आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छत्रपती, पेशवे आणि पवार (मुजफ्फर हुसेन)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अमेरिकेवरील व्हिएतनामच्या विजयाचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावे लागेल. मी जे नेतृत्व केले ते त्यांचा छोटा अनुयायी म्हणूनच.’ या ओळी व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या समाधीवर कोरल्या आहेत.
भारताला ज्यांनी स्वाभिमान दिला, जातिभेदाच्या वर उठून विचार करायला ज्या महापुरुषाने शिकवले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहण्याची आमच्या नेत्यांची दृष्टी विशाल होऊ शकलेली नाही. या ठिकाणी मला व्हिएतनाम या छोट्याशा देशातील नेत्यांची तीव्रतेने आठवण होत आहे. त्यांनी शिवरायांकडून घेतलेली प्रेरणा पाहिली की, वाटते आपण आपला इतिहास समजून घेण्यात कमी पडलो. परंतु व्हिएतनाम नामक चिमुकल्या देशाने भारतातील शूरवीरांच्या इतिहासाचे चिंतन केले आणि अशी रणनीती बनवली की अमेरिकेसारख्या महासत्तेलाही रणांगण सोडून पळून जावे लागले. याचे विश्लेषण कोणा भारतीयाने केले असते तर कदाचित आपला विश्वास बसला नसता; पण स्वत: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आणि विदेश मंत्र्यांनी यामागील रहस्य उलगडून दाखवले तेव्हा सारेच चकित झाले.

या घटनेला आता बरीच वर्षे झाली आहेत; पण व्हिएतनामचे नेते संधी मिळेल तेव्हा या घटनेला उजाळा देत असतात. व्हिएतनाममधील नेत्यांचे म्हणणे होते की, जर त्यांनी भारतीय इतिहासातील नायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला नसता, तर अमेरिकेसारख्या अजगराने आम्हाला गिळून टाकले असते. प्रख्यात विचारवंत अशोक चौगुले यांनी या घटनेवर विस्तृत लिखाण केले आहे. खेदाची गोष्ट म्हणजे तत्कालीन भारत सरकारने या घटनेची चर्चा केलीच नाही आणि महाराष्ट्रातही यावर फार काही लिहून आल्याचे दिसत नाही. दोन दशकांपूर्वी शक्तिशाली अमेरिकेला व्हिएतनामने झुकवले. आक्रमण करणाऱ्या अमेरिकेशी व्हिएतनामने तब्बल २० वर्षे तगडी झुंज दिली. या छोट्या देशाने असा तडाखा दिला की, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, सक्षम सैनिक असलेल्या अमेरिकेला पळता भुई थोडी झाली. अमेरिकेचा मानहानिकारक पराभव झाला. त्यानंतर अमेरिकेने व्हिएतनामच्या वाट्याला जाण्याचे धाडस केले नाही. व्हिएतनामचे नेते आपल्या विजयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे आभार कसे मानावेत, याचा विचार करत राहिले, जणू हा महापुरुष त्या मातीत जन्माला आला असावा. शोकांतिका अशी की, तत्कालीन काँग्रेस सरकारने या गोष्टीचा कुठे उल्लेखही केला नाही; पण सत्य लपत नसते. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह भारत दौऱ्यावर आले तेव्हा हे सत्य जगासमोर आले.

भारतातल्या पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह यांनी आपल्या विजयाचे सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, ‘अमेरिकेसारख्या विशाल सैनिक शक्ती असलेल्या देशाला पराजित करणे इतके सोपे नव्हते. युद्ध कसे जिंकायचे या संबंधातील उपलब्ध साहित्याचा धांडोळा घ्यायला आम्ही सुरुवात केली, तेव्हा एक पुस्तक हाती लागले. एका छोट्या भारतीय राजाने बलाढ्य मुघल बादशहा औरंगजेबाला चारीमुंड्या चीत केले होते. त्या राजाची कार्यशैली आणि चरित्राने मी इतका प्रभावित झालो की, मी अमेरिकेशी सुरू असलेल्या युद्धाची रणनीतीच बदलून टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध लढण्यासाठी जी नीती वापरली त्याचा अंगीकार करायचे आम्ही ठरवले. अमेरिकेच्या भक्कम बटालियनवर आमचे सैनिक मावळ्यांप्रमाणे अचानक तुटून पडू लागले. काही कळण्याच्या आत अमेरिकी बटालियनचा धुव्वा उडू लागला. शेवटी अमेरिकेने रणभूमी सोडून पळून जाणे श्रेयस्कर समजले. त्यामुळे शिवाजी महाराज आमचे आदर्श बनले.’ आज व्हिएतनामची जनता शिवाजी महाराजांना नमन करते. शिवरायांची प्रेरणा नसती तर आम्ही गुलाम बनलो असतो, असे तेथील जनतेला वाटते. व्हिएतनामचे नेतृत्व करणाऱ्या हो ची मिन्ह या राष्ट्राध्यक्षांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या समाधीवर पुढील ओळी कोरण्यात आल्या. ‘व्हिएतनामच्या विजयाचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावे लागेल. मी जे नेतृत्व केले ते त्यांचा छोटा अनुयायी म्हणूनच.’

या ऐतिहासिक घटनेनंतर व्हिएतनामच्या महिला परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी गांधीजींची समाधी आणि लाल किल्ला आदींचे दर्शन घेतले. त्यांनी विचारणा केली छत्रपती शिवरायांची समाधी कुठे आहे? त्या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले, येथून दूर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. त्या महिला मंत्र्यांनी रायगडावर जाण्याचा आग्रह धरला. त्या रायगडावर गेल्या. शिवरायांना आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा हा एक दृष्टिकोन झाला. आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा दृष्टिकोन पाहा. महाराष्ट्रातील जनतेला जातींच्या डबक्यात ढकलण्याचा घृणास्पद प्रकार त्यांनी केला आहे. शरद पवार म्हणाले, ‘पेशव्यांकडून छत्रपतींची नेमणूक पहिल्यांदाच होत आहे.’ कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेत नेमणूक होणे, हे जातीचे राजकारण करणाऱ्या पवार यांच्यासाठी तोट्याचे आहे. ब्राह्मणांनी मराठ्यांची नेमणूक केली, असा आशय व्यक्त करणारी टिप्पणी पवार यांनी केली. हे अनवधानाने झाले नाही. त्यानंतर गेल्या आठवड्यात पवार हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आले तेव्हा म्हणाले, मी ते विधान जाणीवपूर्वकच केले. यावर वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेकडे तो विवेक आहे.

m_hussain1945@yahoo.com

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...