आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर कपाळमोक्ष ठरलेलाच (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सेहवान शरीफ या शहरातील लाल शहाबाज कलंदर या सुफी संताच्या दर्ग्यामध्ये गुरुवारी झालेल्या भीषण आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर हा देश स्वत:च खणलेल्या खड्ड्यात कसा गाडला जात आहे हे दिसून आले. कारण  या हल्ल्यात सर्वात जास्त बळी मुस्लिमांचेच गेले आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये त्या देशात झालेला हा दहावा दहशतवादी हल्ला होता. गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी इसिस या संघटनेेने घेतली आहे, तर हा हल्ला अफगाणिस्तानातून तालिबानी सूत्रधारांनी घडवून आणल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. हल्ल्यामागे हात कोणाचा आहे हे चौकशीतून यथावकाश समोर येईल किंवा पाकिस्तान सरकार ते समोरही येऊ देणार नाही, परंतु त्या देशातील मुस्लिमांमध्ये जे अंतर्गत तीव्र मतभेद आहेत तेदेखील या हल्ल्यांना तितकेच जबाबदार ठरले आहेत. 
 
१९४७ मध्ये फाळणीनंतर पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र म्हणून उदयाला आले. जगात इंडोनेशियानंतर सर्वात मुस्लिमांची संख्या पाकिस्तानात आहे. धर्माधिष्ठित राष्ट्र असूनही पाकिस्तानातील मुस्लिम एकसंध नाहीत. त्यांच्यातच विविध संघर्ष सुरू आहेत. धर्म हाच आधार मानणाऱ्या कोणत्याही देशामध्ये विद्यमान स्थितीत ऐक्याचे वातावरण नाही. धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा अंगीकार करणारी लोकशाही राजवट जिथे नांदते आहे अशाच देशांमध्ये स्थिर कारभार व शांततेचे वातावरण असून तेथे प्रगतीचा वेगही समाधानकारक आहे. अमेरिका, फ्रान्सपासून भारतापर्यंतची अनेक उदाहरणे याबाबत पाहता येतील. त्याच्या तुलनेत  इराण, इराक, पाकिस्तान अशा देशांची विद्यमान स्थितीही तपासून घेता येईल. पाकिस्तानातील सिंध प्रांताला सुफी संतांची मोठी परंपरा आहे. कराचीतील अब्दुल्ला शाह गाझी, भीतशाह येथील शाह अब्दुल लतीफ भिताई तसेच खैरापूर येथील सचल सरमस्त या सुफी संतांबरोबरच लाल शहाबाज कलंदर यांचेही माहात्म्य मोठे आहे. इस्लाममध्ये काळाच्या ओघात अनेक पंथ-परंपरा निर्माण झाल्या. त्यातील सुफी परंपरा उदारमतवादी आहे. मात्र पाकिस्तानने अफगाणिस्तान, भारतापासून अगदी थेट सिरियापर्यंत घातपाती कारवाया करण्यासाठी ज्यांना पोसले ते कट्टरपंथी आहेत. त्यांना इस्लाममधील उदारमतवादी प्रवाहांचे अस्तित्व डोळ्याला खुपते आहे. लाल शहाबाज कलंदर यांच्या दर्ग्यामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट याच कट्टरपंथीयांनी घडविला आहे. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष झिया -उल- हक यांच्या कारकीर्दीत वहाबी पंथीयांच्या मदरशांचे मोठे जाळे विणले गेले. त्यामधून माथी भडकाविण्यामुळेच पाकिस्तान आज जिहादी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेले आहे.  

भारतामध्येही मुस्लिमांची संख्या मोठी आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाकिस्तानी मुस्लिमांपेक्षा भारतातील मुस्लिमांनी अधिक प्रगती साधली आहे. भारतीय मुस्लिमांनाही अनेक सामाजिक समस्या भेडसावत आहेतच, परंतु ते पाकिस्तानातील मुस्लिमांइतके धर्माबाबत कडवे नाहीत. याचे महत्त्वाचेे कारण असे की, भारतातील धर्मनिरपेक्ष लोकशाहीमुळे येथील मुस्लिम असो की अन्य अल्पसंख्याक, त्यांना तुलनेने सुरक्षित वातावरण मिळाले अाहे. पाकिस्तानात शियांच्या तुलनेत सुन्नीपंथीय सर्वाधिक आहेत. तेथे एकूण लोकसंख्येच्या अवघे सहा टक्के शियापंथीय, अहमदी पंथाचे केवळ दोन टक्के लोक आहेत. पाकिस्तानी राज्यघटनेमध्ये १९७४ मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार अहमदी पंथीयांना ‘गैरमुस्लिम’ म्हणून घोषित केले गेले. हे सगळे घडले सुन्नी पंथीयांतील कडव्या लोकांच्या दबावामुळे. लाल शहाबाज कलंदर दर्ग्यावर जसा हल्ला चढविण्यात आला तसेच भीषण हल्ले लाहोरमध्ये अहमदी पंथाच्या मशिदींवर मे २०१० मध्ये झाले होते. पाकिस्तानमध्ये मुस्लिमांनंतर मोठी लोकसंख्या आहे ती हिंदूंची. 

त्यानंतर अल्पसंख्येने शीख, बौद्ध, जैन, पारशी व बहाई पंथाचे लोकही तिथे आहेत. पाकिस्तानातील या अल्पसंख्याकांनाही  बहुसंख्य नेमस्त मुस्लिमांबरोबर दहशतवादाची तीव्र झळ पोहोचलेली आहे. नेमके हेच सत्य पाकिस्तानातील सत्ताधारी उघडपणे सांगत नाहीत. हा सारा भस्मासुर पाकिस्ताननेच उभा केला व तो आता त्याच्यावरच उलटला आहे. धर्माच्या नावावर कोणताही देश फार काळ चालू शकत नाही याचे नेमके भान पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना आहे. त्यामुळेच राजकारणापासून लष्कराला अलिप्त ठेवण्यात भारत कसा यशस्वी झाला आहे याचे मर्म जाणून घेण्यासाठी  अमेरिकी अभ्यासक स्टीव्हन आय. विल्किन्सन यांनी लिहिलेले ‘आर्मी अँड नेशन : दि मिलिटरी अँड इंडियन डेमॉक्रसी’ हे पुस्तक आवर्जून वाचण्याचा सल्ला बाजवांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना दिला होता. पाकिस्तानी लष्कर तसेच राज्यकर्ते पुस्तकातून शहाणपण शिकतील की नाही माहीत नाही, परंतु व्यवहारातील घडामोडींपासून ते काही शिकायला तयार नसतील तर मग पाकिस्तानचा कपाळमोक्ष हा ठरलेला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...