आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलौककि पर्वाची सांगता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगाचार्य अय्यंगार यांचे निधन हा एका वैश्वकि युगाचा अंत आहे, असेच मी म्हणेन. योगाचार्य हे एक पर्व होते. योग संज्ञेमध्ये युज् असा धातू आहे, त्याचा अर्थ जोडले जाणे, कनेक्ट असणे. "योगश्चित्तवृत्तिनिरोध:' असे पतंजली मुनींच्या योगशास्त्रातील पहिले वचन आहे. हे वचन योगाचार्यांनी आपल्या आयुष्यात सार्थ बनवले. ते कायम योगाशी जोडलेले राहिले आणि त्यांनी जगभरातले साधक योगाशी जोडून घेतले. एका शांत, समृद्ध आणि अर्थपूर्ण जगण्याचे मर्म शोधण्याचा मार्ग सर्वांना दाखवला.

आयुष्याच्या अखेरीस जगभरात विख्यात झालेले योगाचार्य सुरुवातीला मात्र प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करतच वाढले. कर्नाटक राज्यातल्या एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या योगाचार्यांचे बालपण विविध आजारांनी ग्रासलेले होते. ही अवस्था त्यांच्या वयाच्या १४-१५ व्या वर्षापर्यंत कायम होती. सतत कुठल्या ना कुठल्या तरी अस्वास्थ्याने त्यांना घेरलेले असायचे. त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्या मेहुण्यांनी त्यांना म्हैसूरला एका अधिकारी व्यक्तीकडे योगप्रशिक्षणासाठी नेले आणि हाच अय्यंगार यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरला.
योगाशी तोंडओळख होताच, त्यामध्ये असणारे सामर्थ्य किशोरवयीन अय्यंगारांच्या लक्षात आले. शिवाय योगाच्या मार्गाने स्वत:मध्ये घडून आलेले सकारात्मक बदल त्यांना जाणवत होतेच. त्यांच्या कुशाग्र बुद्धीने योगप्रशिक्षणाची सर्व अंगे, सैद्धांतकि मांडणी आणि त्याचे प्रयोगरूप आणि अंतिमत: तत्त्वरूप आत्मसात करून घेतले. त्याचे महत्त्व जाणून असल्याने योगाचार्यांनी लगेचच जे जे आपणासि ठावे, ते अन्यांसि सांगावे, या संतवचनानुसार योगाचे महत्त्व, सामर्थ्य जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र, परंपराप्रिय तत्कालीन जनमानसाने सुरुवातीला गुरुजींना दाद दिली नाही. त्यांच्या वाट्याला प्रारंभी उपेक्षाच आली. खुद्द पुण्यानेही गुरुजींची योगप्रणाली सुरुवातीला नाकारली होती; पण हळूहळू गुरुजींनी योगाचे महत्त्व प्रात्यक्षिकद्वारे पटवून देण्यास सुरुवात करताच हा विरोध, उपेक्षा मावळत गेली आणि काही वर्षांनी उपेक्षेचे धनी बनलेले गुरुजी पुण्यभूषण सन्मानाचे मानकरी ठरले. पुण्यामध्ये डॉ. गोखले यांनी गुरुजींच्या प्रयोगांचे महत्त्व जाणले आणि त्यांच्या योग प्रात्यक्षिकांचे प्रयोग केले. मग सेवाभावी संस्था, गणेशोत्सव या निमित्तानेही गुरुजींचे योग प्रयोग, प्रात्यक्षिके, सदीप व्याख्याने आणि योगवर्ग, योग प्रशिक्षण सुरू झाले आणि हा ओघ विस्तारत गेला.

ज्यांनी सुरुवातीला गुरुजींना अव्हेरले होते, त्यांनीच नव्हे, तर सा-या जगाने नंतर गुरुजींना सन्मानाने स्वीकारले. गुरुजींनी योग प्रशकि्षणाचे हे व्रत आयुष्यभरासाठी अंगीकारले असल्याने पुण्यानंतर त्यांनी राज्यात इतरत्र योग प्रशकि्षणाला सुरुवात केली. लवकरच ते राज्यभरात योगगुरू म्हणून प्रसिद्ध झाले. अन्य राज्यांत त्यांची कीर्ती पसरली आणि मग योगाचा मंत्र जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न गुरुजींनी सुरू केला. स्वत: गुरुजींचे शालेय वा महाविद्यालयीन शकि्षण झाले नसले, तरी त्यांची देहबोलीच पुरेशी बोलकी असल्याने संवाद साधण्यात त्यांना कधीच अडचण आली नाही. माहिती-तंत्रज्ञानाचे युग सुरू झाल्यावर, तर गुरुजींच्या कार्याची महती नव्या तंत्र-विज्ञान साधनांनी जगाच्या कानाकोपर्‍या त पसरली आणि सर्व खंडांतून शिष्यांचा ओघ गुरुजींकडे आला.

योगशास्त्रातील हठयोगाला गुरुजींनी जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. खरे तर ही शास्त्रे आपल्या परंपरेने आधीच समृद्ध केली होती, पण कालौघात त्यांची विस्मृती आणि अवहेलनाच अधकि सुरू होती. ती गुरुजींनी आपल्या कार्याने थांबवली आणि या शास्त्राला नवे तेज प्राप्त करून दिले. योगाच्या विविध अंगांचा त्यांनी सखोल अभ्यास आणि व्यासंग केला होता. योगसूत्रांचा त्यांनी सोप्या, सुगम पद्धतीने अन्वयार्थ लावून तो ग्रंथरूपाने साधकांसाठी उपलब्ध केल्याने योगाची लोकप्रियता गतीने वाढली. त्यांच्या अगदी प्रारंभीच्या लाइट ऑन योगा, या ग्रंथाच्या जगभरात लक्षावधी प्रती खपल्या आणि आजही खपत आहेत. महेश योगी यांनी ध्यानाला जशी जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली, तसेच अजोड कार्य गुरुजींनी योगाच्या संदर्भात केले.

गुरुजींची शकिवण्याची सहज, सोपी पद्धत, प्रात्यक्षिकांवरील त्यांचा भर, समजावून सांगण्याची शैली आणि योग ही जीवनशैली बनावी, यासाठी त्यांची सुरू असलेली अखंड धडपड, यामुळे जगभरात गुरुजींना हजारो शिष्य लाभले आणि जगभरात सर्वत्र योगाची शेकडो केंद्रे स्थापन झाली. त्यातून गुरुजीप्रणीत योगाचा प्रसार व प्रचार वेगाने होऊ लागला. विशेषत: युवा वर्गात गुरुजी आणि योग अतिशय लोकप्रिय बनले. गुरुजींच्या कार्याची आणि योगाची महती जगभर पटली म्हणूनच आकाशगंगेतील एका तार्‍या ला गुरुजींचे नाव देऊन त्यांचे यश सर्वार्थाने तारांकित करण्यात आले.

गुरुजींविषयीची आदरभावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचे मोल अधोरेखित करण्याच्या उद्देशाने जगभरात ३ ऑक्टोबर हा दिवस "अय्यंगार डे' म्हणून साजरा केला जातो, असे भाग्य क्वचितच कुणा भाग्यवंताला मिळाले असावे. सामान्य माणसाला योगाद्वारे स्वत:शी, ज्ञानाशी, लौककि जगाशी आणि अंतरात्म्याशी जोडण्याचे कार्य गुरुजींनी केले. मला तर गुरुजींचा उल्लेख योग-प्र-पितामह असाच करावासा वाटतो. त्यांचे मोठेपण याच शब्दांत मांडावेसे मला वाटते.

वैयक्तकिदृष्ट्या गुरुजींचा आणि माझा संपर्क-संबंध अनेकदा आला. दरवेळी त्यांना भेटताना त्यांची योगाविषयीची तळमळ, निष्ठा जाणवत असे. योगाविषयी त्यांचा आत्मविश्वास चकित करणारा असे. योगाविषयी ते बोलतही अतिशय आवेशपूर्ण पद्धतीने. प्रत्यक्ष वागताना मात्र अतिशय प्रेमळ, आस्थापूर्वक वागत असत. त्यांनी लौककि शकि्षण घेतले नसले, तरी योगाचार्य म्हणून त्यांना अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट मिळाल्या. त्यांच्या शिष्यांमध्ये जगभरातले विद्यार्थी, संशोधक, तज्ज्ञ, राजकारणी, क्रीडापटू, उद्योजक, कलाकार... सारेच आहेत.

मुख्य म्हणजे गुरुजींनी आपल्या मुलांनाही हा योगाचा वारसा उत्तमरीतीने सुपूर्द केला. प्रशांत आणि गीताताईंच्या रूपाने हा वारसा पुढील साधकांच्या पिढ्याही चालवतील, असा विश्वास गुरुजींना त्यांच्या हयातीतच मिळाला, याचा आनंद सर्वात मोठा आहे. १९९१ मध्ये बार्शी येथे राष्ट्रीय स्तरावरील योग परिषद झाली होती. तिथे गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून, तर मी अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो. दिल्लीमध्येही दरवर्षी होणार्‍या योगा वीकदरम्यान आमची सतत गाठभेट होत असे. माझ्या पुस्तकांसाठी त्यांनी अतिशय आस्थेने आणि प्रेमाने प्रस्तावना लिहून दिल्या आहेत.

सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे योग या संज्ञेचा अर्थ जोडले जाणे असा आहे. गुरुजींनी साधकांना केवळ योगशास्त्राशी जोडले नाही, तर जीवनात जे चांगले, सकारात्मक आहे, त्या सा-यांशी जोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी जे जे उत्तम, उदात्त, मंगल, महन्मधुर जे जे, त्याच्याशी जोडले जाण्यातच तर मानवी जीवनाची इतकिर्तव्यता असते. या अर्थाने अय्यंगार गुरुजींनी हजारो साधक अशा योगाने जोडले, समृद्ध केले आहेत. पार्थिव रूपाने ते नसले, तरी मनामनांशी ते कायमचे जोडले गेलेच आहेत आणि सदैव ते जोडलेले राहतील, यात शंका नाही.