आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Meena Deol About Live In Relationship

मतप्रवाह : एक पाऊल पुढे …

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये दीर्घकाळ स्त्री आणि पुरुष एकमेकांसोबत राहत असतील, तर त्यांना विवाहित दांपत्याचा दर्जा देण्यात येऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

रिलेशनशिप म्हणजे संबंध; मग तो रक्ताच्या नात्याचा असेल, प्रेम व मैत्रीचा असेल, कायद्याचा असेल वा पारंपरिक धार्मिक विधिपूर्वक घडवला गेलेला असेल. कोणत्याही प्रकारे संबंध निर्माण झाला, तरी त्यात मुख्यत्वेकरून एकत्र, एका छताखाली राहणे अपेक्षित असते. आपण येथे स्त्री-पुरुष संबंधांचा विचार करणार आहोत. या संबंधालाच संसार असे म्हणतात. संसाराच्या जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडतात.

स्त्री व पुरुष यांच्यात संबंध प्रस्थापित होण्याचे तीन प्रकार संभवतात. लादलेले संबंध (मोठ्ठे सांगतात म्हणून लग्न केले), आंधळे संबंध (प्रथमदर्शनी वगैरे प्रेमात पडून लगेच केलेले लग्न) आणि लग्नाविना एकत्र राहून निर्मिलेले संबंध. या तीन प्रकारांची तुलना केली, तर आपल्याला सहज जाणवेल की, तिसरा प्रकार हाच सर्वोत्तम पर्याय आहे. दुर्दैवाने आपल्याकडे हा पर्याय फार उशिरा म्हणजे जेमतेम पाच-सात वर्षांपासून व्यवहारात आला, चर्चेत आला. त्यामुळे या पर्यायाला तितकीशी समाजमान्यता अजूनही मिळालेली नाही व गैरसमजुतीही दूर झालेल्या नाहीत.

स्त्री व पुरुषाचे सहजीवन समानतेवर आधारित असायला हवे. त्यांच्यात मैत्रीपूर्ण प्रेम असायला हवे. एकमेकांबद्दल आदर हवा. असे आदर्श सहजीवन पुरुषप्रधान समाजरचनेत अशक्य आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा आदर्श सहजीवनाकडे नेणारा पर्याय ठरू शकतो. आईवडिलांनी जात-पात, पत्रिका इत्यादी पाहून ठरवलेले लग्न वरपक्ष व वधूपक्ष यांच्या असमानतेच्या पायावरच उभारलेले असते. प्रेमात पडून लग्न करणाऱ्या जोडप्यावर ते लग्न निभावून नेण्याची मोठी जबाबदारी येते. लग्नापूर्वी फिरायला जाणे, एकत्र सिनेमा पाहणे, शरीरसंबंध प्रस्थापित करणे असे सर्व टप्पे ओलांडले, तर चोवीस तास एकत्र राहू लागल्यावरच एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वातले कंगोरे टोचू लागतात. लहान घर, आर्थिक चणचण, दोघांच्या कुटुंबातील सभासदांचे हस्तक्षेप अशा समस्यांची त्यात भर पडते व उगाचच लग्नबंधनात अडकलो, असे दोघांनाही वाटू लागते. अशा वेळी काही जोडपी कसेबसे लग्न निभावून नेतात किंवा काही जण न्यायालयात धाव घेतात. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा एक मित्र व त्याची मैत्रीण यांच्यामध्ये झालेला, उघडे डोळे ठेवून केलेला करार आहे. दोघांमध्ये मैत्री, समजूतदारपणा असतो. कराराबाबत नि:शंक स्पष्टता असते. त्यामुळे हे सहजीवन निभावून नेणे त्या दोघांना सहज शक्य होते. काही कारणांनी ते अशक्य झाले, तरी न्यायालयात जाण्याची गरज नसते. म्हणूनच आदर्श सहजीवनासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

या ‘रिलेशनशिप’पैकी स्त्री वा पुरुष यांचा मृत्यू झाला, तर मृत व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क सांगणारे वारसदार पुढे येतात व तेव्हा मात्र न्यायालयीन समस्या उभी राहू शकते. लग्नाविना पुरुषाबरोबर राहणाऱ्या बाईला त्याच्या मृत्यूनंतर वारसा हक्क मिळू नये, यासाठी खटला उभा राहतो. सुदैवाने आपल्या न्यायालयाने अलीकडेच अशा संबंधास मान्यता दिली आहे. त्यामुळे या सहजीवन पद्धतीबद्दल उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत.

इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्या जोडप्याचे पारंपरिक पद्धतीने विधिपूर्वक लग्न झाले आहे, अशा जोडप्यातील स्त्रीकडेदेखील बहुतांश वेळा विवाह नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र नसते. अशा वेळी न्यायालय लग्नाचा फोटो, निमंत्रण पत्रिका, रेशन कार्डावरील नाव असे पुरावे ग्राह्य धरते. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधली स्त्रीदेखील एकत्र राहत असल्याचे पुरावे सादर करू शकेलच, मग तिला विवाहितेचा दर्जा देण्यास न्यायालय आडकाठी का करेल? ही पद्धत बोकाळली तर समाजात स्वैराचार वाढेल, अशी भीती परंपरावाद्यांना, मूलतत्त्ववाद्यांना वाटते. वास्तवात आज किंवा पूर्वीपासूनच विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे कमी आहेत का? उलट अशा संबंधात बाईला फसवून खोटे खोटे, देवळात वगैरे लग्न झाल्याचे भासवून अडकवले जाते. हिंदू पुरुषाचे हे दुसरे खोटे लग्न अवैध ठरवले जाते. त्यामुळे सर्व शक्याशक्यता लक्षात घेऊन उघड्या डोळ्याने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ स्वीकारणाऱ्या स्त्रीला न्यायालयाने मान्यता दिली, या घटनेचे आपण स्वागत करायला हवे.

अनेकांचा गैरसमज असा आहे की, ज्येष्ठ नागरिकांसाठी "लिव्ह इन रिलेशनशिप' हा पर्याय सुयाेग्य आहे. मुले दुरावलेली वा परदेशात स्थायिक झालेली, अशा जोडप्यांपैकी एक जण वारला, तर दुसरा एकाकी पडतो. अशा वेळी दोन एकाकी वृद्धांनी एकत्र राहावे, असे अनेक जण मानतात. प्रत्यक्षात हे अवघड आहे. वय वाढलेल्या व्यक्तीला दुसऱ्याशी तडजोड करणे कठीण जाते. तरुण स्त्री-पुरुषांनी जेमतेम ओळख झाल्यावर लग्नबंधनात पडण्याऐवजी "एकत्र राहून पाहू' असे ठरवणे हा निर्णय शहाणपणाचा ठरू शकतो. अलीकडच्या काळात असा निर्णय घेणाऱ्या मुलामुलींची संख्या वाढली आहे. करिअरला महत्त्व देणारी आजची तरुण पिढी लग्न म्हणजे "मस्ट' असे मानतच नाही. दोघांची मैत्री आहे, विचार जुळत आहेत, तर एकत्र राहायला काय हरकत आहे, घरभाड्याचे पैसे विभागले जातील, असा "जमिनीवरचा' विचार ही पिढी करते. पैसे साठले, नोकरीधंद्यात स्थिरावलो की लग्नाचा, मुलाचा विचार करू, अशी मांडणी राजरोसपणे करते. काही वेळा दोघांच्याही दृष्टीने ही गाजराची पुंगी असते. वाजली नाही तर खाऊन टाकता येते. न्यायालयाचे फेरे करावे लागत नाहीत. छान मैत्रीचे संबंध राखून ते दोघे विभक्त होऊ शकतात. इंग्रजीमध्ये लिव्ह शब्दाचे स्पेलिंग दोन प्रकारे लिहिता येते. दुसऱ्या प्रकारे लिहिले की त्या लिव्हचा अर्थ कायमचे सोडून जाणे असा होतो. ही जोडपी एकमेकांना कायमचे सोडतही नाहीत. मैत्री तर असतेच. शिवाय काही दिवस स्वतंत्र राहून पाहू, असाही विचार असतो. लिव्ह इन रिलेशनशिपमधल्या जोडप्यांची संख्या जितकी वाढेल, तितका कुटुंब न्यायालयाचा भार हलका होईल.

या नात्यातही फसवणुकीची शंका नाकारता येणार नाही. त्यासाठी काही नियम पाळायला हवेत. हे नाते कोणत्या कारणाने संपू शकते, याचा विचार आधीच करायला हवा. या नात्यातल्या दोघांनीही स्वत:बद्दलची संपूर्ण खरी माहिती एकमेकांना द्यायलाच हवी. मैत्री जुनी व परिपूर्ण असावी. दोघांनीही आपल्या कुटुंबाची या रिलेशनसाठी मान्यता मिळवावी किंवा नाही मान्यता मिळाली तरी चालेल, अशी मनोधारणा ठेवावी. मुख्य म्हणजे, आर्थिक व्यवहार काटेकोर असावे. दोघांनी एकत्र आर्थिक व्यवहार करणे टाळावे. अशी जोडपी जागोजागी दिसू लागली, तर लग्नबंधनात अडकलेल्या जाेडप्यांना त्यांचा नक्कीच हेवा वाटेल.
meenadeval35@gmail.com