आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्लामी जगतावर युद्धाचे ढग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लिम देशांकडून इस्लामी एकतेचा डांगोरा पिटला जातो. पण हे समानधर्मी देश नेहमीच आपसात लढत असतात. आपल्या शेजारील मुस्लिम देशाशी मधुर संबंध असलेला एखादा मुस्लिम देश क्वचितच पाहायला मिळेल. शिया-सुन्नी आणि अरब-अजम हा संघर्ष तर शेकडो वर्षांपासून चालत आला आहे. सीमांवरून इतके वाद आहेत की तेथील शासकांना क्षणाचीही उसंत नसते. खनिज तेलाच्या विक्रीतून करोडो रुपयांची कमाई होते, पण त्यातील किती टक्के रक्कम जनता किंवा देशाच्या विकासावर खर्च होतो, हा प्रश्न वारंवार विचारला जातो. खनिज तेलाचे साठे असूनही त्यातून येणारा पैसा सत्ताधीशांच्या अय्याशीवरच खर्च होतो किंवा शेजारी देशाशी सुरू असलेल्या पारंपरिक स्पर्धेवर.
इस्लामचे अनुयायी असूनही शेजारील मुस्लिम देशांशी स्पर्धा करणे, ही एक सर्वसामान्य बाब होऊन बसली आहे. या देशांमध्ये एकमेकांप्रती इतकी घृणा आणि तिरस्कार भरला आहे की, देशाच्या एकूण उत्पन्नापैकी ५० ते ६० टक्के त्यावरच खर्च होतो. आपल्या शेजारील देशाची हेरगिरी करणे यांचे नित्यकर्म झाले आहे. यामुळेच जगात तयार होणा-या एकूण शस्त्रास्त्रांपैकी ६० टक्के शस्त्रास्त्रे येथेच खर्ची पडतात. पश्चिमी देशांची यातून मोठीच कमाई होते.
काही दिवसांपूर्वी एक चकित करणारी बातमी प्रसिद्ध झाली होती. जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश-साैदी अरेबिया हा पाकिस्तानकडून अणुबाँब खरेदी करणार आहे. वाचकांना आठवत असेल की गेल्या काही महिन्यांपासून सिरियामध्ये अल बगदादी नावाच्या अतिरेक्याने इस्लामिक स्टेट (दाईश) नावाच्या संघटनेच्या माध्यमातून मध्य पूर्वेतील देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. यामुळे युरोप आणि अमेरिकेने मिळून घोषित केले की, या प्रकारचा दहशतवाद थांबवल्याशिवाय जगात सुखशांती नांदणे शक्य नाही. अमेरिका आणि पश्चिमेतील अनेक देशांनी मिळून या अतिरेकी संघटनेला गाडण्यासाठी अनेक योजना बनवल्या. त्यातील एक योजना म्हणजे इस्लामिक स्टेटमुळे जेरीस आलेल्या देशांना हरप्रकारे मदत करणे. दरम्यान, बगदादी हा मरण पावला की जिवंत आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
सौदी अरेबिया हा देश सिरियाला लागून आहे. त्यामुळे सौदीला अल बगदादीसारख्या अतिरेक्यांची अधिक चिंता आहे. बगदादीसारख्या माथेफिरू अतिरेक्यांनी सौदीत घुसखोरी केली तर या तेलसंपन्न देशासमोर मोठेच आव्हान उभे ठाकू शकेल. इस्लामिक स्टेट ही संघटना अफगाणिस्तानात पोहोचल्याच्या बातम्या आल्या तेव्हा सौदी अरेबियाचे शासक चिंतित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अण्वस्त्रांनी सज्ज होण्याचा विचार ते करू लागले आहेत.
सौदी व इराण हे देश दाखवण्यापुरते मित्र असले आणि इस्लामचा नारा बुलंद करत असले तरी त्यांच्यातील अरब आणि अजमची लढाई जगविख्यात आहे. इतकेच नाही तर शिय्या-सुन्नी वाद आणि इस्लामी देशांचे नेतृत्व करण्याची स्पर्धाही वाढताना दिसत आहे. या स्थितीत येनकेनप्रकारे आपले वर्चस्व टिकवून ठेवण्याचा सौदीचा प्रयत्न आहे. पण येथे मुख्य प्रश्न आहे की, सौदी हा देश अमेरिकेला सर्वात विश्वासू मित्र मानतो. मग तो अमेरिकेकडून अण्वस्त्रे खरेदी न करता पाकिस्तानकडून करण्याचा विचार का करत आहे? यावर कोणी म्हणेल की पाकिस्तान सौदीला स्वस्तात शस्त्रास्त्रे देऊ शकेल. सौदीसारख्या श्रीमंत देशासाठी स्वस्त किंवा महाग ही बाब दुय्यम होय. यामागे मुख्य बाब ही आहे की, अमेरिका सौदीला अण्वस्त्रे देऊ शकतो; पण अापली सेना देणार नाही. पाकिस्तान मात्र सौदीला आपली सेना आणि अण्वस्त्रे बनवण्यात निष्णात वैज्ञानिकही पुरवू शकतो. पाकिस्तान आणि सौदी हे दोन्हीही सुन्नी देश आहेत. त्यामुळे ते एकमेकांप्रती िवश्वासू आहेत. इराणच्या अणुधोरणामुळे सौदी चिंतित आहे. त्यामुळे इराणला प्रत्त्युत्तर देण्यासाठी सौदीला अण्वस्त्रे हवी आहेत. सौदी आणि पाकमध्ये यावरून गुप्त करार झाल्याचे म्हटले जात आहे. सौदी सरकारला ही घातक शस्त्रे मिळाली आहेत अथवा नाही, याविषयी गेल्या आठवड्यात न्यूयाॅर्क टाइम्समध्ये सौदीच्या राजकुमाराचे वक्तव्य प्रसिद्ध झाले होते. पश्चिमी देश इराणला अण्वस्त्रे देण्याविषयी ठाम असतील तर सौदीलाही आपल्या सुरक्षेविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानच्या अण्वस्त्र निर्मितीमध्ये सौदीने मोठी मदत केली होती, हे सा-या जगाला माहीत आहे. त्यामुळे तो पाककडून अण्वस्त्रे सहज मिळवू शकतो. तरीही सौदीने आजवर असा प्रयत्न केला नव्हता. पण आता सौदीची आतुरता सहज समजू शकेल. याचे मूळ कारण आखाती देशात उफाळून येत असलेला शिया-सुन्नी यांच्यातील संघर्ष हाच आहे.
गेल्या काही वर्षांपासून इराणच्या मार्गदर्शनाखाली शिया शक्ती एकवटताना दिसत आहेत. याचा परिणाम म्हणजे सौदीही आपले हातपाय पसरताना दिसत आहे. येमेन या देशातल्या शिया बंडखोरांच्या विरोधात सौदीने हवाई हल्ले केले आहेत. तो देश अल कायदा आणि इस्लामिक स्टेटला पडद्याआडून मदत करत असल्याचेही म्हटले जात आहे. आता जर पाकिस्तानकडून अण्वस्त्रे मिळाली तर त्यांचा वापर शिया-सुन्नी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होण्याची शक्यता अधिक आहे.
आखाती देशांमध्ये जेव्हापासून शिया-सुन्नी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आणि इराणच्या नेतृत्वाखाली शिया एकवटू लागले तेव्हापासून सौदीसुद्धा सुन्नींच्या समर्थनासाठी पुढे येऊ लागला आहे. पाकिस्तानने अण्वस्त्रे बनवल्यापासून ती चुकीच्या हाती पडण्याची भीती वेळोवेळी अनेक देशांनी व्यक्त केली आहे. भारतानेही हा मुद्दा अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला. आता ही अण्वस्त्रे तो सौदीला देणार नाही याची काय शाश्वती? पाकिस्तानी लोकसंख्येतील एका मोठ्या वर्गाला वाटते की पाकिस्तानने अणुबाँब बनवला आहे तो इस्लामच्या नावे जगात आपले वर्चस्व राखता यावे यासाठी. त्यामुळे कोणाच्या तरी दबावाखाली येऊन पाकिस्तान झुकेल असे मानणे चुकीचे होईल. .
पाकिस्तानी लष्करातील एक मोठा वर्ग हा काफीर आणि गैरमुस्लिमांना मोठ्यात मोठी सजा देण्याच्या मानसिकतेचा आहे. परवेझ मुशर्रफ हे पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत. अशा वातावरणात काय होईल, याचा अंदाज वर्तवणे कठीण नाही. भारत हा पाकपुढील पहिला शत्रू असू शकतो. पाकसारखा बेजबाबदार देश सौदीला सोबत घेऊन अमेरिकेसारख्या देशालाही शह देत आहे. पश्चिम आशियात यातून संघर्ष वाढेल. सौदीचे पेट्रो डाॅलर आणि पाकिस्तानची भांडखोर वृत्ती पश्चिम आशियासोबतच भारतीय उपखंडासाठीही धोक्याची आहे.
m_hussain1945@yahoo.com