आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेल्या मातेची हृदयस्पर्शी भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वास बसणार नाही अशा अनेक बातम्या,घटना आपल्याला वाचायला, ऐकायला मिळतात. त्यावर आपण अधिक विचार करू लागतो तेव्हा हे जीवन कितीतरी विरोधाभासांनी भरलेले आहे, याची जाणीव होते. विज्ञानामुळे सारे जग एक कुटुंब बनले आहे, पण एकाच कुटुंबात कलह आणि विरोधाभास असल्याची उदाहरणेही काही कमी नाहीत. दुबई टाइम्समध्ये छापून आलेली घटना अशाच प्रकारची म्हटली पाहिजे.

फातेमा आणि आयशा या दोन बहिणी दुबईहून हैदराबादला पोहोचल्या. भारतात पर्यटन करण्यासाठी नाही तर आपल्या हरवलेल्या आईला शोधण्यासाठी त्या आल्या हाेत्या. आपली आई दिसते कशी याचीही या दोघी बहिणींना माहिती नाही, तरीही आईला शोधायचेच याची तीव्र तळमळ अंत:करणात होती. या दोघींना आईबद्दल जी माहिती होती ती अशी : दुबईतील रशीद उबेद नामक एका विवाहित व्यापाऱ्याशी आईचे लग्न झाले होते. हे लग्न आठ वर्षे टिकले. या काळात या दोघी जन्मल्या. १९८८ मध्ये आयशा पाच वर्षांची, तर फातेमा चार वर्षांची होती. पित्याने आईला तलाक दिला. त्यानंतर त्यांची आई हैदराबादला परतली. आई गेली कोठे हे कळण्याचे या दोघींचे वय नव्हते.

२८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर कोण कोठे आहे हे शोधून काढणे कठीण होते. चुकून समोर आले तरी आई आपल्या मुलींना ओळखणे शक्य नव्हते; परंतु दोन्ही बहिणींनी ठाम निर्धार केला होता. कसेही करून आईला शोधून काढायचेच. पित्याचे निधन झाले तेव्हा दोघी आईच्या शोधात बाहेर पडल्या. वडिलांच्या घरातील जुन्या कपाटात आईचे एक अस्पष्ट छायाचित्र सापडले होते. हे छायाचित्र पाहून दोघी बहिणींना भरून यायचे. आईला शोधायचे कसे, हाच मोठा प्रश्न होता.
आयशा हिच्या पतीने या शोधकार्यात दोघींना साथ दिली. तलाकनंतर आई हैदराबादला परतली असली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्या हैदराबादला पोहोचल्या. आईचे नाव नाजिया असल्याचे माहीत होते. एका सामाजिक कार्यकर्त्याला घेऊन ते हैदराबाद दक्षिणचे डीसीपी सत्यनारायण यांना भेटले. आई नाजिया कुठे असू शकेल हे त्या अस्पष्ट छायाचित्रावरून शोधणे अवघड होते. पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास सुरू केला. अनेक मोहल्ल्यांत छायाचित्रे लावली. ज्या महिलांचा विवाह दुबईत झालेला होता आणि नंतर तलाक झाल्याने परतल्या, अशा महिलांचा शोध घेणे सुरू झाले. दुबईहून परतलेल्या महिलांनी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन केले. पोलिसांनी दोघींना परत जाण्यासाठी आग्रह केला. त्यांच्या आईचा सुगावा लागताच संपर्क करू, असे सांगितले.

केवळ हैदराबादच नाही तर केरळ, कर्नाटक या राज्यांतही दुबईहून परतलेल्या महिलांचा शोध पोलिसांनी चालू ठेवला. हैदराबादेतील सर्व विवाह नोंदणी कागदपत्रांचा धांडोळा घेण्याचे काम सुरू केले. दुबईहून तलाक घेऊन आलेल्या नाजिया नामक महिलेचा विवाह तिच्या पित्याने एका फळविक्रेत्याशी लावून दिल्याची माहिती पुढे आली. फळविक्रेत्याने तिला कर्नाटकात नेले. नाजियाचे पिता आज हयात नव्हते. त्यामुळे त्या फळविक्रेत्याला शोधायचे कसे हा प्रश्न होता. धावाधाव केल्यानंतर विवाह लावून दिलेल्या काझीची माहिती मिळाली, पण त्याचेही निधन झाले होते. साक्षीदार म्हणून काझीच्या मुलाने सही केली होती. तीन महिने शोध घेऊन पोलिस काझीचा मुलगा सलीमपर्यंत पोहोचले आणि नाजिया सापडली.

पोलिसांनी नाजियाला शोधून काढले तेव्हा तिचे वय ६० हून अधिक होते. तिची स्मरणशक्ती शाबूत होती. पोलिसांनी नाजियाला सांगितले की तुझ्या दोन मुली तुला शोधत भारतात आल्या आहेत. नाजिया गोंधळून गेली. आपल्या मुलींबद्दल काही आठवत नव्हते, पण एका मुलीच्या हाताला सहा बोटे असल्याचे मात्र पक्के ध्यानात होते. दोन्ही मुलींची बोटे सामान्यांप्रमाणे पाचच होती, त्यामुळे पोलिसही गोंधळले. छोटी मुलगी फातिमा हिने पोलिसांनी सांगितले की जन्मत: तिच्या हाताला सहा बोटे होती; पण नंतर आॅपरेशन करून एक बोट काढून टाकले. त्यानंतर आई आणि मुलींना डीसीपी कार्यालयात भेटण्यासाठी पोलिसांनी वेळ आणि दिनांक निश्चित केले. ठरलेल्या वेळी आयशा ही पती, १० वर्षांचा मुलगा आणि बहिणीला घेऊन पोहोचली. आईने मुलींना पाहिले. आनंदाश्रू वाहू लागले. तिघी हमसून हमसून रडू लागल्या. हे भावुक दृश्य बघणाऱ्यांना विचारप्रवृत्त केले नाही तरच नवल होते.

आता आई नाजिया हिचे वेगळे जग आहे. आपले पती, मुलगा आणि दोन मुलींसोबत ती राहते. आता ती दोन्ही मुलींसोबत दुबईला तर जाऊ शकत नाही; पण मरण्यापूर्वी पोटच्या लेकरांना बघण्याचे भाग्य तिला मिळाले. आई आणि दोन्ही मुलींनी ईश्वराचे आभार मानले. हैदराबाद पोलिसांचे प्रामाणिक प्रयत्न आणि विलग झालेल्या आईशी भेट घालून देणाऱ्या या भारतभूमीला त्यांनी वंदन केले. ही घटना वाचून तलाक व बहुविवाह पद्धतीवर समाजातील धुरीण आणि सरकार विचार करेल, अशी आशा बाळगायची काय?
बातम्या आणखी आहेत...