आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठे की राजकारण्यांची केंद्रे ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विद्यापीठातील निलंबित व अपंग प्राध्यापक जी. एन. साईबाबा व इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावल्यानंतर देशात सगळीकडेच प्रसारमाध्यमांमधून उलटसुलट चर्चेचा ओघ सुरू झाला आहे. काही जणांनी साईबाबा हे ९० टक्के अपंग असताना त्यांना शिक्षा कशी सुनावली जाऊ शकते, अशी विचारणा करत निकालावर टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात न्यायाधीशांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. ‘साईबाबा अपंग आहेत. म्हणून त्यांच्याबाबत सौम्य दृष्टिकोन ठेवण्याची काही गरज नाही. शारीरिक अपंगत्व असले तरी मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या ते सक्षम आहेत. बंदी घातलेल्या संघटना व त्यांच्या नेत्यांसाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करण्याच्या क्षमतेत ते आहेत. माओवाद्यांच्या हिंसाचारामध्ये गडचिरोली जिल्ह्यात अनेकांचे मृत्यू झाले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. नक्षल चळवळ व त्यांच्या हिंसक कारवायांमुळे गडचिरोली जिल्ह्याची अवस्था १९८२ मध्ये जशी होती तशी बनली. बंदी घातलेल्या संघटना व त्यांचे सदस्य त्याला कारण आहेत. या प्राध्यापक महाशयांच्या दिल्ली विद्यापीठाच्या आवारातील घरातून अनेक कागदपत्रे, संगणकाची हार्डडिस्क, पेनड्राइव्ह पोलिसांनी जप्त केेले होते. निरोप्या म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी हेम मिश्रा हा आझमगड येथे जात असताना महाराष्ट्र पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्याच्याकडे मायक्रोचिप सापडली. ती कुठून आली याचा शोध घेत घेत पोलिस दिल्ली विद्यापीठापर्यंत पोहोचले. पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा देताना या इलेक्ट्राॅनिक साधनांमधील पुरावा न्यायालयाने महत्त्वाचा मानला आहे. शिक्षेबद्दल न्यायाधीशांनी म्हटले ते असे, ‘जन्मठेप ही शिक्षा यांच्यासाठी पुरेशी नाही. पण कोर्टाचे हात कायद्याच्या चौकटीने बांधले आहेत.’ 
अर्थात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, साईबाबा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांवरील शिक्षेची कारवाई ही कायद्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. निकाल आहे तो गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाचा. त्यावर वरच्या न्यायालयांचे शिक्कामोर्तब अजून व्हायचे आहे. खटल्यांच्या प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यानंतरच पाच जणांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होईल. पण या निकालामुळे देशातील विद्यापीठे, महाविद्यालये व तेथे येणाऱ्या तरुणाईचा वापर कोण कसा करून घेतो हाही नेहमीप्रमाणेच निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा मुद्दा बनला आहे. 

विद्यापीठे किंवा महाविद्यालये ही विद्यार्जनाची केंद्रे या भूमिकेतून विकसित केली खरी, पण आज ही अभ्यासाची केंद्रे न राहता विद्यापीठेही कुठल्या तरी राजकीय विचारांच्या चळवळीसाठी कार्यकर्ते तयार करण्याचे कारखाने बनत चालले आहेत. आणि विशेष म्हणजे साईबाबासारखे प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करण्यापेक्षा देशद्रोही कामासाठी त्यांचा वापर कसा करून घेता येईल याच प्रयत्नात असतात. आता वेळ अशी आली आहे की, अशा सगळ्या शक्तींना मग त्या डाव्या असो की उजव्या असो किंवा कोणत्याही विचारसरणीचा असो त्या नेत्यांना उघडे पाडण्याची, त्यांच्यावरच कारवाई करण्याची वेळ आली आहे. मग कोणताही राजकीय पक्ष त्यामागे असला तरी त्यांनाही त्याची फळे भोगावी लागली पाहिजेत. अर्थात हे म्हणणे सोपे आहे. पण राजकीय हेतूसाठी विद्यार्थ्यांचा वापर करून घेण्याची सवय असलेल्या कालच्या आणि आजच्या सत्ताधाऱ्यांकडून ते होणे सध्या तरी अशक्य आहे. विद्यापीठे, तेथील प्राध्यापक, विद्यार्थी या सगळ्यांवर होणारा खर्च हा नागरिकांकडून कररूपाने जमा होणाऱ्या पैशातून होतो. हे त्या वर्तुळातील कोणत्याही घटकाने विसरता कामा नये. पण सोयीस्कर विस्मृतीमधून देशाच्या विरोधात किंवा कोणत्यातरी विचारसरणीच्या विरोधात माथे भडकवणारे माथेफिरू तयार करायचे. हेच आता वाढत चालले आहे. यासाठी ज्या संघटना काम करतात त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे नसतात. नुसते प्रश्न निर्माण करून विद्यार्थ्यांची मने विशिष्ट हेतूने कलुषित करण्याचेच काम चालते. त्यासाठी घटनेने दिलेल्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा हक्काने वापर केला जातो. याला कोणतीही संघटना अपवाद नाही. या सगळ्या एकूण वातावरणामुळे जे विद्यार्थी खरोखर शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठात, महाविद्यालयात येतात त्यांच्यासाठी हा फार मोठा अडसर बनला आहे. कोणती संघटना काय करते आहे, याचे घेणे-देणे अशा विद्यार्थ्यांना नसते. त्यांच्याबाबत कोणी बोलतही नाही. याउपर ज्यांना कोणाला कोणत्याही राजकीय चळवळीत, संघटनेत काम करायचे असेल त्यांनी ते जरूर करावे.  पण अगोदर तोंडावर घातलेला विद्यार्थ्याचा बुरखा काढावा आणि उघडपणाने काम करावे. त्याला कोणी हरकत घेणार नाही. पण शिक्षणाच्या नावाखाली आत घुसायचे आणि विद्यार्जनापेक्षा बाकीचेच उद्योग करायचे हे थांबले पाहिजे. 

‑ निवासी संपादक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...