आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदललेल्या जिल्हा परिषद शाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अभियानाने महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात बजावलेली कामगिरी मोलाची आहे. एप्रिल २०१६ पर्यंत राज्यातील १३,९९६ शाळा १०० टक्के प्रगत म्हणून घोषित झाल्या आहेत. या अभियानामुळे नवीन शैक्षणिक स्थित्यंतर घडवण्यास महाराष्ट्र सज्ज झाला आहे.
जून महिना उजाडला म्हणजे पक्ष्यांच्या किलबिलाटाप्रमाणे शाळाशाळांत मुलांचा किलबिलाट सुरू होतो. मागील एका वर्षात खऱ्या अर्थाने तांडे, वाडी, पाडे, वस्त्या तसेच गावोगावीच्या जिल्हा परिषद शाळांत शिक्षणाचे वारे अधिक जोमाने वाहू लागले आहे आणि हा बदल २२ जून २०१५रोजी आलेल्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ (पीएसएम) या अभियानामुळे. यात शाळांनी पूर्वापार चालत आलेली जळमट झटकून रचनावाद, डिजिटलवाद, कृतियुक्त अध्यापन पद्धती, मोबाइल डिजिटल शाळा यासह अजून नवीन शैक्षणिक संकल्पनांचा समावेश करून प्रत्येक मूल शिकलेच पाहिजे हा हेतू ठेवून काम केले आणि बघता बघता एका वर्षात महाराष्ट्र शिक्षणात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. राज्यात शिक्षण खाते अस्तित्वात आल्यापासून गुणवत्तेसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सोबतच विविध उपक्रमांद्वारे मुले शिकू लागली; पण एखादा उपक्रम मुलांना व शिक्षकांना समजायला लागला की लगेचच दुसरे एखादे नवीन अभियान यायचे. यामुळे सतत गोंधळलेल्या मानसिकतेतून हे दोन्ही घटक जात होते; पण गेल्या वर्षी २२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या प्रयत्नांतून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा २२ पानी शासननिर्णय आला आणि यात प्रथमच प्रत्येक मूल शिकले पाहिजे हा विचार केलेला होता म्हणून हे अभियान खऱ्या अर्थाने “शाळा, समाज, शिक्षक, विद्यार्थी यांना जोडणारा `शैक्षणिक सेतू’ ठरले आहे.

मागील वर्षी ज्या वेळी या अभियानाची सुरुवात झाली त्या वेळी बऱ्याच अधिकारी, शिक्षकांना वाटले होते की आजपावेतो शिक्षण खात्यात जी जी अभियाने, उपक्रम आलेत आपण त्यांची जशी ‘वाट’ लावली तशीच याचीही लावू. पण या अभियानाचे तसे नाही झाले. सुरुवातीलाच जूनमध्ये शिक्षण सचिव नंदकुमार यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणावर जाऊन हे अभियान काय आहे, हे शिक्षकांना समजावून सांगितले व प्रसंगी अधिकारी मंडळींना दरडावलेही. नंदकुमार हे पहिले शिक्षण सचिव असतील ज्यांनी जिल्हावार शिक्षकांना संबोधित तर केलेच; पण रस्त्यात जी शाळा लागेल तिथे जाऊन मुलांशी संवाद साधला व या अभियानाला बळकटी देण्याचे मोलाचे काम केले.
मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य असे की कुणालाही मला किती व काय येतं सांगावंसं वाटतं; पण एकांगी शिक्षण पद्धतीत केवळ पुस्तक एके पुस्तक असं होतं. त्यामुळे कितीतरी मुलं या प्रवाहापासून दुरावली.

मात्र, मागील एका वर्षापासून विविधांगी शैक्षणिक वादातून मुले स्वतःला काय येत आहे, हे सांगू लागली व शाळेत रमू लागली. आज चांद्यापासून बांद्यापर्यंत गावागावांत फेरफटका मारला असता शाळेत प्रत्येक मुलं शिकू शकतात ही सकारात्मक भावना पीएसएम अभियानामुळेच वाढीस लागली. या जून महिन्यापासून सदर अभियानाची सुरुवात झाली आणि यात मुलांना रचनावादी वर्ग पद्धतीने शिकवावे, असे सांगितले होते; मात्र शिक्षकांना ही संकल्पना सुरुवातीला समजली नाही.
२०१० मध्ये शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली. यानुसारच मुलांना रचनावादी पद्धतीने शिकवावे, असे नमूद केलेले असतानाही यंत्रणेने व शिक्षकांनीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही.

अशा वेळी रचनावादी पद्धती कशी आहे हे शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता यावे यासाठी सातारा जिल्ह्यातील ‘कुमठे बीट’ बघावयास राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक यायला लागले. मागील तीन वर्षांपासून कुमठे येथे ज्ञानरचनावादी रीतीने मुलं स्वतः कशी शिकतात व शिक्षक केवळ सुलभकाची भूमिका बजावतो, हे अन्य शिक्षकांनी पाहिले. दगड, चिचोंके, काड्या यासह अनेक परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून व रचनावादी आरेखने यातून येथील मुले १०० टक्के प्रगत झाली, हे स्वनाभुव घेऊन शिक्षक आपापल्या शाळेत गेले व तिथे जाऊन शिक्षकांनी वर्गातील बाकडे बाहेर काढून मुलांसाठी हाताने रचनावादी आरेखने आखली व मुले शिकायला सुरुवात झाली.

आजपावेतो कुमठे बीट, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी, नाशिक जिल्हातील निफाड, हवेली, लातूर, मिरज व कृतियुक्त अध्यापन पद्धतीने कसे शिकवावे हे सांगणारी केंजळ या प्रेरणादायी शाळांना एकूण सात लाख शिक्षकांपैकी दोन लाख शिक्षकांनी भेट दिली व त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली.

याचा फायदा गावोगावी झाला. लोकसहभाग व शिक्षक सहभागातून ८९.३ कोटींचा निधी उभा राहिला व यातूनच मुले शिकायला लागली. रचनावादी आरेखनातून मुले गणितातील मूलभूत संबोध स्वतःजवळील साहित्यातून शिकू लागली. भाषेबाबत बोलावयाचे झाल्यास पहिलीपासूनची मुलं व्यक्त होताना दिसत आहेत. यात केवळ मुलांना नुसतेच शिकवावे हे अभिप्रेत नव्हते, तर त्यांचा सर्वांगीण विकास करणे अभिप्रेत होते व झालेही तसेच. आज खेडेगावातील मुले तीन शब्दांवरून आठशे शब्दांत गोष्ट तयार करायला लागले आहेत. या अभियानात शाळा अधिकाधिक डिजिटल करण्याकडे भर दिला. आकडेवारीच्या बाहेर जाऊन या अभियानाचा सारांश काढावयाचा झाल्यास गावोगावी शिक्षणानुकूल वातावरण तयार होत आहे व यातूनच नवीन शैक्षणिक स्थित्यंतर घडविण्यास महाराष्ट्र सज्ज झाला आहे.
santoshmusle1515@gmail.com
बातम्या आणखी आहेत...