आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलाम नाशिककर ! (जयप्रकाश पवार)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक आठवडाभराच्या अस्वस्थतेनंतर शांत झाले. जनजीवन झपाट्याने सुरळीत होतानाच ते पूर्वपदावरही आले. एवढे की या शहरात दोन-चार दिवसांपूर्वी काही घडले होते की नाही इतपत शंका यावी, अशा रीतीने सर्वकाही शांततेत पार पडले. मुख्य शहरासोबत ग्रामीण भागाशी संबंधित त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व देवळा तालुक्यातील आठ ते दहा खेड्यांचा अपवाद वगळला तर सर्वत्र गुण्यागोविंदाचे व सलोख्याचे वातावरण राहिले. शहरी व ग्रामीण पोलिसांना परिस्थिती हाताळताना कसरत करावी लागली खरी, पण त्यांच्या हातून चुका झाल्यामुळे ग्रामीण भागात काही खेड्यातील वस्त्यांची होरपळ होऊन प्रकरण रक्तपातापर्यंत गेले, तर शहरात एकतर्फी कारवाईचा आरोप झाला. असो. ‘देर आये दुरुस्त आये’ या उक्तीनुसार मग पोलिसांच्याच पुढाकाराने एकोप्याची कोजागरी साजरी करण्याचे काम तणावग्रस्त खेड्यामध्ये झाल्यामुळे त्यांचा हा शीतल चंद्रप्रकाशात दूध पाजण्याचा प्रयोग पुढील अनेक पिढ्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्यासाठी उपयोगी ठरो हीच अपेक्षा. कोणत्याही राजकीय वा सामाजिक नेतृत्वाच्या पुढाकाराशिवाय सर्वसामान्य नाशिककरांनी जो संयम दाखविला त्याचाच परिपाक म्हणजे तणावाचे लोण हे चार भितींच्या आड अर्थात नाशिक जिल्ह्यापुरते मर्यादित राहिल्याने नाशिककरांच्या संयमी वृत्तीला सलाम.

ऐंशीच्या दशकातील दोन-चार अपवाद सोडले तर नंतर नाशिकच्या शांत वातावरणाला गालबोट लागण्याचे प्रसंग फारसे उद्््भवले नाहीत. पण ही परिस्थिती अशीच राहील वा येथे कायमच रामराज्य नांदेल अशी एकूण स्थिती नाही. शहर वाढते आहे, लोकसंख्या मोठ्या आकाराकडे सरकते आहेच, त्यामुळे विविधांगी भाषा व प्रांतातील लोकवावर गोदाकाठी वाढणे क्रमप्राप्त आहे. अमावास्येला वा खग्रास ग्रहणाच्या दिवशी गोदावरीमध्ये डुबकी मारणाऱ्या भाविकांच्या संख्येच्या तुलनेत याच तीरावर छटपूजेसाठी लोटलेल्या गर्दीचे अवलोकन केले तरी नाशिक तीर्थक्षेत्राने केव्हाच कूस बदलली आहे हे स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे बदलाची ही चाहूल कायद्याच्या रक्षकांना वेळीच लागणे अपेक्षित असते. तसे झाले नाही तर यंत्रणा गाफील आहे असा त्याचा सरळ सरळ अर्थ निघतो. सामाजिक सलोख्याला तडा जाणार असेल वा तो जावा म्हणून काही समाजकंटक विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन कार्यरत असतील तर त्यांचे मनसुबे वेळीच लक्षात घेऊन पोलिसांनी ते उधळवून लावले पाहिजे होते. थोडक्यात अशा नाजूक स्थितीत पोलिसांची भूमिका ही एखाद्या सुईणीसारखी असायला हवी. सामाजिक गंभीर वा स्फोटक परिस्थिती हाताळण्याचे कसब तसेच तो प्रसंग हाताळताना वेगळे वळण लागणार नाही, चुकीच्या कृतीमुळे जखम चिघळणार नाही, दोन्ही समाजातील मने दुखावणार नाहीत, याची दक्षता घेतानाच खाकी वर्दीवर एकतर्फी कारवाईचा आक्षेप होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक ठरते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील पोलिस यंत्रणा तळेगावची अतिसंवेदनशील घटना हाताळताना नेमकी गाफील राहिली असे म्हणायला वाव आहे.
तळेगावच्या प्रकारानंतर खरे तर खबरदारीच्या उपाययोजना आखायला हव्या होत्या. कारण कोपर्डीनंतर ज्या रीतीने मोर्चारूपाने संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या त्या दुर्लक्षित करण्यायोग्य अजिबातच नव्हत्या. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तळेगावच्या वेशीवर संतप्त जमावाने नाशिक-त्र्यंबकेश्वर राज्यमार्गासह नाशिकच्या चोहोबाजूंनी ज्या रीतीने धुडगूस घातला तो पाहता अटकाव आवश्यक होता. त्र्यंबकेश्वर मार्गावरील गावागावांतील तणावाच्या बिकट परिस्थितीचे अवलोकन करता त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या व परत माघारी फिरणाऱ्या रॅलीची परवानगी कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव नाकारायला हवी होती. अन् समजा ते शक्य नव्हते तर त्या रॅलीसोबत मोठ्या प्रमाणात बंदोबस्तासाठी फौजफाटा तैनात करायला हवा होता. त्यायोगे दोन्ही समाजगट आमनेसामने येणार नाही वा परस्परविरोधी घोषणाबाजी होऊन प्रकरण हातघाईवर जाणार याची दक्षता निश्चितच घेणे शक्य होते. दुसरीकडे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी अफवांच्या प्रसार-प्रचारास कारणीभूत ठरणारी इंटरनेट सेवा असो की व्हॉट्सअॅप याचे मानगूट वेळीच दाबून धरल्यामुळे तणाववाढीला पायबंद घालणे शक्य झाले. पण त्यांनीही नाशिकरोड भागात ज्या रीतीने विशिष्ट वस्त्यांमध्ये कारवाई केली तीच नेमकी एकतर्फीच्या आरोपाने घेरली गेली. वास्तविकत: विद्यमान पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांना अाता शहरासाेबतच अधीक्षक म्हणून पूर्वी केलेल्या ग्रामीण क्षेत्रातील कामाचा अनुभव गाठीशी आहे. त्याचा उपयोग गृह विभागाला समयसूचकता दाखवत करून घेता आला असता. असो. सूज्ञ नागरिकांच्या पुढाकारामुळे येथील जातीय सलोखा अबाधित राहिला. नाशिकच्या भल्यासाठी शांतताच महत्त्वाची आहे, हाच संदेश सर्वदूर पोहोचला. त्यासाठी नाशिककरांना पुन्हा एकवार सलाम !

बातम्या आणखी आहेत...