तर कोणी? एक केंद्रातले बडे मंत्री, दुसरे राज्यातले आणि तिसरे सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. समाजाचे सोडा, पण तुमच्याच पक्षातल्या नेते-कार्यकर्त्यांसमोर कोणता आदर्श ठेवता आहात तुम्ही? हे निराशाजनक चित्र एकीकडे उमटताना सामुदायिक विवाह सोहळ्यांची संवेदनाही महाराष्ट्राने अनुभवली. खान्देशात राज्यमंत्री दादा भुसेंनी त्यांच्या मुलाचे सामुदायिक सोहळ्यात लग्न केले.

श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांचाही विवाह रविवारी सामुदायिक सोहळ्यात होऊ घातला आहे. कदाचित भुसे-जगतापांच्या खासगी जीवनात श्रीमंती थाट दिसेल, पण तरीही त्यांनी या कृतीतून दिलेला संदेश कौतुकास्पद आहे. लग्न सोहळ्यांमधली उधळपट्टी आणि हुंडा हे भारतीय समाजाला जडलेले रोग आहेत. शक्ती, संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन केल्याने बौद्धिक, सामाजिक उंची वाढत नाही, हे लक्षात घेणारे जाणते फार थोडे असतात. वरातीमुळे रहदारी किती तास खोळंबली किंवा किती हजारांच्या फटाक्यांचा धूर केला, यासारख्या बाबी जर अभिमानाने सांगण्याचा विषय ठरत असतील तर हा मूढपणा शक्य तितक्या लवकर सोडला पाहिजे. स्वतःचा आनंद साजरा करताना त्यातून कोणाच्याही मनात दुःख, वैषम्य, निराशा, न्यूनत्वाची भावना चमकणार नाही ही संवेदना जागी असणे म्हणजे खरी श्रीमंती. येऊ घातलेल्या लग्नसराईत आवर्जून काय टाळले पाहिजे, याचाच आदर्श आपल्या राज्यकर्त्यांनी घालून दिला. हेही नसे थोडके.
बातम्या आणखी आहेत...