आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांना अावडे अस्वस्थता! (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले, तर अाता दुसऱ्या टप्प्यासाठी तसेच १० महापालिकांच्या हाेऊ घातलेल्या निवडणुकांच्या निमित्ताने प्रचारात जाेम संचारला आहे. केंद्रातल्या नरेंद्र मोदी आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचे मूल्यमापन करण्याची दुसरी संधी जनतेला मिळते आहे. नरेंद्र-देवेंद्र सरकारबद्दल मत व्यक्त करण्याची पहिली संधी दोन महिन्यांपूर्वी नगरपालिका निवडणुकीने जनतेला दिली. राज्यातील सर्वाधिक नगरसेवक आणि सर्वाधिक नगराध्यक्ष जिंकल्याने पहिला कौल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेल्याचे दिसले.
 
आता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर अशा एकूण १० महत्त्वाच्या महापालिकांचे कारभारी निवडले जाणार आहेत. विधानसभा आणि लोकसभेची रणधुमाळी अवघ्या अडीच वर्षांवर आल्याने महापालिकांच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरतात. सत्ताधाऱ्यांना मांड आणखी पक्की करायची आहे, तर विरोधकांना ताकद वाढवायची आहे. या संघर्षात मुंबई महापालिका केंद्रस्थानी आहे. राज्याच्या सत्तेतला ‘मोठा भाऊ’ भाजप मुंबईत ‘धाकला’ ठरताे म्हणूनच या वेळी मुंबईदेखील काबीज करण्याच्या इराद्याने भाजप इरेला पेटला आहे. मात्र मुळावरच घातला जात असल्याने शिवसेना अटीतटीच्या पवित्र्यात आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांमधला संघर्ष टिपेला पोहाेचला आहे. 

शरद पवार तर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान देऊन मोकळे झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राजकीय ज्येष्ठत्वाच्या बाबतीत पवारांशी बरोबरी करणारा महाराष्ट्रात कोणी नाही. स्वाभाविकच पवार काय बोलतात हा कुतूहलाचा विषय ठरताे. मुंबईची सत्ता शिवसेना राखणार असे ठामपणे सांगणारे पवार राज्यातली सत्ता अस्थिर होण्याची शक्यता वर्तवतात तेव्हा मात्र भुवई किंचित वर चढते. तेवढ्यावर ते थांबले नाहीत. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास या वेळी सरकारला ‘राष्ट्रवादी’चा टेकू मिळणार नाही हेही त्यांनी सांगितले. एक बरे झाले -  ‘पद्मविभूषण’चे ओझे त्यांच्यावर नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले. मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आहे, पण हे सरकार गेलेच पाहिजे, असेही पवार म्हणाले. 

सत्ताधारी दुभंगलेले असावेत असे विरोधकांना वाटणे अनैसर्गिक नाही, परंतु अडीच वर्षांची सत्ता फुंकून टाकण्याइतका अभिमान शिवसेना दाखवेल, असे अनुमान बांधून शरद पवारांनी राजकीय अस्थिरतेची भाषा करावी हे आश्चर्यकारक आहे. उद्धव-देवेंद्र आणि दोघांच्या मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या जाहीर कलगीतुऱ्याचा दाखलाही ते देतात. पाच-सहा वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुका पवार एवढ्यातच विसरले? गृहमंत्री असलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या आर. आर. पाटील यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील ज्येष्ठ काँग्रेस मंत्री नारायण राणेंसारख्या गुन्हेगाराशेजारी बसावे लागले तर मांडी कापून घेईन, इतकी टोकाची भाषा प्रचारात वापरली होती. कधी संयम न सोडणाऱ्या पवारांनी तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारत असल्याची टीका केली. प्रचार संपला, निकाल लागले; पण ना आर. आर. पाटील यांनी मांडी कापून घेतली ना ‘राष्ट्रवादी’ने सत्ता सोडली. आघाडी-युत्यांचे सरकार कोणाचेही असले तरी कुरबुरीविना चालल्याचे उदाहरण नाही. मुख्यमंत्री गुंडांना पावन करून घेत असल्याचीही खंत पवारांना वाटते. त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवडचे दाखले ते देतात. 

पण यातले अनेक थोर गुंड आतापर्यंत अजित पवारांच्या पुढे-मागे फिरत होते हे पवारांना ठाऊक नसावे काय? शिवाय आकडेवारी असे सांगते की, अजूनही सर्वाधिक गुन्हेगार ‘राष्ट्रवादी’च्याच उमेदवार यादीत आहेत. वास्तविक ‘पद्मविभूषण’ पवारांच्या उंचीच्या लोकनेत्याने महापालिकेच्या राजकारणात गुंतावे का यावर मतभेद असू शकतात, पण हेच पवार केंद्रात मंत्री असताना जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा महापालिकेसंदर्भात प्रश्न केल्यास ‘स्थानिक गोष्टी मला विचारू नका’ असे म्हणायचे. आता पुण्याच्या गल्ल्यांमध्ये महापालिकेचा प्रचार करत ते हिंडत आहेत. मुद्दा इतकाच की भाजपचे बळ वाढले आहे. विरोधकांचीही जागा शिवसेना आक्रमकतेने भरून काढत आहे. काँग्रेसचा पारंपरिक जनाधार फारसा हललेला नाही. दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’ची अवस्था मात्र बिकट होते आहे. म्हणूनच शरद पवार अस्थिरतेच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण करत आहेत. कारण अस्थिरता निर्माण झाली तरच पवारांना राजकारणात स्थान मिळेल. अन्यथा पुढची अडीच वर्षे पक्षाचे वाढते खिंडार बुजवण्यासाठी झगडावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...