आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुणावत होते नवे आव्हान (नेहरुंवरील पुस्तकातील काही उतारे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जवाहरलाल नेहरू यांच्या ५१ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राजहंस प्रकाशन "नेहरू : द मेकिंग ऑफ इंडिया' या एम. जे.अकबर लिखित नेहरू चरित्राचा करुणा गोखले यांनी केलेला मराठी अनुवाद प्रकाशित करत आहे. त्यातील वेचक उतारे.
माउंटबॅटन यांच्याकडे दोन राष्ट्रांचे दडपण आले होते. १६ ऑगस्ट रोजी त्यांनी जी खासगी, गोपनीय टिपणे लिहिली, त्यात ते म्हणतात : हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा आठवडा सर्वात धामधुमीचा होता. १३ ऑगस्ट रोजी व्हाइसरॉय कराचीला होते. त्यांचा कार्यक्रम ऐनवेळी बदलण्यात आला. कारण होते जिनांचे अज्ञान. जिनांनी व्हाइसरॉयच्या सन्मानाप्रीत्यर्थ दुपारी शाही खाना आयोजित केला होता. परंतु तो रमझानचा महिना आहे, याचा त्यांना पूर्ण विसर पडला. (जिनांचे इस्लाम धर्माचे ज्ञान त्यांच्या उर्दूच्या ज्ञानाइतकेच अगाध होते.) रोजे असताना लोक कसे मेजवानीस येणार? म्हणून घाईघाईने दुपारचा खाना संध्याकाळी ठरवण्यात आला. त्याआधी खास साठ जणांसाठी मेजवानी ठेवण्यात आली. त्या वेळी व्हाइसरॉय यांच्या एका बाजूला फातिमा जिना, तर दुसऱ्या बाजूला बेगम लियाकत अली बसल्या होत्या. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीचा सोहळा एका ज्योतिष्याच्या सांगण्यावरून रात्री बारा वाजता ठेवला आहे, या मुद्द्यावरून दोघी माउंटबॅटन यांना चिडवत होत्या. दुसऱ्या दिवशी व्हाइसरॉय यांनी पाकिस्तानच्या संविधान समितीसमोर भाषण केले, सरकारी मिरवणुकीत खुल्या गाडीतून सहभागी झाले व त्यानंतर दिल्लीला जाण्याकरिता विमानतळाकडे रवाना झाले. त्या प्रसंगाचे वर्णन करताना ते लिहितात, "आम्हाला निरोप देताना कर्तव्यकठोर जिनासुद्धा थोडे भावुक झाल्यासारखे वाटले.' मात्र दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये जो आनंदोत्सव बघण्यास मिळाला, तो अविस्मरणीय होता. मध्यरात्रीचा क्षण आला : भारतीय स्वातंत्र्याचा श्रीगणेशा करण्यासाठी घटना परिषद एकत्र आली.

एक क्षितिज पार केले होते. दुसरे जवाहरलालांना खुणावत होते. रात्री बरोबर बारा वाजता त्यांनी घटना परिषदेस संबोधून भाषण केले. आयुष्यभर स्वातंत्र्याच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी झगडणारी व्यक्तीच असे भाषण करू शकते. त्या भाषणावर पूर्णतया नेहरूंच्या विचारव्यक्तित्वाची मुद्रा होती. अतिशय नेमक्या शब्दांमधून व्यक्त झालेला श्रद्धा-विश्वासाचा सुसंगत मेळ, प्रयत्न आणि वचन त्यात एकत्र गुंफले होते. रात्रीच्या बारा वाजता बंदुकांच्या सलामीने जगाच्या इतिहासात नवे पर्व सुरू झाल्याची ग्वाही दिली आणि विसाव्या शतकात वसाहतवादास नामोहरम करणाऱ्या पहिल्यावहिल्या देशाचा नेता बोलण्यास उठला :
अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आता तो पूर्ण करण्याचा क्षण आला आहे. आपण आपले वचन पूर्णतया जरी नाही, तरी खूपशा अंशी पूर्ण करू. रात्रीच्या बाराच्या ठोक्याला, जेव्हा संपूर्ण जग निद्राधीन असेल, तेव्हा भारत मात्र स्वातंत्र्य आणि नवजीवनाची पहाट बघण्यासाठी जागा होईल. इतिहासात फार क्वचित एक क्षण असा येतो, की आपण जुने टाकून देऊन नव्या विश्वात पदार्पण करतो. आत्मा पुनरुज्जीवित होऊन त्यास त्याचा हुंकार गवसतो. या पवित्र क्षणी आपण एक प्रतिज्ञा करू या : भारतमातेच्या व तिच्या जनतेच्या सेवेसाठी व त्याहूनही उदात्त अशा मानवतेच्या सेवेसाठी आपण सारे जीवन अर्पण करू.

यापेक्षा अधिक उन्नत मार्गदर्शक कोणत्या राष्ट्राला हवा असेल?
माउंटबॅटन लिहितात : १५ ऑगस्ट १९४७ हा माझ्या आयुष्यातील अत्यंत लक्षणीय आणि प्रेरणादायी दिवस आहे, यात काही वाद नाही. स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून त्यांचा पहिला दिवस साडेआठ वाजता दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या शपथविधीने सुरू झाला. समारंभास अनेक स्वातंत्र्यसैनिक, संस्थानिक आणि राजदूत उपस्थित होते. या औपचारिक सोहळ्यासाठी ते गव्हर्नमेंट हाऊस (आता ते व्हाइसरॉयचे निवासस्थान राहिले नव्हते.) ते कौन्सिल चेंबर हे छोटेसे अंतरही गाडीतून आले. बाहेरचे रुंद रस्ते गर्दीने फुलून गेले होते. जमावाचा रेटा एवढा प्रचंड होता की शपथविधी सोहळ्यानंतर ४०० रक्षक तैनात असूनही माउंटबॅटनना त्यांच्या गाडीपर्यंत जायला जागा मिळेना. पण त्या दिवशी एका व्यक्तीने आदेश देण्याची खोटी, की कोणतीही इच्छा हुकमात बदलू शकत होती. माउंटबॅटन गाडीपर्यंत पोहोचू शकत नाहीत हे बघताच नेहरू गच्चीवर गेले व तेथून त्यांनी जमावास मागे सरकण्याचा इशारा केला. काम फत्ते! त्या दिवशी केवळ स्वत:च्या गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी माउंटबॅटन यांना अर्धा तास लागला. जमाव तालासुरात घोषणा देत होता : जय हिंद, पंडित नेहरू की जय, महात्मा गांधी की जय! एवढेच काय, पण लोकांनी अत्यंत प्रेमाने पंडित माउंटबॅटन की जय, अशाही घोषणा दिल्या.

त्या दिवशीचा सर्वात महत्त्वाचा समारंभ संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला होता : इंडिया गेट येथे एका नवीन राष्ट्राच्या नव्या ध्वजास वंदन करण्याचा सोहळा! १९२९ सालच्या डिसेंबरमध्ये काँग्रेसने नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वराज्याची मागणी केली. त्या वेळी नेहरू रावी नदीच्या किनारी ध्वजदंडाभोवती नाचले होते. आज अखेरीस स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा पुनश्च नेहरूच भारतीय स्वातंत्र्याचा आवाज बनून लोकांसमोर येत होते. या मंगलप्रसंगी त्यांना कटुतेचा अंशही नको होता. औपचारिक सोहळ्यात युनियन जॅक खाली उतरवणे व त्यानंतर तिरंगा फडकवणे असे दोन विधी समाविष्ट होते. परंतु नेहरूंनी पहिला सोहळा रद्द केला. अद्यापि सरकारी सेवेत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, म्हणून ही खबरदारी. त्या दिवशी इंडिया गेट येथे उसळलेला जनसागर मोजमापापलीकडचा होता. औपचारिक सोहळ्यात साग्रसंगीत विधी करण्याचे ठरले होते. त्यासाठी वाद्यवृंदही तैनात केला होता. परंतु तेथे उसळलेला जनसागर एवढा अथांग होता की कुठलेही औपचारिक सोपस्कार करणे शक्य नव्हते. अखेरीस नेहरू, माउंटबॅटन आणि दिल्ली विभागाचे तत्कालीन कमांडर, मेजर-जनरल राजेंद्र सिंग यांनी आपसात सल्लामसलत करून विधिपूर्वक सोहळा रद्द केला. फक्त बंदुकांची सलामी देऊन ध्वज फडकवायचा असे ठरले. तिरंगा सरसर वर गेला आणि आभाळाच्या पार्श्वभूमीवर उलगडून फडकू लागला. नेमके त्याच क्षणी आकाशात इंद्रधनुष्य झळकले. जणू ईश्वराने शुभसंकेत दिला.
बातम्या आणखी आहेत...