आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रवाह - अवकाश संशोधनातील ऐतिहासिक टप्पा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजपर्यंत माणसाने दुर्बिणीने धूमकेतूंचा अभ्यास केला होता; पण आता माणसाने धूमकेतूवरच यान उतरवल्याने विश्वाच्या उत्पत्तीचे गूढ उकलण्यास मदत होईल.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या शेकडो शास्त्रज्ञांना बुधवारी आपली कल्पनाशक्ती प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद झाला असेल. आजपर्यंत माणसाने दुर्बिणीने धूमकेतूंचा अभ्यास केला होता; पण अशा प्रयोगांमधील अचूकता १०० टक्के नसायची. निरीक्षण व प्रत्यक्ष चाचणी यातील अंतर हे विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

निरीक्षणातून आलेली माहिती व चाचणीतून आलेली माहिती यामध्ये अंतर असू शकते. म्हणून जर धूमकेतूवरच यान धाडले, तर धूमकेतूचा अभ्यासही होईल शिवाय आपल्या विश्वाच्या उत्पत्तीचे गूढही उकलण्यास मदत होईल, ही महत्त्वाकांक्षा युरोपियन स्पेस एजन्सीने ठेवली होती. त्या दृष्टीने सूर्याकडे येणा-या "६७ पी चुरी' या धूमकेतूचा अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीने २ मार्च २००४ रोजी रोझेट्टा यान पाठवले होते. रोझेट्टाने गेल्या १० वर्षांत ६ अब्ज ४० लाख किमी प्रवास करत चार महिन्यांपूर्वी चुरीच्या कक्षेत प्रवेश केला होता. चुरीवर बग्गी उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. चुरीच्या वेगाबरोबर रोझेट्टा यानाचा वेग ठेवणे व एका मोक्याच्या क्षणी "फिली' नावाची बग्गी चुरीवर उतरवणे ही कसोटी होती. अखेर योग्य वेळ येताच फिली चुरीवर अलगद उतरली व तिने काही कालावधीनंतर चुरीच्या प्रतिमा पाठवण्यास सुरुवात केली.

हिग्ज बोसॉन प्रयोगानंतरचा गेल्या काही वर्षांतला अवकाश संशोधनातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. सूर्य व सूर्यमालेची उत्पत्ती झाली तेव्हा धूमकेतूंचाही जन्म झाल्याचे विज्ञानाचे गृहितक आहे. धूमकेतू हे वायू व धुळीचे बनले असल्याने त्यांच्यामध्ये विश्वाच्या उत्पत्तीदरम्यानचे कण व द्रव्ये असतात. चुरी हा धूमकेतू निवडण्याचे कारण म्हणजे हा धूमकेतू १३ ऑगस्ट २०१५ रोजी सूर्याच्या अधिक जवळ येणार आहे. त्यानंतर तो नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या धूमकेतूचा अभ्यास करण्याची ही सुवर्णसंधी होती. रोझेट्टा मोहीम यशस्वी व्हावी म्हणून युरोपियन स्पेस एजन्सीतील शास्त्रज्ञ अहोरात्र कष्ट घेत होते. चुरीवर उतरलेली फिली आपल्या घरातल्या एका वॉशिंग मशीनच्या वजनाची आहे, तर या धूमकेतूची लांबी सुमारे चार कि.मी. आहे; पण या एवढ्याशा यंत्रामुळे आपण या विश्वात एकटे आहोत की नाही यावर प्रकाश पडू शकेल.