आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात टेक्नोक्रसी कधी येणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रासंगिक - देशाची घडण, समृद्धी अभियांत्रिकीतून येते.
भारतात अभियंते भरपूर होते तरी एका गोष्टीत भारत मागे राहिला. ‘टेक्नोक्रॅट’ हे सत्तास्थानी आले नाहीत. ते कायम राजकीय नेते वा सनदी अधिकारी यांच्या सेवेत राहिले. यामुळे राजकीय नेते वा सनदी अधिकारी देतील तितकाच वाव कर्तृत्ववान टेक्नोक्रॅटना मिळाला.

जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी वयाची ८१ वर्षे पूर्ण केली असून त्यानिमित्ताने औरंगाबादमध्ये पाणी विषयावर विशेष परिसंवाद होत आहे. पाणी किंवा सिंचन या विषयावरील माधवरावांचा अधिकार हा जगभर मान्य झालेला आहे. नोबेलच्या तोडीचे मानले जाणारे स्टॉकहोम पारितोषिक देऊन त्यांचा वीस वर्षांपूर्वीच गौरव झाला. चाळीसगावमध्ये प्राथमिक शिक्षण, पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण आणि त्यानंतर सरकारी खात्यात काम करीत त्यांनी जागतिक स्तरावर मोहोर उमटवली. आपल्या कामातून जागतिक बँकेत दरारा उत्पन्न केला. भारताला अशक्त म्हणून हिणवणाऱ्यांनी माधवरावांचे जागतिक बँकेतील काम जरा समजून घेतले पाहिजे. भारताकडे ताकद आहे. ती कुठे व कशी वापरायची याचा विवेक पाहिजे. माधवरावांकडे व त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणाऱ्या पंतप्रधानांकडे तो होता. माधवराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित राहिले. त्यांच्या या संबंधांवर एकाही पंतप्रधानाने आक्षेप घेतला नाही. याची दोन कारणे होती. एक तर अखंड अभ्यास करून सिंचन या विषयावर माधवरावांनी निर्विवाद अधिकार प्रस्थापित केला होता. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे व्यवस्थेला आव्हान न देता व्यवस्थेला योग्य दिशा देत त्यांनी देशकार्य केले. व्यवस्थेला आव्हान देत लोकप्रियता मिळविणारे अनेक अधिकारी आहेत. माध्यमे त्यांना डोक्यावरही घेतात. पण त्यातून कशाचीही उभारणी होत नाही. याउलट व्यवस्थेचा उत्तम उपयोग करीत, जरूर तेथे काळाप्रमाणे त्यात बदल करीत काम करणारे अधिकारी देशाच्या उभारणीत योगदान देतात. अब्दुल कलाम, वसंत गोवारीकर, ई. श्रीधरन आणि माधवराव चितळे ही अशी काही उदाहरणे. केवळ आपल्याच पंतप्रधानांचा नव्हे, तर पाकिस्तानचाही विश्वास संपादन करण्यात माधवराव यशस्वी ठरले. शेजारी राष्ट्रांशी यशस्वी पाणी करार करण्याची अवघड कामगिरी त्यांनी पार पाडली आणि याचा कसलाही गाजावाजा होऊ दिला नाही.

राष्ट्रनिर्मितीसाठी आपल्याला काय करायचे आहे याची निश्चित दिशा देणारे गुरुजी तरुण वयात माधवरावांना मिळाले हे त्यांचे भाग्य. ही दिशा होती अभियांत्रिकीची. देशाची घडण, समृद्धी अभियांत्रिकीतून येते आणि समृद्धी आली की मग हक्क, न्याय, स्वातंत्र्य अशा गोष्टींवर चर्चा करता येते. न्याय अर्थव्यवस्थेतील ‘अर्थ’ हा अभियांत्रिकीतून येतो. म्हणूनच आयएएस होऊन अधिकारी बनण्यापेक्षा सिव्हिल इंजिनिअर होऊन राष्ट्रनिर्मितीच्या कामामध्ये सहभागी हो व त्यातही केंद्रातील नव्हे, तर राज्यातील सेवा स्वीकार, कारण महत्त्वाची प्रकल्प बांधणी राज्यांमध्ये होणार आहे, असे कळीचे मार्गदर्शन करणारे गुरुजी अभियांत्रिकी महाविद्यालयात माधवरावांना मिळाले. ही दृष्टी केवळ गुरुजींपुरती नव्हती, तर तेव्हाच्या काँग्रेस राज्यकर्त्यांमध्येही ती होती. काँग्रेसचे असूनही नेते गुणपूजक होते.

चितळ्यांसारख्या बुद्धिमान व सिंचनाबरोबर समाजहिताचा विचार करणाऱ्या तरुणाच्या कर्तृत्वाला वाव देणारे वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा असे नेते महाराष्ट्रात होते. जात, संघनिष्ठा याची आडकाठी आली नाही. हीच स्थिती केंद्रात होती. अभियांत्रिकीचे महत्त्व पंडित नेहरूंना कळले होते. अमेरिकेच्या मदतीने आयआयटी सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. पण पुढे ते साम्यवादी विचाराकडे अधिक वळल्याने अमेरिकेकडून आपल्याला म्हणावे तसे अभियांत्रिकीचे प्रशिक्षण मिळाले नाही. मात्र, देशात अभियांत्रिकीला मान होता व नवे नवे प्रकल्प उभे राहत होते. पुढे तंत्रज्ञानाचे दिवस आले. सुदैवाने राजीव गांधींना तंत्रज्ञानाची उत्तम जाण होती. दोन दशकांपूर्वी सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारताचे वर्चस्व वाढले. त्याला राजीव गांधींची दूरदृष्टी जबाबदार आहे. तंत्रज्ञानाबद्दल राजीव गांधींना जशी पॅशन होती तशी नरसिंह रावांना नसली तरी सिंचनाची जाण होती. वाजपेयींनी तर पायाभूत प्रकल्प जोमाने रेटण्यास प्रारंभ केल्याने अभियांत्रिकीला महत्त्व आले होते. सोनिया गांधी यांच्या काळात मात्र पुन्हा सर्व कामे रेंगाळली. सोनिया-राहुल या मायलेकरांना जगातील तंत्रज्ञानातील बदल, त्याचे आर्थिक व सामाजिक परिणाम अशा गोष्टींबद्दल काडीची आस्था नाही. राष्ट्रीय सल्लागार मंडळ नावाचे जे कोंडाळे सोनिया गांधींभोवती जमले होते त्याने भारताची हानी केली. संपत्ती निर्माण होण्याआधीच त्याच्या वाटपाला सुरुवात झाली. मोठे प्रकल्प राष्ट्रविरोधी ठरू लागले. मोदींच्या काळात तर सुमारांना प्रस्थापित करण्याचा आटापिटा होत आहे.

भारतात अभियंते भरपूर होते, तरी एका गोष्टीत भारत मागे राहिला. ‘टेक्नोक्रॅट’ हे सत्तास्थानी आले नाहीत. ते कायम राजकीय नेते वा सनदी अधिकारी यांच्या सेवेत राहिले. यामुळे राजकीय नेते वा सनदी अधिकारी देतील तितकाच वाव कर्तृत्ववान टेक्नोक्रॅटना मिळाला. नेते वा अधिकारी जेथे शहाणे होते तेथे उत्तम काम झाले; पण बहुतांश ठिकाणी नेते व सनदी अधिकाऱ्यांचा अहंकार टेक्नोक्रॅटच्या आड आला. म्हणूनच इथे काम न करता युरोप-अमेरिकेत तंत्रविशारदांनी नशीब उघडले. जगातील प्रगत देशांकडे पाहिले तर वेगळे चित्र दिसते. अनेक ठिकाणी तंत्रविशारद अधिकारपदावर आहेत. सनदी अधिकाऱ्यांमध्येही तंत्रविशारदांची संख्या मोठी आहे. यामुळे कोणत्याही प्रकल्पावर, विषयावर शास्त्रीय चर्चा तेथे होते. व्यवहारवादी निर्णय घेतला जातो. याउलट आपल्या सार्वजनिक जीवनात तंत्रविशारदांची उपस्थिती नगण्य असल्यामुळे भावना भडकावणारे युक्तिवाद होतात आणि अनेकदा संधी वाया घालवल्या जातात. पर्यावरणाचा शास्त्रीय विचार आपल्याकडे होतच नाही, कारण त्यामध्ये तंत्रविशारदांचा सहभाग नाही. चळवळीतील तंत्रविशारद हे वैचारिक झापडे लावलेले असतात. समाजाबद्दलची कणव हा निकष घेतला तर बाबा आमटे व मेधा पाटकर यांच्यासमोर नतमस्तक होण्यास काहीच हरकत नाही; पण नर्मदेवर धरण कसे, कुठे व कोणते बांधायचे यावर ते बोलू लागले तर राष्ट्राचे नुकसान होते. तो विषय अभियांत्रिकीचा आहे, सामाजिक शास्त्राचा नाही. हाच प्रकार शिक्षणापासून अन्य अनेक क्षेत्रांमध्ये होतो. आज सिंचन क्षेत्रात हायड्रोलिक्स या विषयातील असंख्य तज्ज्ञांची गरज आहे. चीनने यामध्ये खूप मोठी झेप घेतली आहे. पण आपल्याकडील सिंचन खाते अद्याप राजकीय व सनदी पाशात गुरफटलेले आहे.

भारतात ‘डेमॉक्रसी’ आली, रुजली. डेमॉक्रसीला व्यवस्थित चालवण्यासाठी ‘ब्युरोक्रसी’ आली. तीही स्थिर झाली. मात्र, डेमॉक्रसीला समृद्धी आणण्यासाठी अत्यावश्यक असलेली ‘टेक्नोक्रसी’ आली नाही. ‘मेरिटोक्रसी’ तर फारच दूर आहे.

टेक्नोक्रसी रुजविण्याची संधी असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी ती वाया घालवित आहेत.
बातम्या आणखी आहेत...