आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मानी संकटांची मालिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी बरसलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा विदर्भ आणि मराठवाड्यातील रब्बी पिकांची वाताहत केली. खरिपाच्या सुरुवातीपासूनच शेतकर्‍यावर कोसळणार्‍या अस्मानी संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. प्रामुख्याने या दोन विभागांत सप्टेंबरपर्यंत अल्प पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर खरिपाची पेरणी झाली नाही. काही भागात जुलै महिन्यात थोडाफार पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर आदींची जी काही पेरणी शेतकर्‍यांनी केली ती पावसाने दगा दिल्याने करपली. महागामोलाचे बियाणे वाया गेले. त्यानंतर पुन्हा कर्ज काढून शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली. पण पीक हातात येत असताना गारपीट झाली. परिणामी हतबल झालेल्या बळीराजाने मृत्यूला जवळ करण्याचा मार्ग पत्करला.

आत्महत्यांचे हे सत्र थांबत नसताना जळगाव, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. द्राक्षे, केळी, डाळिंब पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ज्वारीची पिके आडवी झाली. थंडी गायब झाल्याने गव्हावर परिणाम होईल.विरोधी पक्षासह आता सत्तेत अालेल्या शिवसेनेने दुष्काळी भागाचे दौरे केले. महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना भरघोस मदतीची मागणी केली होती. भाजप-सेना युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे २० हजार कोटींची मागणी केली होती. केंद्राच्या पथकाने धावता दौरा करून ४ हजार कोटींची मदत जाहीर केली होती.

महिनाभरापूर्वी राज्य सरकारने राज्यातील दुष्काळावर अहवाल पाठवला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणे अपेक्षित होते. पण गारपिटीचा फटका बसल्याने दुष्काळ व गारपिटीवर एकत्रित निर्णय घेणार असल्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. त्यामुळे आता ४ हजार कोटी रुपये येण्यासही विलंब लागणार आहे. मात्र नुकसानीचा आकडा आता वाढणार असल्याने आधीच घोषित जी काही सरकारी मदत आहे ती तोकडी पडणार आहे. त्यामुळे बळीराजाला पुन्हा उभारी द्यायची असेल तर सरकारला नुकसानीचा पुनश्च आढावा घेऊन वाढीव भरपाई देणेच योग्य ठरेल. अन्यथा आत्महत्या थांबण्याऐवजी त्या वाढतच जाण्याचा धोका अधिक आहे.