आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकाच्या डरकाळ्या (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गैरवर्तणुकीमुळे आपल्या एका खासदारावर लादली गेलेली विमान प्रवास 
बंदी उठवावी म्हणून शिवसेना सदस्यांनी संसदेच्या सभागृहात घातलेला गोंधळ लोकभावनेपासून हा पक्ष दिवसेंदिवस कसा दूर जात आहे, त्याची साक्ष देणाराच ठरावा. विशेष म्हणजे, रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी उठवावी म्हणून एकीकडे शिवसेनेचे खासदार आक्रमक होत असताना दुसरीकडे सरकारने त्याबाबत घेतलेली ठाम भूमिका पाहता स्वत: गायकवाड मात्र गुपचूप दिलगिरी व्यक्त करून मोकळे झाले. हे दुटप्पी वर्तन शिवसेनेच्या सध्याच्या दिशाहीनतेला साजेसे असेच आहे.  

वास्तविक पाहता विमानात बसण्याच्या जागेवरून गायकवाड यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला पायताणाने केलेली मारहाण कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय ठरत नाही. त्यातही गायकवाड हे देशाच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या कायदे मंडळाचे सदस्य आहेत. कायदे बनवणाऱ्या मंडळींनी आपल्या हातून कायदे अथवा नियम भंग होणार नाही, याची सर्वाधिक काळजी घेणे अपेक्षित असताना गायकवाड यांचे वर्तन नेमके विपरीत होते. केवळ चप्पलमार करून ते थांबले नाहीत, तर मी शिवसेनेचा खासदार असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणजे जणू वाट्टेल तसे वागायची मुभा असल्याचा निर्वाळा देण्याचे हे विधान खरे तर पक्षाने लगेचच खोडून काढायला हवे होते. पण, शिवसेनेने नेमकी त्याच्या उलट भूमिका घेतली. दिवसागणिक हा पक्ष गायकवाडप्रकरणी अधिकाधिक आक्रमक होत आहे. त्यातून शिवसेनेचेच हसे होत आहे. कारण, मुळात हा काही व्यापक लोकहिताशी वगैरे निगडित मुद्दा नाही, तर तो व्यक्तिगत वर्तणुकीशी संबंधित विषय आहे. टीव्ही आणि अन्य माध्यमांद्वारे गायकवाडांचे वर्तन पाहिल्यानंतर ते केवळ अशोभनीय, उद्दामपणाचे असल्याची भावना सामान्यांमध्ये पसरली. एरवी, लोकप्रतिनिधींना असलेल्या विशेषाधिकारांमुळे कुठलीही यंत्रणा शक्यतो त्यांच्यावर कारवाई करू धजत नाही. परंतु, या वेळी एअर इंडिया त्याला अपवाद ठरली. या कंपनीने गायकवाड यांच्या विमान प्रवासावर तातडीने बंदी घातली आणि विमान कंपन्यांच्या महासंघानेही त्याची खंबीर पाठराखण केली. लोकप्रतिनिधित्वाचा बडेजाव मिरवणाऱ्या मंडळींना अशा प्रकारे कुठे तरी आळा बसावा, अशी सुप्त इच्छा सर्वसामान्यांच्या मनात असते. साहजिकच गायकवाडांवरील विमान प्रवास बंदी जनमानसाला आतमध्ये कुठे तरी सुखावून गेली. अशा स्थितीत खरे तर सामोपचाराची भूमिका घेऊन त्यावर मध्यममार्गी तोडगा काढायचा प्रयत्न व्हायला हवा होता. मात्र, सध्या मोदी आणि भाजपद्वेषाचा ज्वर चढल्यामुळे शिवसेनेला या बाबतीत विवेकाचे भान राहिले नाही. पक्षनेतृत्वाची भूमिका गायकवाडांच्या समर्थनाची असल्याचे पाहून दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना भलताच चेव चढला. मग नेहमीसारखी अभिमान, अस्मिता, जाज्ज्वल्यता, वाघाचे बच्चे.. अशी भाषा सुरू झाली. अभिमान, अस्मिता बाळगण्यात वावगे काही नाही, परंतु अभिमान कशाचा आणि कुठे बाळगावा याचे तारतम्य राखणे आवश्यक असते. आता तर त्याही पुढे जात गायकवाडांवरील बंदी न उठवल्यास मुंबईतून विमाने उडू न देण्याबाबत धमकावणीचा सूर या पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे. हा तर तद्दन बालिशपणा म्हणावा लागेल. कारण विमान प्रवास हा कुणी गंमत म्हणून करत नाही. बहुतेकदा तातडीची गरज हेच त्यामागचे मुख्य कारण असल्याने अशा प्रकारे विमान प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बौद्धिक पातळीची सुमारता दर्शवण्यासारखेच आहे. शिवाय, विमानतळांरील सुरक्षा व्यवस्था बघता शिवसेनेने कितीही डरकाळ्या फोडल्या तरी असे काही होणे संभवत नाही. तेव्हा विमानोड्डाणे बंद पाडण्यासारखे इशारे देणे आता या पक्षाने थांबवायला हवे. आपण वाघ आहोत, हे वाघाला ओरडून सांगायची गरज पडत नाही, तर त्याच्या अस्तित्वाचा दराराच ते ध्वनित करत असतो, हेही शिवसेना नेतृत्वाने यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. नुसत्याच गुरगुरणाऱ्या वाघाकडे कालांतराने जनता दुर्लक्ष करते. हे लक्षात घेता शिवसेनेने अशा अनाठायी डरकाळ्या फोडण्यास आवर घालत व्यापक जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायला हवे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शाळाप्रवेश वगैरे मुद्दे उचलून आक्रमक झालेल्या शिवसेनेने जे मिळवले ते गायकवाड प्रकरणात घालवले, असे म्हणावे लागेल. सध्या काँग्रेससारखे दुबळे विरोधक असल्याने सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी उलट शिवसेनेसारख्या पक्षावर आली आहे. त्याचे भान बाळगून पक्षनेतृत्वाने धोरण आखणी केल्यास पक्षाला त्याचा लाभ होईल. पण, त्याऐवजी केवळ असा आक्रस्ताळेपणा होत राहिल्यास त्यातून उलट शिवसेनेच्याच राजकीय ‘टेक ऑफ’ला मर्यादा येतील, हे निश्चित.
बातम्या आणखी आहेत...