आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सैनिकांचे नवे पर्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला जवानांसाठी कॉन्स्टेबल पदाकरिता सीआरपीएफ, सीआयएसएफमध्ये ३३ टक्के आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा बल, आयटीबीपी यामध्ये १५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हा निर्णय योग्य अाहे.
केंद्र सरकारने महिला जवानांसाठी कॉन्स्टेबल पदाकरिता सीआरपीएफ, सीआयएसएफमध्ये ३३ टक्के आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा बल, आयटीबीपी यामध्ये १५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हा निर्णय महिला सक्षमीकरण संसदीय समितीच्या सहाव्या अहवालातील शिफारसींनुसार घेण्यात आला. सध्या निमलष्करी दले व सेंट्रल आर्म पोलिस फोर्स (सीएपीएफ)मध्ये असलेल्या ९ लाख जवानांमध्ये २० हजार महिला सैनिक, अधिकारी आहेत. केंद्र सरकारच्या ताज्या निर्णयामुळे या दलांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला नक्कीच मदत मिळेल; पण देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या निर्णयाचा किती उपयोग आहे, यावरही विचार केला पाहिजे.

देशात निमलष्करी दले व सीएपीएफ कोणत्या भागात कार्यरत आहेत व तिथे काम करण्याकरिता महिला कॉन्स्टेबलना योग्य वातावरण आहे का, याचे विश्लेषण व्हायला हवे. सीआरपीएफचे सुमारे तीस टक्के जवान काश्मीरमध्ये शांतता राखण्यात गुंतलेले आहेत. काश्मीर खोऱ्यात त्यांच्यावर अनेक दहशतवादी हल्ले होत असतात. त्यामुळे या ठिकाणी महिला कॉन्स्टेबल तैनात करता येत नाहीत. याशिवाय अजून तीस ते पस्तीस टक्के सीआरपीएफ जवान हे मध्य भारताच्या छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा येथील जंगलक्षेत्रात माओवादीविरोधी मोहिमेत गुंतलेले आहेत. इथेही महिला कॉन्स्टेबलना तैनात करण्याजोगी स्थिती नाही. उरलेले सीआरपीएफ जवान हे ईशान्य भारत आणि देशाच्या इतर भागांमध्ये काम करतात.

शांतता असलेल्या राज्यांमध्ये महिला कॉन्स्टेबलना तैनात केले जाऊ शकते. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान (बीएसएफ) बांगलादेश सीमेवरती आणि जम्मूपासून गुजरातमधील रण ऑफ कच्छपर्यंत पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात आहेत. या भागामध्ये त्या- त्या राज्यांतील महिलाही आपल्या कुटुंबांबरोबर सीमावर्ती भागात राहत असतात. यामुळे या महिला नागरिकांची तपासणी करण्याकरिता महिला कॉन्स्टेबलचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो; पण बीएसएफच्या ज्या बटालियन्स काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आणि मध्य भारतामध्ये माओवादीविरोधी अभियानात सक्रिय आहेत, तिथे महिला कॉन्स्टेबलना त्यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे तैनात करता येत नाही.

सीआयएसएफ हे दल विमानतळ, मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कारखाने, नेव्हल डॉक्स यांचे रक्षण करत असते. इथे धोका कमी असल्यामुळे महिला कॉन्स्टेबल्सना तिथे तैनात केले जाते. काही सीआयएसएफ बटालियन्स या माओवादी विरुद्ध अभियानामध्ये मध्य भारतात काम करत आहेत. तिथे मात्र महिला कॉन्स्टेबल तैनात नाहीत.

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) हे दल मुख्यत्वे चीन सीमेवरती अतिउंच भागात म्हणजे १२ ते १३ हजार फुटांहून जास्त उंचीवरती तैनात असते. इथे महिला कॉन्स्टेबलना धोका हा फक्त थंड हवामानामुळे आहे. त्या या भागामध्ये काम करू शकतील की नाही, हे त्यांना तिथे तैनात केल्यानंतर कळू शकेल. मात्र, आयटीबीपी बटालियन्स माओवादीविरोधी अभियानात काम करत आहेत. तिथे महिला कॉन्स्टेबल्सचा नेमले जाऊ शकत नाही. निमलष्करी दलातील महिला कॉन्स्टेबलची प्रामुख्याने ऑफिसेस, सिग्नल यंत्रणा, रिपेअर करणाऱ्या यंत्रणा, दारूगोळा पुरविणाऱ्या यंत्रणा या सपोर्टिंग ब्रँचेसपुरतीच नियुक्ती करण्यात येते. बीएसएफमध्ये पुरुषांना आठ तास काम करावे लागते. मात्र, महिलांची ड्यूटी सहा तासांची असते. ती पण फक्त दिवसाच्या वेळेला. कारण रात्रीच्या वेळेला त्यांना सीमेवर पहारा करण्यासाठी तैनात ठेवणे तितकेसे सुरक्षित नाही.

शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने पाहिले तर सामान्य पुरुष हा महिलेपेक्षा ४० टक्के जास्त ताकदवान असतो. एक महिला रिक्रुटची उंची पुरुष रिक्रुटपेक्षा ५ इंचांनी कमी असते. महिलांचे वजन पुरुषांपेक्षा ३० पौंड कमी असते आणि सर्वात महत्त्वाचे - महिलांच्या शरीरामध्ये असलेले स्नायू हे पुरुषांच्या शरीरातील स्नायूंपेक्षा सहा टक्के कमी असतात. यामुळे पुरुष सैनिक महिला जवानापेक्षा जास्त ताकदवान असतो. त्याला जास्त स्टॅमिना असतो आणि तो जास्त चपळपण असतो. हे सर्व गुण लढाईमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. सैन्यामध्ये झालेल्या एका अभ्यासाप्रमाणे महिलांची हाडे फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा पाच पटींनी जास्त आहे. यामुळे महिलांना आरोग्यदृष्ट्या अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागते. अर्थात, हे सगळे आकडे हे सामान्य पुरुष आणि सामान्य महिलांकरिता आहेत. सानिया मिर्झा, सायना नेहवाल आणि कविता राऊत यासारख्या उत्तम स्टॅमिना असलेल्या महिला खेळाडू मात्र याला अपवाद आहेत. ही सगळी कारणे पाहता थेट रणांगणावर लढण्याकरिता महिलांची नियुक्ती भारतात आजवर झालेली नव्हती. याशिवाय सैन्याचे काम असते ते शत्रूला मारणे किंवा त्याला जखमी करणे. अशा कामांकरिता महिला जवानांचा वापर करणे हे सोपे नसते. प्रत्यक्ष लढाई होते त्या वेळेला महिला व पुरुष असा वेगवेगळा विभाग करता येत नाही.

याशिवाय ज्या ठिकाणी महिला जवानांना तैनात केले जाते तिथे त्यांच्याकरिता वेगवेगळ्या राहाण्याच्या बॅरॅक्स, वेगळी बाथरूम्स, टॉयलेट्स, त्यांची लहान मुले असतील तर त्यांच्याकरिता पाळणाघर अशा सुविधा तयार कराव्या लागतील. अशा सुविधा सध्या सीमेवरती किंवा नक्षलवादी भागात अजिबात नाहीत. म्हणूनच महिलांना लढणाऱ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामील करणे हे सध्यातरी शक्य नाही. अमेरिकेमध्ये सैन्यामध्ये २० टक्केहून जास्त महिला आहेत, पण त्या थेट लढाईमध्ये जात नाहीत. युरोपीय देश व इस्रायलमध्ये हीच स्थिती आहे.

भारतीय सेनादलांत महिलांचा प्रवेश प्रथम झाला तो वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून सेनादलांत १९६८ मध्ये दाखल झालेल्या पुनीत अरोरा या लेफ्टनंट जनरल या मानाच्या पदापर्यंत पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. भारतीय वायुदलातही महिला वैमानिक दाखल झाल्या खऱ्या, पण महिलांचा समावेश हा अधिकारी पदापर्यंतच अधिकांश राहिला. थेट रणांगणावर महिलांची नियुक्ती भारतात आजवर झाली नव्हती, मात्र १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान गुंजन सक्सेना या फ्लाइंग महिला ऑफिसरच्या चिता हेलिकॉप्टरने शत्रूच्या हद्दीत प्रवेश करून आपल्या जखमी जवानांना परत आणण्याचे धैर्य दाखविले होते. लष्करातील महिला जवानांना मोठ्या संख्येने थेट रणांगणावर लढण्यासाठी पाठविणे हे भारतासाठीही अजूनतरी स्वप्नच आहे.
hemantmahajan12153@yahoo.co.in