आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या स्वप्नातील ‘ग्रंथगाव’ (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुस्तक जसे माणसाचे आयुष्य घडवते तसे माणसाच्या कर्तृत्वामुळेही पुस्तके लिहिली जातात. या साऱ्यातून समाज घडत जातो. हे मर्म लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावी महाराष्ट्राच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या देशातील पहिल्या पुस्तक गावाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण झाले. ब्रिटनमधील वेल्स प्रांतात असलेल्या हे ऑन वे या पुस्तकांच्या ठिकाणाच्या धर्तीवर भिलारमध्ये तसाच प्रकल्प साकारण्यात आला. महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन भिलार येथे साकारलेल्या पुस्तक गाव प्रकल्पाची कल्पना चांगली आहे. अशा प्रकल्पांना सरसकट विरोध करणे ही आमची भूमिका नाही. तरीही अशा योजना राबवणे हे महाराष्ट्र शासनाचे काम नव्हे. पर्यटकांची वर्दळ असलेल्या भिलार गावामध्ये खासगी कंपन्या किंवा संस्थांच्या मदतीने पुस्तक गाव उभारले गेले असते तर ते अधिक संयुक्तिक झाले असते. महाराष्ट्र शासनाचे मुख्य काम मूलभूत सुविधा पुरवणे हे आहे. भिलारमध्ये पुस्तकांचे गाव निर्माण झाले असले तरी त्या परिसरात पर्यटन हेच मुख्य आकर्षण राहाणार आहे. जिथे पुस्तक गाव उभारले गेले त्या सातारा जिल्ह्यातील शासकीय किंवा खासगी ग्रंथालयांची स्थिती सध्या अत्यंत दयनीय आहे. केवळ एकाच जिल्ह्यापुरते नव्हे, तर संपूर्ण राज्यातील असंख्य ग्रंथालये बिकट परिस्थितीतून वाटचाल करत आहेत. मराठी संस्कृतीचा कंठशोष करणाऱ्या लोकांनीच ग्रंथालये नीट चालवण्याविषयी दाखवलेली अनास्था तसेच ग्रंथालयांच्या स्थितीकडे महाराष्ट्र, केंद्र सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच ही स्थिती ओढवली आहे. जिल्हा शासकीय ग्रंथालयात अतिशय समृद्ध असा ग्रंथसंग्रह असतो. पण या ग्रंथांची व्यवस्थित निगा राखली जात नाही. जी पुस्तके संग्रहात असतात त्यांचे नीट जतन करण्याऐवजी त्यांच्यावर धुळीची पुटे चढलेली दिसतात. एकूणच ग्रंथालयशास्त्रामध्ये ज्या नेटकेपणाला महत्त्व दिले आहे, त्याच्याशी ही शासकीय ग्रंथालये फटकून वागताना दिसतात. काही अपवाद वगळता खासगी ग्रंथालयांची स्थितीदेखील अशीच आहे. या सर्वच ग्रंथालयांना सरकारकडून मिळणारे अनुदान  एवढे तुटुपुंजे असते की त्यात संस्थेचा प्रशासकीय खर्चदेखील भागत नाही. पुस्तक व्यवहारांतून खूप मोठी पुंजी मिळते, असेही नाही. मात्र, तरीही ही ग्रंथालये व्यावसायिक दृष्टिकोन बाळगल्यास फायद्यात चालवता येऊ शकतात. त्यासाठी सर्वप्रथम ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना उत्तम पगार दिले पाहिजेत व त्यांना व्यावसायिक वृत्तीने ग्रंथपालनाचे अद्ययावत प्रशिक्षण दिले पाहिजे. ग्रंथालयाच्या कामकाजाचे संपूर्ण संगणकीकरण केले तर ती वाचकांसाठी पर्वणीच असेल. ग्रंथालये व्यावसायिक तत्त्वावर कशी चालवावीत याचा आदर्श अमेरिका, युरोपातील अनेक देशांकडून घेता येईल. 

राज्यातील ग्रंथालये सुसज्ज करण्यासाठी सरकारचेे प्रयत्न अत्यंत तुटपुंजे आहेत. याच अनास्थेमुळे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासारख्या महत्त्वाच्या संस्था आता टेकीला आल्या आहेत. केवळ सरकारलाच सारा दोष देऊनही उपयोगाचे नाही. शासकीय, खासगी ग्रंथालयांपैकी बहुतेक ग्रंथालयांच्या संचालकांना आपली संस्था व्यावसायिक तत्त्वावर चालवण्याचे भान अजून आलेले नाही. संस्थेत उत्तम पुस्तके यावीत, त्यांचे नीट जतन व्हावे, ती वाचकांपर्यंत काही आकर्षक योजनांद्वारे पोहोचवावीत यासाठी ते आपली कल्पनाशक्ती लढवताना दिसत नाहीत. ग्रंथालयांच्या उत्तम संचालनासाठी त्यांच्या संचालकांनी वाचक शुल्कात जास्त प्रमाणात वाढ केली तरी वाचक कुरकुरणार नाहीत. कारण वाचकांना उत्तम ग्रंथसेवा हवी असते. तिचीच वानवा दिसली की मग या वाचनालयांकडे ते पाठ फिरवतात. पै यांनी चालवलेली फ्रेंड्स लायब्ररी, मुंबईतील दादर सार्वजनिक वाचनालय, पुणे येथील भांडारकर इन्स्टिट्यूटचे ग्रंथालय, विलेपार्ले येथील श्री. वा. फाटक वाचनालय या अतिशय दर्जेदार पद्धतीने चालवलेल्या ग्रंथालयांच्या कारभाराने अनेक ग्रंथालयांच्या संचालकांचे डोळे उघडावेत, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात आणखी पुस्तकांची गावे उभारण्याच्या आधी राज्यातील सर्व खासगी, शासकीय ग्रंथालये, महाविद्यालयीन, विद्यापीठीय ग्रंथालये संगणकीय जाळ्याने एकमेकांशी कशी जोडली जातील याविषयीचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घ्यायला हवा. त्यातून वाचकांना हव्या असलेल्या पुस्तकांपर्यंत कमी वेळेत पोहोचता येईल. ग्रंथांच्या वाटेवर लोकांना नेताना लोकप्रिय मार्गांऐवजी मूलभूत रचनात्मक मार्ग पत्करणेच अधिक श्रेयस्कर ठरेल, याचे भान शासनाने राखले पाहिजे. ग्रंथालये समृद्ध करण्यात वाचकांचाही हातभार असावा लागतो. ती संस्कृती आपल्याकडे रुजल्यास राज्य, देशातील प्रत्येक गाव हेच पुस्तकांचे गाव होण्यास वेळ लागणार नाही.  
बातम्या आणखी आहेत...