आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद निर्मितीचा वसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या खूपच वाढलेली दिसते. शेतकरी, विद्यार्थी, पीडित महिला, दुखण्याने गांजलेले लोक हा मार्ग स्वीकारताना दिसतात. काही आत्महत्यांची चर्चा वृत्तपत्रांतून आणि दूरचित्र वाहिन्यांवरून होताना वाचायला आणि पाहायला मिळते. आत्महत्या करणारी व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली असली आणि विशेष म्हणजे नटनट्यांसारखी ग्लॅमर मिळवलेली असली तर ती घटना सर्वांचेच लक्ष जास्त वेधून घेते. एक एप्रिलला प्रत्युषा बॅनर्जी या छोट्या पडद्यावर गाजलेल्या नटीने आत्महत्या केली ते प्रकरण सध्या चर्चिले जात आहे. कारण सर्वसामान्य माणसाला प्रथितयश व्यक्तींचे आयुष्य कसे असेल ते जाणून घेण्याची ओढ असते. यश, कीर्ती आणि पैसा भरपूर प्रमाणात कमावलेल्या या लोकांचे जीवन म्हणजे स्वर्गलोकात असल्यासारखेच असावे असा गैरसमजही बऱ्याच जणांचा असतो. पण या सर्वच गोष्टी अक्षय सुख देणाऱ्या नसतात. उलट त्या मोह निर्माण करतात. मग इतर सर्वांकडे दुर्लक्ष व्हायला लागते. आपलाच सतत गौरव होत राहायला हवा. इतर कुणी आपल्या पुढे जात आहे असे वाटले की त्यांचा मत्सर आणि द्वेष वाटायला लागतो. आपली आत्मप्रतिमा जपण्याऐवजी अहंकार जोपासला जातो. गौरव आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, गुणांचा होत होता हे विसरायला होतं.
आपल्या मोठेपणाच्या स्वप्नसृष्टीत लहान मुलं जगत असतात. त्यांचे पालकही त्यांच्या अशा आत्मप्रतिमेला खतपाणी घालून जोपासत असतात. जरा कुठे यश मिळालं की सर्व मंडळी हुरळून जातात. जे क्षेत्र आपण निवडतो, त्यात सहभागी होणारे इतर असंख्य असतात. तेही गुणवान असतात, मेहनत करीत असतात आणि त्यांच्या संख्येमध्ये सतत भर पडत असते. आपला दर्जा आपण टिकवला, वाढवला नाही तर ते आपल्या पुढे जाणार आहेत, हे ध्यानातच घेतले जात नाही. ज्यांना जास्त प्रमाणात यश मिळालेलं असतं त्यांच्याभोवती त्यांचे चाहते गोळा होतात. त्यांच्यामध्ये सर्व प्रकारची माणसं असतात. आपलं श्रेष्ठत्व डळमळीत व्हायला लागलं की चमचेगिरी करणाऱ्यांचं फावतं. कल्पनेत आणि स्वप्नात जगणाऱ्या माणसांना फसवणं फारच सोपं असतं कारण ते चमचेगिरीला सहज बळी पडतात. आपली तारीफ होत राहावी, आपली लोकप्रियता वाढती असावी, आपला बहुमान सतत होत राहावा हे वाटणं अतिशय नैसर्गिक आहे. पण त्यासाठी आपली कामगिरी उत्तम होत राहायला हवी.
आपली शारीरिक शक्ती जर आपण काळजी घेऊन टिकवली नाही तर तिचा दर्जा जसा घसरत जातो तसंच आंतरिक शक्तीचंही असतं. ती तर इतक्या झपाट्याने ओसरते की आपल्याला ते कळतसुद्धा नाही. ज्यांच्यावर आपली छाप पडावी असं आपल्याला वाटत असतं अशा व्यक्तींच्या संपर्कात असताना आपली आकर्षणशक्ती मोठ्या प्रमाणावर खर्च होत असते. यशस्वी लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या तर प्रचंड असते. त्यामुळे त्यांच्या आकर्षणशक्तीच्या खचण्याचं प्रमाण आणि गती ही दोन्ही जास्त असतात. ही शक्ती फक्त तपानेच वाढत असते. यश मिळवणाऱ्या व्यक्तींनी ही काळजी सतत घ्यायची असते. कारण त्यांच्यावर तर फार मोठी जबाबदारी असते. माता, पिता, गुरू यांच्यावरही अशीच जबाबदारी असते, पुढल्या पिढीवर संस्कार करण्याची! ज्ञान, कला आणि कौशल्य अवगत असलेली माणसे ही पुढल्या पिढ्यांचे आदर्श बनत असतात. त्यांना आपली सहनशक्ती वाढवावीच लागते. बालकांचे संगोपन करतानासुद्धा त्यांना संयमाची शिस्त पालकांनी आणि गुरूंनी स्वतःच्या वागण्याने आणि प्रसंगी कठोर होऊन लावायची असते. हे वेळीच केले गेले नाही तर पुढे आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा आणि संकटांचा सामना त्यांना करता येणे शक्य होत नाही. शारीरिक शक्तीबरोबरच मानसिक शक्तीची जोपासना कशी करायची हेही त्यांना शिकवले गेले पाहिजे. त्याच्याऐवजी समृद्धी आणि कीर्ती यांचीच ओढ लागली तर मूळच्या सुखाच्या ओढीमध्ये आणखी भर पडते आणि दुःखे सहन करण्याची शक्तीच नाहीशी होते. याचे पर्यवसान आत्महत्या करण्यात होऊ शकते हे सर्वांनीच ध्यानात घ्यायला हवे. वसा आनंदाचा घ्यायचा असतो. फक्त आपल्याच नव्हे तर इतरांच्याही आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा.
लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत नवा उच्चांक करून सुवर्णपदक मिळवण्याच्या ईर्षेने स्पर्धेत उतरलेल्या एका खेळाडूचा हा किस्सा आहे. शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात त्याला मागे टाकण्याचा प्रयत्न करणारा स्पर्धक चक्कर येऊन खाली कोसळला. हा अपघात ध्यानात आल्याबरोबर त्याने धावणे थांबवून त्या स्पर्धकाला वैद्यकीय मदत मिळण्याची व्यवस्था केली. यात जो वेळ गेला त्यामुळे त्याचे स्वतःचे पदकही हुकले. परत या गोष्टीची त्याने कुणाजवळ वाच्यतासुद्धा केली नाही. इतरांकडून आम्हाला ही माहिती मिळाली. त्याचे कौतुक केले तेव्हा तो म्हणाला, "आमच्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल अढी होती. ती दूर होऊन आम्ही चांगले मित्र झालो. हे काय कमी आहे? पदक काय, परत कधी तरी मिळवता येईल.'
कल्पना करा, समाजाने संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकलेली चार बालके "आनंदे भरीन तिन्ही लोक’ असा वसा घेतात आणि आनंदाचा एवढा मोठा ठेवा निर्माण करून ठेवतात की आजसुद्धा तो लुटला जात असतो. तरीही तो संपतच नाही. जे का रंजले गांजले आढळतील त्यांना मनापासून आपले म्हणणारे तुकाराम महाराज खरेच आकाशाएवढे होतात. माणसाच्या मोठेपणाला शरीराची मर्यादा नसतेच. तो त्याच्या मनाएवढा मोठा होऊ शकतो. आणि मनामध्ये तर आकाशाला गवसणी घालण्याची शक्ती असते. सुखाच्या मागे लागून आपणच त्याला शरीरापुरते मर्यादित करून टाकतो. संयम आणि निग्रह हे स्वभावात रुजले तर हवे असलेले सगळे आधार आतूनच येतात. कष्ट करीत राहूनच जीवनाचा बगिचा फुलवावा लागतो. हे करताना दुःखाचे काटे बोचतच राहतात. आता स्वतःच्या पायातले काटे काढता नाही येत आपल्याला. दुसऱ्याच्या पायातले काढता येतात. स्वतःचेच दुःख कुरवाळत बसले तर इतरांच्या डोळ्यातले अश्रू दिसतच नाहीत. मग ते पुसण्याचे विचार कसे सुचणार? इतरांच्या पायातले काटे काढणे आणि त्यांचे अश्रू पुसणे यातला आनंद जो अनुभवील त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येणारच नाहीत. त्याच्याच नव्हे तर त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांच्याही!
भीष्मराज बाम
मानसशास्त्रज्ञ आणि योग अभ्यासक
bpbam.nasik@gmail.com