आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखारी वृत्तीचे आव्हान (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या मार्च महिन्यात ब्रिटनमध्ये संसद परिसरामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यानंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी सावधानतेच्या सूचना दिल्या होत्या तरीही कॉस्मोपॉलिटन संस्कृती असलेल्या मँचेस्टर शहरात काल एका पॉप शोमध्ये एका माथेफिरूने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले व निष्पाप २२ तरुण मुलामुलींचा बळी गेला. ब्रिटनमध्ये ८ जूनला सार्वत्रिक निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर हा दहशतवादी हल्ला झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. २००५ मध्ये लंडनमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर घरात स्फोटके तयार होतील अशा पदार्थांवर कडक निर्बंध घालण्यात आले होते.

ब्रिटनची पोलिस यंत्रणा नेहमीच सतर्क असते. ती अत्याधुनिक तंत्रज्ञानानेही सज्ज असल्याने युरोपमध्ये दहशतवादी हल्ले होऊनही ब्रिटन सुरक्षित होते. ब्रिटनची गुप्तहेर संघटना एम आय-५ नेही दहशतवाद्यांचे काही कट उघडकीस आणले होते. तरीही असा हल्ला झाल्याने ब्रिटनचे पोलिस चक्रावून गेले आहेत. मार्चमध्ये संसदेच्या परिसरात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर असे हल्ले भविष्यात घडू शकतात, असे इशारे सुरक्षा यंत्रणांनी दिल्यानंतरही मँचेस्टरमध्ये हल्ला झाला. यावरून असे लक्षात येते की, दहशतवाद्यांचे हल्ला करण्याचे तंत्र बदलले आहे. एकटा- दुकटा दहशतवादी अंगावर बॉम्ब लपेटून गर्दीच्या ठिकाणी स्वत:ला उडवून देऊ शकतो.

एखाद्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यासाठी परिसराची रेकी करावी लागते. कडव्या विचारांनी प्रेरित झालेल्या तरुणांना हाताशी घेऊन टोळी स्थापन करावी लागते. बॉम्ब, बंदुका अन्य शस्त्रे घटनास्थळी नेण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांना चकवा द्यावा लागतो. काही हल्ले तर खबऱ्यांमार्फत उघडकीस होत असतात. अशा परिस्थितीत अनेक धोक्यांचा सामना करण्यापेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवणे हा सोपा व सुलभ मार्ग दहशतवादी संघटनांनी गेल्या काही वर्षांत अनुसरला आहे. हल्लेच आत्मघातकी स्वरूपाचे असल्याने सुरक्षा यंत्रणांना कटाचे धागेदोरे शोधताना बरीच मेहनत करावी लागते. काही हल्ले आपणच केले, असा खोटा दावा करणारेही दहशतवादी गट असतात. अशा गटांना स्वत:ची दहशत समाजात प्रस्थापित करायची असते. तपासाची दिशा चुकवायची असते. मँचेस्टरमध्ये झालेला हल्ला कोणी केला याची माहिती अजून उघड झालेली नाही. पण या प्रकारच्या हल्ल्यांचा इतिहास पाहता युरोप आता वेगळ्या प्रकारच्या दहशतवादाला सामोरे जात आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. फ्रान्स, ऑस्ट्रियामध्ये उजव्या कट्टरवाद्यांचा पराभव झाल्यानंतर संशयाचे, संतापाचे, चिघळलेले एक वातावरण शांत होत असतानाच हा हल्ला करून सामाजिक सौहार्द बिघडावे, अशी दहशतवाद्यांची इच्छा आहे.
 
गेल्या आठवड्यात सिरिया-इराक पट्ट्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यांचा मँचेस्टर हल्ल्याशी थेट संबंध नाही, पण इसिसचा दहशतवाद संपत आला असल्याच्या या घटना आहेत. इसिसची ताकद जसजशी कमी होत जाईल तशा त्याच्या प्रतिक्रिया उमटू  शकतात. पहिली घटना, इराकमधील मोसूल शहरात घडली. इराकच्या फौजांनी इसिसच्या ताब्यात असलेले मोसूल शहर पुन्हा ताब्यात घेतले. शिवाय इराकच्या पश्चिम भागात काही ठिकाणी इसिसचे वर्चस्व संपुष्टात आणण्यात इराकला यश मिळाले आहे. सध्या काही भागात तुरळक संघर्ष दिसतो, पण गेली चार वर्षे इसिसने इराकचे जे काही प्रदेश ताब्यात घेतले होते ते सर्व अमेरिका व इराकच्या फौजांनी पुन्हा मिळवले आहेत. तर दुसरी घटना अमेरिकेने इराक-सिरिया सीमेवरील दैरल झोर व अल बुकामल या इसिसच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले.

गेल्या काही महिन्यांत रशिया-सिरिया व अमेरिका-इराक यांच्या फौजांमध्ये समन्वय निर्माण होऊन इसिसला नेस्तनाबूत करण्यासाठी मोठ्या कारवाया हाती घेतल्या होत्या. त्यात यश आल्याचे चित्र दिसू लागले आहे. इसिसचा विनाश आता जवळ असल्याचे लक्षात घेता अमेरिका व रशिया या दोघांनी सिरियाच्या पुनरुज्जीवनासाठी एकत्र येण्याचे काही आराखडे आखले आहेत. ही पश्चिम आशियाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी जशी अमेरिकेने भारताची मदत घेतली होती तशा हालचाली यादवीग्रस्त सिरिया व युद्धग्रस्त इराकबाबत अमेरिका-रशिया करत असल्याने इसिस व अन्य दहशतवादी संघटना अस्थिर होत जाणार आहेत. त्यांचा संघटनात्मक कणाच मोडल्याने परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे. पण दहशतवादाची जी विखारी विचारसरणी असते त्याचा मुकाबला करण्याची सर्वंकष तयारी जगाला करावी लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...