आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम कट्टरवाद्यांना डोनाल्ड ट्रम्प यांचे आव्हान (मुजफ्फर हुसेन)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लादेनपासून बगदादीपर्यंतच्या इस्लामी दहशतवादाला मोडून काढणे अमेरिकेला फार कठीण जात आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी अमेरिकेनेही अतिरेक्यांना समजेल अशाच भाषेत उत्तर शोधण्याची तयारी सुरू केली आहे.
वर्ष २०१६ ला प्रारंभ झाला आहे. अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणूक ही या वर्षातील महत्त्वाची घटना असेल. नोव्हेंबर महिन्यातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील जनता रिपब्लिकन पक्षाच्या हाती सत्ता सोपवेल काय? आजवरचा इतिहास पाहता सत्ता रिपब्लिकनांच्याच हाती जाईल, असे वाटते. रिपब्लिकनांकडून राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार कदाचित असू शकतील डोनाल्ड ट्रम्प. त्यांची प्रतिमा पाहता अमेरिकेतील एक मोठा वर्ग त्यांच्या विरोधात मतदान करू शकतो. अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूला शोधून काढण्याचे काम डेमोक्रॅटिक पक्षाच्या ओबामा यांनी केले, हे विसरता येणार नाही. राष्ट्रपती ओबामा यांनी अमेरिकेचा सर्वात कडवा शत्रू लादेन याला समुद्राच्या तळाशी गाडले आणि डेमोक्रॅटिकचा झेंडा उंच फडकवला. त्यानंतर मात्र मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका न घेतल्याने अमेरिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का लागला, हेही मान्य करावे लागेल.

जगात जिथे कोठे अमेरिकेचे हितसंबंध असतील, त्या सर्व ठिकाणी मुस्लिम अतिरेक्यांनी बाधा आणल्याचे रिपब्लिकन पक्षाला वाटते. मुस्लिम अतिरेक्यांनी चालवलेल्या रक्तपातामुळे हे जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे मुस्लिम दहशतवादालाच मुख्य मुद्दा बनवून डेमोक्रॅटिक पक्षाला चारी मुंड्या चीत करण्याची नीती ट्रम्प यांची आहे. कोणीही मतदार असो, आणखी अधिक काळ मुस्लिम दहशतवाद सहन करण्याची त्याची तयारी नाही. मुस्लिम दहशतवाद हा देशासाठी गंभीर आजार असल्याची भावना प्रत्येक अमेरिकन नागरिकाची आहे. या संधीचा लाभ उठवत अमेरिकेला पुन्हा एकदा जगात शक्तिशाली राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे.

अमेरिकेतील कोणताही नागरिक आपल्या पक्षापेक्षा देशाला अधिक महत्त्व देणारा आहे, हे रिपब्लिकनांना चांगले माहीत आहे. त्यामुळेच पारंपरिक मतांशिवाय इतर मतेही रिपब्लिकन पक्षाकडे वळली तर आश्चर्य वाटायला नको. रिपब्लिकनांचे म्हणणे आहे की, `विचारधारेपेक्षा देश मोठा आहे. देश सुरक्षित ठेवण्यासाठी, अमेरिकी नागरिक आवश्यक ते सर्व करण्यास कटिबद्ध आहेत.’

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. अशा वेळी अमेरिकी मतदारांचा कल ओळखणे इतके सोपे नाही. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर हल्ला झाला, तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बुश यांनी जगाला दिलेला इशारा विसरता येणार नाही. ते म्हणाले होते की, "जे आमच्या सोबत नाहीत, ते आमच्याविरुद्ध आहेत असे समजा!’ अमेरिकेचा संपूर्ण इतिहास अशी वादग्रस्त वक्तव्ये आणि कारनाम्यांनी भरलेला आहे. अमेरिकेने आपल्या देशाचे हित सर्वोच्च मानले. आपले भविष्य घडवत असताना अमेरिकेने इतर देशांचे भविष्य घडेल याकडेही लक्ष दिल्याचे दिसते. त्यामुळेच तो देश महाशक्ती बनू शकला. समृद्ध बनू शकला. त्यानंतर तो आपल्या वार्षिक बजेटमधील ५१ टक्के खर्च सामरिक बाबींवर करू लागला.

अमेरिकेची ही प्रगती पाहून दुर्बल देश अमेरिकेशी जवळीक साधायला लागले. लीग आॅफ नेशन आणि नंतर राष्ट्रसंघाला मुठीत ठेवून अविकसित आणि दुर्बल देशांची नेतेगिरी करणेही ओघानेच आले. वैज्ञानिक शोधांच्या आधारावर ज्या आर्थिक सुविधांची आवश्यकता होती त्याही अमेरिका देऊ लागला व यातून जगाचे नेतृत्व त्या देशाकडे आले. काळाच्या ओघात अनेक देश स्वतंत्र झाले. हे देश अमेरिकेची मदत घेऊ लागले. त्यातूनचे हे देश अमेरिकेची भाषा बोलू लागले. दरम्यान, महाशक्तीच्या रूपात रशियाचा उदय झाला. युरोप आणि आशियाप्रमाणेच आफ्रिकेतील नवोदित देशही अमेरिकेच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या झगमगाटाने प्रभावित होऊ लागले. अमेरिकेच्या माध्यमातून या देशांची प्रगती होऊ लागली. परंतु या नवोदित देशांच्या साधनसंपत्तीवर अमेरिकेची पकड घट्ट होऊ लागली तेव्हा मात्र त्या देशातील नेते अस्वस्थ होऊ लागले. आणि पाहता पाहता अमेरिकेला आव्हान देण्यासाठी अनेक देश पुढे येऊ लागले. यासाठी मग धर्माचाही आधार घेण्यात येऊ लागला. मुस्लिम देश खनिज तेल आणि आपल्या जनसंख्येच्या बळावर अमेरिकेला आव्हान देऊ लागले.

आज अमेरिकेच्या पुढील सर्वात मोठे आव्हान इस्लामी राष्ट्रांचेच आहे. भले त्यांच्याकडे अमेरिकेप्रमाणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे नसतील, पण धर्माच्या नावावर असलेली एकी, पेट्रोलच्या खाणी आणि मुबलक लोकसंख्या यामुळे या देशांनी अमेरिकेसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. लादेनपासून बगदादीपर्यंतच्या इस्लामी दहशतवादाला मोडून काढणे अमेरिकेसाठी फार कठीण झाले आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी अमेरिकेनेही अतिरेक्यांना समजेल अशाच भाषेत उत्तर शोधण्याची तयारी सुरू केली आहे. याचे संघटित रूप आता येत्या काळात अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिसणार आहे. त्या घडामोडींकडे राजकीय विश्लेषकांचे बारीक लक्ष असेल.

राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीत मुस्लिम जनसंख्येची गणना करून मुसलमानांना इतर समाजापासून वेगळे पाडण्याची रणनीती रिपब्लिकनांची आहे. अमेरिकी मुसलमानांची गणती झाल्याने जगातील ख्रिस्ती देशांना एक संदेश जाईल. यातून अमेरिकेतून मुस्लिम दशहतवाद हद्दपार होईलच. शिवाय जगातील इतर देशांमध्येही मुस्लिमांना वेगळे करण्याच्या प्रक्रियेला वेग येईल. तसे पाहायला गेले तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही नवीन सांगितलेले नाही. यातून मुस्लिम अतिरेक्यांच्या विरुद्ध जगात एक आघाडी उघडली जाईल. रिपब्लिकन पक्षाच्या धोरणामुळे अमेरिकेत मुस्लिम समाजाबद्दलचा दुरावा आणखी वाढणार आहे.

एखाद्या दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असलेल्या माणसाला आपल्या देशाचे नागरिकत्व देण्यात येऊ नये, यात वावगे असे काही नाही. लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये असे करताच येत नाही; परंतु ट्रम्प यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले गेले तर जगातील प्रत्येक देशात मोठी खळबळ माजेल. अमेरिकेची राज्यघटना असे करण्यास परवानगी देईल काय? ट्रम्प यांना हे करणे कदाचित शक्य होणार नाही, पण तरीही अमेरिकेतील मुसलमानांना गांभीर्याने विचार करावाच लागेल. जिहादी कट्टरवाद्यांच्या फुटीर वृत्तीमुळे एक दिवस असा येईल की जगात या मुस्लिम समाजाबद्दल अविश्वास बळावत जाईल. यात समाजाचेच नुकसान आहे. घृणेच्या या चक्रीवादळातून सुटका कशी करून घ्यायची, हा मुस्लिम समाजासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे.
m_hussain1945@yahoo.com