आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय क्रिकेट; अत्युच्च दर्जा कुठे ?, हाराकिरी सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात जिथे-जिथे मॅचेस होतात तिथे-तिथे भारतीय कंपन्या त्यांच्या मोटारसायकलपासून पानमसालापर्यंत सर्व उत्पादनांच्या जाहिराती करतात. इतकी आर्थिक उलाढाल आपण ज्या खेळात करतो, त्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ आपल्या कौशल्यपूर्ण कामगिरीच्या बळावर वर्चस्व का गाजवू शकत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

भारत क्रिकेटमध्ये वर्चस्व का गाजवू शकत नाही? हे मला नेहमीच रहस्य वाटत आले आहे. म्हणजे अधूनमधून हे वर्चस्व दिसण्याबद्दल मी बोलत नाही ते तर आपला संघ करतच असतो; पण ज्याप्रकारे एके काळी वेस्ट इंडीजने किंवा ऑस्ट्रेलियाने क्रिकेटवर वर्चस्व गाजवले त्याप्रमाणे आपण का गाजवू शकत नाही हा मुख्य मुद्दा आहे. भारताचे क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे साधनसंपत्तीचा आपल्याला कधीच प्रश्न येत नाही. बरे, या खेळाची जी जी आर्थिक अंगे आहेत ती सर्व आपल्याकडे आहेत. त्यामुळे भारतातील इतर बोर्ड या क्रिकेट बोर्डाच्या मानाने नेहमीच दुय्यम स्थानावर असतात. आयपीएलबाबत म्हणता येईल की, इंडियन क्रिकेट लीग हे निश्चितपणे सर्वात फायदेशीर लीग आहे. क्रिकेटमध्ये भारताचा प्रभाव केवळ त्याच्या सीमेपुरता नाही. जगभरात जिथे-जिथे मॅचेस होतात तिथे-तिथे भारतीय कंपन्या त्यांच्या मोटारसायकलपासून पानमसालापर्यंत सर्व उत्पादनांच्या जाहिराती करतात.
इतकी आर्थिक उलाढाल आपण ज्या खेळात करतो त्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ आपल्या कौशल्यपूर्ण कामगिरीच्या बळावर वर्चस्व का गाजवू शकत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जेवढे कसोटी सामने जिंकलो आहोत त्यापेक्षा अधिक हरलोही आहोत. अर्थात, याचे फार कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. याचं कारण आपण फक्त घरच्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी करतो. जिथे खेळपट्ट्या मंदगती असतात, त्यामुळे दुसऱ्या टीमला दोनदा बाद करणे कठीण जाते.

दुसऱ्या बाजूने हेही म्हणता येईल की, जेव्हा खेळपट्टी वेगवान असते तेव्हा आपण पटापट आऊट होतो. त्यामुळे जिंकण्यापेक्षा हरणे आपल्याला अधिक सोपे जाते. पण तरीही प्रश्न उरतोच की, जगातील क्रिकेट खेळणाऱ्या महत्त्वाच्या देशांसमोर आपण सतत हरत का असतो? ऑस्ट्रेलियाचेच उदाहरण घ्या. आपण त्यांच्याविरोधात ४० कसोटी सामने हरलो आहोत आणि २४ सामने जिंकलो आहोत. इंग्लंडच्या विरोधात आपण ४३ सामने हरलो आहोत आणि फक्त २१ जिंकलो आहोत. वेस्ट इंडीजच्या विरोधात आपण ३० कसोटी सामने हरलो आहोत आणि १६ सामने जिंकलो आहोत. अगदी पाकिस्तानसोबतही आपण १२ कसोटी सामने हरलो आहोत आणि ९ सामने जिंकलो आहोत. (नशीब चांगलं समजा की, आता आपण पाकिस्तानसोबत खेळत नाही आहोत. कारण सध्याच्या वातावरणात त्यांच्यासोबत हरणं म्हणजे जखमेवरची खपली काढण्यासारखं ठरलं असतं.) दक्षिण आफ्रिकेसारखा देश केवळ काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला. त्याच्याही विरोधात आपण १३ कसोटी सामने हरलो आहोत आणि फक्त ७ सामन्यांत जिंकलो आहोत.

ज्या दोन टीमच्या विरोधात आपण जास्त वेळा सामने जिंकलो आहोत, त्या म्हणजे श्रीलंका आणि न्यूझीलंड. श्रीलंकेविरोधात भारत ७ कसोटी सामने हरला आहे आणि १६ सामने जिंकला आहे. न्यूझीलंडसोबत आपण १० वेळा हरलो आहोत आणि १८ वेळा जिंकलो आहोत. एकदिवसीय सामन्यांमध्येही काही वेगळी स्थिती नाही. त्याची आकडेवारी सांगून मी तुम्हाला निराश करणार नाही; पण जेव्हा आपण या आकड्यांकडे पाहतो तेव्हा ते आपल्याला अधिक काहीतरी सांगतात. म्हणजे भारतीय माणसे ज्या राष्ट्रीय भावनेने आणि पॅशनने क्रिकेट या खेळाकडे पाहतात ती काही आपल्या संघाच्या कामगिरीत उतरत नाहीत. बॉलीवूडच्या भाषेत सांगायचं तर आपण क्रिकेटमधील शाहिद कपूर आहोत; पण आपल्याला वाटतं की आपण शाहरुख खान आहोत.

मग एक प्रश्न उरतो, भारतीयांचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. या क्रिकेटमध्येही आपण पहिल्या क्रमांकावर का नाही? आपली लोकसंख्या १ अब्ज २० कोटी इतकी आहे. त्यातील अनेकांना हाच खेळ पाहायला आवडतो व दुसरा कुठलाही मैदानी खेळ पाहायला आवडत नाही. ऑस्ट्रेलियाचे असे नाही. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या अडीच कोटी इतकीच आहे. त्यातही क्रिकेट हा काही त्यांचा एकमेव आवडता खेळ नाही. साऱ्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांची लोकसंख्या एकत्रित केली तर ती भारताच्या अर्ध्यानेदेखील भरणार नाही. म्हणजेच हा काही केवळ कौशल्य असण्याचा मुद्दा नाही. आयपीएलसारख्या स्पर्धेतही मोठा प्रश्न असतो तो स्थानिक कुशल खेळाडू मिळवण्याचा. ते मिळत नाहीत म्हणून तर जे काही त्यातल्या त्यात चांगले खेळाडू आहेत त्यांना प्रचंड पैसा मिळतो. कारण मागणी जास्त आणि पुरवठा कमी. ही आकडेवारी पाहिली तर एकंदरीत भारताकडे ऑस्ट्रेलियाच्या दर्जाचे ६० तरी संघ हवेत; पण आपल्याकडे त्या दर्जाचा एकही संघ सद्य:स्थितीत नाही आणि गतकाळातही नव्हता. असे का?

हा काही मंद आणि वेगवान खेळपट्ट्यांमुळे उद््भवलेला प्रश्न नाही. कारण तसा तो मानला तर एक प्रश्न उरतोच. वेगवान खेळपट्टीवर खेळण्याचे प्रशिक्षण आपण का देत नाही? कितीही कुशल दर्जाचा प्रशिक्षक आणून आपण चांगले प्रशिक्षण देऊ शकतो इतका पैसा आपल्याकडे आहेच, मग तरीही आपला संघ उत्तम प्रशिक्षित का होत नाही? कदाचित प्रशिक्षणाचा अभाव, सोई, साधने यापलीकडे असे काही आहे ज्यात या मूळ समस्येचे उत्तर दडलेले आहे. अनेकांना वाटतच असेल की याचे उत्तर कदाचित आपल्या महत्त्वाकांक्षा आणि अत्युच्च कामगिरी याबद्दलच्या कल्पनेतच दडलेलं असावं. आपण कुठल्याच बाबतीत जागतिक नेतृत्व दिलेलं नाही. त्यामुळेच क्रिकेटमध्येही आपण जागतिक नेतृत्व करत नाही याबद्दल आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही.

एकंदरीतच अत्युच्च दर्जातील आपली गुंतवणूक फारच कमी आहे. भारतीय खेळाडू खेळताना त्यांच्याकडे पाहा आणि ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीजच्या खेळाडूंसोबत त्यांची तुलना करा. मग तुमच्या हे लक्षात येईल. अगदी दक्षिण आफ्रिकेशी तुलना केलीत तरी कळेल की आपल्या खेळाडूंच्या कामगिरीत काहीतरी गडबड आहे, काहीतरी मोठा फरक पडतो आहे. एक बाजूचे खेळाडू एखाद्या व्यायामपटू किंवा खेळाडू अॅथलिटसारखे दिसतात, तर भारतीय खेळाडू म्हणजे अगदीच पोट सुटलेले आणि अनफिट वाटतात. असे असूनही हे खेळाडू राष्ट्रीय संघात असू शकतात, हे आश्चर्यच नाही का? मी या लेखाची सुरुवात अशी केली की भारतीय संघ का वर्चस्व गाजवू शकत नाही हे एक रहस्य आहे; पण खरं तर ते रहस्य नाहीच. कोट्यवधी भारतीय क्रिकेट आवडीने पाहतात आणि या खेळाला शतकोटी रुपये देतात; पण हे करताना आपण साधा विचारही करत नाही की क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी इतकी वाईट का आहे?
बातम्या आणखी आहेत...