आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अच्छे दिन आने वाले हैं....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील निवडणुकीच्या वार्तांकनासाठी देवर्षी नारद स्वत: पृथ्वीतलावर अवतरले. सुरुवात कुठून करावी असा विचार करत करत देवर्षी वाराणसीत येऊन पोहोचतात. भोलेचे दर्शन घेऊनच वार्तांकनास सुरुवात करावी असा विचार करून देवर्षी भोलेचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर येतात. तेथे मंदिराबाहेर एक अतिशय किरकोळ प्रकृतीची, म्हणजे अगदी आम आदमी टाइप दिसणारी व्यक्ती देवळाच्या भिंतीला टेकून रडत आहे. देवर्षी व्याकुळ होतात. अरेरे! काय ही अवस्था मानवाची, छ्या! काय कामाचे हे लोकप्रतिनिधी, एक अतिशय सामान्य माणूस रडत बसला आहे, कुणाचे लक्ष नाही असे स्वत:शी पुटपुटत जवळ जाऊन त्याच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवतात .
' काय झाले वत्सा? कोण तू? असा उदास का? अरे निवडणुकांचा हंगाम आहे, सर्वसामान्यांची चंगळ सुरू आहे अन् तू ऐसा का विपन्नावस्थेत?
‘कोण मी? तुम्ही पण ओळखले नाहीत ना? देवर्षी...’
‘नाही! पण फारच अहंकारी दिसतो आहेस तू. म्हणे ओळखले नाही का/ तू स्वत: ला काय पीएमपदाचा उमेदवार समजतोस की काय?’
‘होय देवर्षी, मी पीएमपदाचा उमेदवारच आहे’
‘काय?’
‘होय, मी अरविंद, अरविंद केजरीवाल.’
‘माय गॉड !’
‘कसले माय गॉड देवर्षी, वाट लागली माझी.’
‘ते तर होणारच होते ना? सॉरी, आय मीन कशी वाट लागली सांग बरं?’
‘अहो देवर्षी, मी पीएमपदाचा उमेदवार असूनदेखील मीडियावाले वाळीत टाकल्याप्रमाणे वागत आहेत. एक बाइट दाखवत नाहीत माझा दिवसभरात. बघा ना. तुम्ही पण मला ओळखले नाही.’
खरंच रे बाळा. मी तुला ओळखलेच नाही बघ. अशात तू टीव्हीवर दिसतच नाहीस. पण तू रडत का होतास?’
‘त्याचमुळे देवर्षी.’ ‘म्हणजे?’
‘म्हणजे असे, एवढी महत्त्वाची ही निवडणूक, पण मला फुटेज मिळत नाही नारदा. सतत जेव्हा बघावे तेव्हा मोदीजी, राहुलजी, प्रियंकाजी, सोनियाजी. काय हे? कसला हा पक्षपातीपणा, सगळे मीडियावाले विकले गेले आहेत अदानी, अंबानींना.’
‘हेच चुकते आहे तुझे. सगळ्यांवर आरोप करतोस.. अरे पृथ्वीतलावर सर्वांनाच शत्रू बनवून ठेवशील तर आपले कसे होईल रे अरविंद? चक्क मीडियालाही विकलेला म्हणालास, म्हणून तर बहिष्कार टाकला आहे तुझ्यावर मीडियाने. अरे मी पण मीडियावाला आहे.’
‘खरेच तर आहे, देवर्षी, तुम्हीसुद्धा अंबानी, अदानी वगैरेंकडून’
‘खामोश ! अरे काय माणूस आहेस की काय? अरे, पायाशी लोळणारे स्वर्गसुख सोडून मी इथे पृथ्वीतलावर आलो अन् मी या अंबानी, अदानींच्या चार दमड्यांना विकला जाणार होय? खरेच नतद्रष्ट आहेस रे तू, केवढे कौतुक होते तुझे सर्वांना, बरोबरच केले मीडियाने तुला वाळीत टाकून.’
‘देवर्षी, तुम्ही पण?’
‘हो! काही अंत आहे की नाही तुझ्या आरोपांना?’
‘क्षमा करा! मला एक चान्स द्या देवर्षी.’
‘अरे वत्सा! दिल्लीश्वरांनी तुला चान्स दिला होता ना, तू तुझ्या करंटेपणामुळे घालवलास. तुला माहीत आहे, तुझी अवस्था राजकुमारी सिंड्रेलासारखी झाली आहे. ऐश्वर्य भोगण्याच्या नादात ती अट विसरली आणि एका रात्री पार्टीमध्ये एक्स्पोज झाली.’
‘देवर्षी, पण मी तर स्वत: वेळ पाळली. लोकपालला विरोध झाला म्हणूनच ना मी सिंहासन सोडले, राज्य सोडले, कशाचाही मोह केला नाही देवर्षी.’
‘मग आता का रडत बसलास?’
‘पुन्हा सिंड्रेला व्हायचेय, आय मीन सत्ता हवी आहे, मला पीएम व्हायचे आहे.’
‘कशासाठी? पुन्हा जनतेला वा-यावर सोडण्यासाठी?’
‘आपणही विरोधकांसारखेच आरोप करताहात.’
‘मग आरोप करायचा ठेका तुझ्याकडेच आहे असे वाटते का तुला? आता वेळ निघून गेली आहे. तू दुर्लक्षित झाला आहेस. तुला मीडियाने घडवले आणि तुझा खेळ मीडियानेच संपवला. आता युद्ध आहे ते दोघांमध्ये. मोदीजी आणि राहुलजी यांमध्ये. एकदा तू पाठ दाखवलीस, आता तुला पाठ दाखवली आहे. हिशेब चुकता झाला आहे. अरविंदा, तू करंटेपणाने घालवलेस सारे. सिंड्रेलासारखेच तुला पण ‘बारा’ कधी वाजले हे कळले नाही रे.’
‘क्षमा देवर्षी, पण यावर उपाय सांगा ना.’
‘उपाय? थोडे थांब, अशी टिपे गाळू नकोस, चांगले दिवस येणार आहेत. धीर धर. हम मोदीजी को लाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं’ गाता गाता नारदमुनी चिपळ्यांचा ठेका धरतात आणि धुंद होऊन पंच लाइन पुन:पुन्हा आळवतात.
अरविंद संतापतो. ‘काय हे देवर्षी, आपणसुद्धा नारायण नारायण म्हणायचे सोडून, मोदीजी को लाने वाले हैं म्हणताहात. छे, आपणही विकला गेलात. अदानी, अंबानी ...’ असे म्हणतच अरविंद रागारागाने पाय आपटत जातो. त्याची ही अवस्था पाहून देवर्षी मंद स्मित करून नारायण नारायण म्हणत अंतर्धान पावतात.