आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचा पाकविरोध दुबळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परराष्ट्रकारण - पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध धोरण आखलेले नाही.
भाजपचा घनिष्ठ मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या धोरणांमुळे पंजाबमध्ये संपुष्टात आलेला दहशतवाद पुन्हा जिवंत होण्यास मदतच होत आहे. गुरुदासपूर येथे झालेला हल्ला हेच सांगत आहे.
पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादी कारवाया कायमच्या रोखण्यासाठी आम्ही अत्यंत कडक उपाययोजना करू, अशी गर्जना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २९ सप्टेंबर २०१३ रोजी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात केली होती. पाकिस्तानबाबत तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ‘दुबळी नीती’ अवलंबल्याचा आरोप करून मोदी म्हणाले होते की, पाकिस्तानने भारतावर लादलेल्या दहशतवादाबद्दल चर्चा करण्याचे धाडस डॉ. मनमोहनसिंग यांनी नवाझ शरीफ यांच्याशी झालेल्या भेटीत दाखविले असेल का, याबद्दल माझ्या मनात संशय आहे.'

२७ जुलै २०१५ रोजी पंजाबमध्ये गुरुदासपूर येथे गेल्या दहा वर्षांतील सर्वात भीषण असा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जिल्हा पोलिस अधीक्षकासह १२ जण ठार झाले. लोकसभा निवडणूक प्रचारात दहशतवाद रोखण्याबद्दल मोदींनी जी भरभरून आश्वासने दिली होती, त्यातील फोलपणा या हल्ल्यामुळे उघड झाला. या दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर त्यांच्याकडील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला व त्यांच्याकडे असलेल्या जीपीएस उपकरणांचे विश्लेषण केले असता अशी माहिती मिळाली की, पाकिस्तानातील शकरगढ येथील एका गावातून २१ जुलैला दहशतवाद्यांनी प्रवासाला सुरुवात केली. रावी नदीची उपनदी उझ पार करून ते पंजाबमधील बमियाल गावात पोहोचले. तेथून बसमधून ते दीनानगर येथे २७ जुलै रोजी पहाटे पोहोचले. भारतीय गुप्तहेर संघटनांनी दहशतवाद्यांच्या एका संभाषणाचा छडा लावत, पाकिस्तान भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नेहमीपेक्षा वेगळ्याच मार्गाचा वापर करणार आहे, असा इशारा दिला होता.

२००७, २०१० व २०१२ या वर्षांतील घटना वगळता २००४ ते २०१४ या कालावधीत यूपीए सरकार केंद्रात सत्तेवर असताना पंजाब दहशतवादापासून मुक्त होता; पण २०१५ मध्ये पंजाबमध्ये दहशतवादाने अचानक उसळी घेतली आहे. पंजाब सरकारच्या चुकीच्या धोरणांचे भांडवल करत पाकिस्तानने असे सूचित केले की, गुरुदासपूरचा हल्ला हा शीख दहशतवाद्यांनीच केला. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या धोरणांमुळे पंजाबमध्ये संपुष्टात आलेला दहशतवाद पुन्हा जिवंत होण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या मदतच होत आहे.

केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधानपदाच्या शपथविधी समारंभात मोदी यांनी नवाझ शरीफ यांच्यासमवेत सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले होते. या शपथविधीच्या तीन दिवसच आधी हेरात येथील भारतीय वकिलातीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले होते. मे २०१४ मध्ये सीमेवरील शस्त्रसंधीचा भंग करण्याच्या घटना पाकिस्तानकडून घडत होत्या. त्यानंतर पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांनी फुटीरतावादी हुरियतच्या नेत्यांची भेट घेतल्याचा निषेध करत भारताने आपल्या परराष्ट्र सचिवांची चर्चेच्या निमित्त होणारी पाकिस्तान भेटच रद्द केली होती. मात्र, या भूमिकेला १३ फेब्रुवारी २०१५ रोजी अनपेक्षित वळण मिळून ‘क्रिकेट डिप्लोमसी’च्या नावाखाली मोदी यांनी नवाझ शरीफ यांना दूरध्वनी केला. भारताचे परराष्ट्र सचिव जयशंकर आपल्या सार्क दौऱ्यात पाकिस्तानलाही भेट देतील, असे शरीफ यांना सांगण्यात आले.

इतके सारे होऊनही पाकिस्तानने भारतविरोधी कारवाया काही थांबवल्या नाहीत. पाकिस्तानात दहशतवादी कारवाया घडवण्यामध्ये भारताचा हात आहे, असा आरोप ५ मे २०१५ रोजी पाकिस्तान कॉर्पस कमांडर्स कॉन्फरन्समध्ये करण्यात आला. पाकिस्तानातील ‘एमक्यूएम’ला ‘रॉ’ही भारतीय गुप्तचर संघटना पैसा पुरवते, हा या कॉन्फरन्समध्ये झालेला आरोप लंडन पोलिसांनीच खोटा असल्याचे पुढे सप्रमाण सांगितले. मात्र, या आरोपाची बाधा न होता रशियातील उफा शहरात जुलै महिन्यात मोदी व शरीफ यांची भेट झाली. त्यानंतर दोन्ही देशांत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी सहमती दर्शविण्यात आली. पुढील वर्षी पाकिस्तानला भेट देण्याचे नवाझ शरीफ यांनी दिलेले निमंत्रणही मोदींनी या वेळी स्वीकारले. २६/११च्या मुंबई हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानमध्ये जे खटले चालू आहेत, त्यांचा वेगाने निकाल लावण्यासाठी शरीफ सरकारने प्रयत्न करणे तसेच या गुन्हेगारांविरोधातील पुराव्यांची दोन्ही देशांनी देवाण-घेवाण करणे या गोष्टी या भेटीत मान्य करण्यात आल्या. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची एक बैठक दिल्लीत लवकरच आयोजित करून त्यात दहशतवादाच्या मुद्द्यावर सांगोपांग चर्चा करण्याचेही उफामध्ये दोन्ही नेत्यांनी ठरवले.

मात्र, या निवेदनाला लगेचच छेद देण्याचे काम पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी केले. संयुक्त निवेदनापेक्षा वेगळे वक्तव्य त्यांनी २६/११च्या खटल्यांबाबत तसेच आरोपींच्या आवाजाच्या नमुन्यांची देवाण-घेवाण करण्याबाबत केले. पाकिस्तानी कायद्याला अशी देवाण-घेवाण मंजूर नसल्याचे अजीज यांनी म्हटले. नेमके याच वेळेस सरताज अजीज हे दिल्लीच्या दौऱ्यावर येत असल्याचे जाहीर करण्यात आले. पेशावरमधील शाळेवर १६ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३२ विद्यार्थ्यांसह १४२ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे पुरावे घेऊन अजीज दिल्लीमध्ये येणार होते.

एकंदरीत २७ जुलै रोजी गुरुदासपूर येथे झालेल्या हल्ल्यानंतर २९ जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील मचिल भागामध्ये पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचा भंग केल्याच्या दोन घटना घडल्या. परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. गेल्या जुलैमध्ये शस्त्रसंधीचा भंग झाल्याच्या १३ घटना घडल्या. माजी केंद्रीय मंत्री गिरिधारीलाल डोग्रा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी १७ जुलै रोजी जम्मू येथे आले होते. त्याच्या दोन दिवस आधी अखनूरमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात एक भारतीय महिला ठार व काही जण जखमी झाले होते. ही सारी परिस्थिती पाहता पाकिस्तानच्या विरोधात कोणतीही ठोस कृती वा धोरण न आखता फक्त छाती फुलवणारी पोकळ वक्तव्ये करणे मोदी सरकारने सुरू ठेवले आहे. ५६ इंचांच्या छातीची भाषा करणाऱ्यांचा फोलपणा उघड झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...