ब्रिटनमध्ये राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था सर्वच नागरिकांसाठी मोफत आहे आणि इमर्जन्सी व अॅक्सिडेंट यामध्ये तर ती पूर्णच मोफत आहे, अगदी पर्यटकांसाठीही. मला वाटते, हे सारे चांगल्या संस्कृतीचे निदर्शक आहे.
मी हा लेख इंग्लंडमधील हर्टफोर्डशायरमधून लिहितो आहे. माझा डावा पाय फ्रॅक्चर झालेल्या अवस्थेत मी आहे. मी बॉलिंग करत होतो तितक्यात माझा डावा पाय आतल्या बाजूला वळला आणि मी पडलो. माझ्या गुडघ्याला वर्मी घाव बसला. माझ्या लगेचच लक्षात आले की काही तरी गंभीर दुखापत झालेली आहे. स्नायू लचकला असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले. म्हटले काही काळाने
आपोआप बरे होईल. दोन-एक दिवसांनंतर पाय फुग्यासारखा फुगला होता. मग मी ठरवले की, डॉक्टरला दाखवायचे. त्यानंतर कळेल की काय झालेय ते. मी हार्ले स्ट्रीट लंडनमधील डॉक्टरला फोन केला. ते म्हणाले की, दुपारी मी येऊ शकतो; पण एक्स-रेचा निर्णय केवळ दुसऱ्या दिवशीच सांगण्यात येईल. अर्थात मी वाट पाहिली नाही आणि सरळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये अॅक्सिडेंट अँड इमर्जन्सी वॉर्डमध्ये पोहोचलो. मी त्यांना सांगितले की, मी बंगळुरूवरून आलो आहे आणि काही दिवसांत मला परत जायचे आहे. तिथल्या निरीक्षकाने माझी नोंद केली आणि डझनभर रुग्णांसोबत मला बाहेर बसायला सांगितले. त्यातल्या अनेकांची अवस्था माझ्यापेक्षा वाईट होती. अर्धा तास वाट पहिल्यानंतर एका नर्सने मला बोलावले. तिने सूज तपासली आणि मला एक्स-रे काढायला पाठवले. इथे रेडिओलॉजिस्टने अनेक फोटो घेतले आणि सांगितले की, पायाला फ्रॅक्चर झालेले आहे. तिने मला हेही विचारले की, अशा पायाने मी चालत होतो काय? मी म्हटले हो! तिने ताबडतोब व्हीलचेअर मागवली आणि मग दुसऱ्या इमारतीतील डॉक्टरकडे पाठवले. अजून अर्धा तास वाट पहिल्यानंतर एका माणसाने मला स्कॅन दाखवले. (इथले बरेच डॉक्टर भारतीय आहेत.) त्यात माझ्या कोपऱ्याला जोडणाऱ्या हाडामध्ये फ्रॅक्चरची वळलेली रेषा दिसत होती. नंतर मग त्याने मला असे सांगितले की, माझ्या पायाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कास्टमध्ये घालणार आहेत आणि ते तयार व्हायला अर्धा तास लागेल. काही मिनिटे वाट पाहिल्यावर एका बाईने मला बोलावले आणि माझ्या चपलेचा आकार किती आहे विचारले, मी सांगितले ११. मग ती कास्ट तयार करायला गेली हा खरे तर एक मोठा प्लास्टिकचा बूट होता, ज्याला बाहेरच्या बाजूने कठीण आवरण होते, पण आतून मात्र तो नरम होता. जेणेकरून थोडीशी हालचाल आतमध्ये करता येईल.
या उपकरणाबरोबर दोन मोठे मोजे आले आणि मग तिथल्या निरीक्षक आणि नर्स यांनी मला यामध्ये हळूहळू पाय कसा घालायचा हे नीटपणे दाखवले. तिने विचारले, तुम्हाला एक्स-रेची सीडी मिळाली का? मी म्हटले, अजून नाही. त्यामुळे ती ताबडतोब पहिल्या इमारतीमध्ये गेली आणि तिने सीडी कॉपी करून आणली. नंतर तिने या इमारतीमधून बाहेर कसे जायचे हे दाखवले, या घडामोडींना पाच मिनिटे लागली. मला यासाठी काही पैसे द्यावे लागले नाहीत. जे काही घडले ते सारे मग त्याची नोंदणी, कन्सल्टन्सी, एक्स-रे आणि पायात घातलेला कास्ट हे सारे मोफत होते. ज्या हॉस्पिटलमध्ये मी प्रवेश केला होता तिथून दोन तासांत मी व्यवस्थित बाहेर पडलो.
हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे ब्रिटिश वर्तमानपत्रांत सततच राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था कशी बिघडली आहे याच्या बातम्या येत असतात. राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था सर्वच नागरिकांसाठी मोफत आहे आणि इमर्जन्सी व अॅक्सिडेंट यामध्ये तर ती पूर्णच मोफत आहे, अगदी पर्यटकांसाठीही. मला वाटते, हे सारे चांगल्या संस्कृतीचे निदर्शक आहे.
कदाचित असेही असेल की, ब्रिटिशांचा नेहमीचा अनुभव माझ्या अनुभवासारखा नसेल आणि इमर्जन्सी वॉर्डमधले काम हे काही एकूणच आरोग्य सेवा कशी चालते किंवा सरकार ते कशी चालवते याचा निदर्शक असू शकत नाही. पण ज्या काळजीने आणि ज्या कार्यक्षमतेने त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले त्यावरून एवढे लक्षात येते की, एक उत्तम चालणाऱ्या व्यवस्थेचा तो भाग असला पाहिजे.
कशालाच पैसे द्यावे न लागल्यामुळे माझ्या मनात अपराधीपणाची भावना कुरतडत होती. पण मग मला वाटले की, इंग्लंडमध्ये जाणाऱ्या हजारो डॉक्टरांचा शिक्षणाचा खर्च तर माझ्याच करामधून झालेला आहे. राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेवर ब्रिटिश सरकार ९.३ लाख कोटी रु. खर्च करते याचाच अर्थ दर नागरिकामागे १.५ लाख रु. खर्च होतात. भारताच्या एकूण आरोग्याचे वार्षिक बजेट आहे ३३,००० कोटी रु. ज्यामध्ये प्रत्येक नागरिकामागे २६० रुपये खर्च होतात. अर्थातच आपण गरीब राष्ट्र आहोत; पण असे दुसरे कुठले गरीब राष्ट्र आहे जे ३६ विमानांसाठी ५९,००० कोटी रु. खर्च करते आणि बुलेट ट्रेनसाठी ९९,००० कोटी रु.?
मला वाटते या प्रकारे जर मूर्खपणे खर्च केला तर कुठलाही ब्रिटिश नागरिक ते सहन करणार नाही. अशा खेळण्यांवर खर्च करून आरोग्याला पिछाडीवर टाकणे त्यांना मंजूर नसेल. भारतीय मध्यमवर्गाचा प्रभाव पूर्ण वाढला आहे आणि त्यावरच्या चर्चा ही आणि त्यातूनच या गोष्टी गरिबांवर लादल्या जातात. आपल्याला वाटते महासत्ता बनणे म्हणजे जपानी तंत्रज्ञान इथे आणून ते लोकांना दाखवणे आणि युद्धाचे खेळ खेळणे. उलट ब्रिटनमध्ये सुसंस्कृत असणे याचा अर्थ अशी एक व्यवस्था निर्माण करणे की ज्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची व प्रकृतीची काळजी घेतली जाईल, त्यांची देखभाल केली जाईल. अशी व्यवस्था निर्माण करणे हा त्यांच्या दृष्टीने संस्कृतीचा अर्थ आहे.
अनुवाद : शशिकांत सावंत
आकार पटेल (ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक)