आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातला आणि घराबाहेरचा (अग्रलेख )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय हा टाटा उद्योग समूहाच्या आजवरच्या परंपरेला छेद देणारा आहे. टाटा उद्योग समूहाच्या कंपन्यांमध्ये प्रमुखपदी शक्यतो पारशी व्यक्ती नेमली जावी असा त्यांचा कटाक्ष असायचा. मात्र एन. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीने बिगरपारशी व्यक्ती प्रथमच टाटा सन्सच्या अध्यक्षपदी विराजमान झाली आहे. २४ ऑक्टोबरला टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना दूर करण्यात आले व रतन टाटा हंगामी अध्यक्ष बनले. या घडामोडींमुळे उद्योजकीय वर्तुळ, गुंतवणूकदारांमध्ये भूकंप झाला होता. टाटा सन्सचा पुढील अध्यक्ष कोण असणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. ती प्रतीक्षा चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीने संपली. चंद्रशेखरन हे १९८७ मध्ये टीसीएसमध्ये रुजूू झाल्यानंतर बावीस वर्षांतच ते त्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. आपल्याच उद्योग समूहातील उत्तम नेतृत्वाचा शोध घेताना टाटा धुरीणांच्या मनात चंद्रशेखरन भरणे साहजिकच होते. टीसीएसमध्ये अनेक वर्षे सेवा केल्याने चंद्रशेखरन हे तसे टाटांच्या घरातलेच आहेत व ते पारशी नसल्याने, टाटांच्या कुटुंबातील तसेच टाटांच्या कोणत्याही कंपनीत भागधारक नसल्याने दुसऱ्या बाजूला ते घराबाहेरचेही आहेत. अशा व्यक्तीच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे देऊन त्या उद्योग समूहाने हुशारीचे पाऊल टाकले आहे. या पदावर अन्य कोणत्या तरी उद्योग समूहातून माणूस आयात करून त्याची निवड करण्यापेक्षा टाटा संस्कृतीचा उत्तम परिचय असलेल्या व्यक्तीच्या हातीच ही धुरा देणे केव्हाही चांगले हा विचार त्यामागे होताच. चंद्रशेखरन यांचे सख्खे भाऊ एन. जी. सुब्रमण्यम हे टीसीएसमध्येच सीओओ या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे टाटा उद्योग समूहाशी चंद्रशेखरन यांचे व्यक्तिगत व व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर जे स्नेहाचे संबंध आहेत तेही टाटा सन्स उत्कर्षाप्रत नेण्यासाठी उपयोगी पडू शकतील. 

टाटा उद्योग समूहातील रतन टाटांसहित काही धुरीणांचे सायरस मिस्त्री यांच्या कार्यशैलीबाबत अनेक मतभेद होते. रतन टाटा यांचे स्वप्न असलेल्या नॅनो कारच्या उत्पादनामुळे टाटाला तोटा होत असून ते उत्पादन बंद करावे इथपासून ते अन्य काही प्रस्ताव सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सपुढे ठेवले होते. तसेच टाटाच्या अनेक समाजसेवी प्रकल्पांंनाही कात्री लावावी, असे मिस्त्री यांचे म्हणणे होते. टाटा उद्योग समूहात भागधारक असलेल्या शापूरजी पालनजी अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलेल्या सायरस मिस्त्री यांनी आपल्या विचारसरणीनुसार टाटा उद्योग समूहाच्या वाटचालीला वळण देण्याचा प्रयत्न केला. तो पसंत न पडल्यानेच त्यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. याविरोधात मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर दाद मागितली होती. त्या याचिकेची सुनावणी काही दिवसांत होणार अाहे. त्याच्या काही दिवस आधीच एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करून टाटा सन्सनेही मिस्त्री यांचे कायदेशीर आव्हान पेलण्यास सज्ज झाल्याचे दाखवून दिले आहे. आव्हान स्वीकारण्याचे टाटा उद्योग समूहाचे अवसान उसने नसले तरी या उद्योग समूहाला सध्या भेडसावणाऱ्या काही समस्याही तितक्याच उग्र आहेत. त्यावरच सायरस मिस्त्री यांनीही नेमके बोट ठेवले होतेच. टाटा सन्सच्या डोक्यावर आजमितीला २४ अब्ज डॉलरचे कर्ज आहे.
जग्वारमधून होणाऱ्या नफ्याचा अपवाद वगळता टाटा मोटर्स, टाटा टेलिसर्व्हिसेस, टाटांकडून चालविली जाणारी हॉटेल्स या उद्योगांमध्ये टाटाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्या बिकट परिस्थितीतून टाटा सन्सला बाहेर आणणे, भागधारकांचा विश्वास टिकवून ठेवणे, वाढविणे हे कठीण कार्य एन. चंद्रशेखरन यांना करायचे आहे. त्याचबरोबर सायरस मिस्त्री यांनी सुरू केलेल्या कायदेशीर लढाईचाही त्यांना मुकाबला करावा लागेल. टीसीएस या कंपनीकडून टाटा सन्सला सध्या सर्वात जास्त महसूल मिळतो. ही कंपनी ज्या कार्यक्षमतेने एन. चंद्रशेखरन यांनी चालविली तशीच टाटा सन्सचा कारभार पाहताना उद्योग समूहातील विविध कंपन्यांच्या प्रमुखपदावर अधिक कार्यक्षम व्यक्तींच्या नेमणुका करण्यापासून त्यांना कारभाराची सुरुवात करावी लागेल. टाटांच्या विविध कंपन्यांत ज्या विदेशी गुंतवणूकदारांनी पैसा गुंतविला आहे त्यांच्यासाठीही काही चांगले निर्णय घ्यावे लागतील. अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर एन. चंद्रशेखरन यांनी केलेल्या भाषणात ते कोणत्या मार्गाने जाणार याचे सूतोवाच काही प्रमाणात झालेले आहे. चंद्रशेखरन हे जगभरातील मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत. भारतात मूल्यहीन पातळीवर जाऊन व्यवसाय करणारे काही उद्योग समूहही असून त्यांच्या स्पर्धेत टिकून टाटा सन्सला आपले अस्तित्व टिकवून वाढवायचे आहे. घरातले असूनही घराबाहेरचे असामी असलेले एन. चंद्रशेखरन हे आव्हान कसे पेलतात हेच आता पाहायचे.