आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Nikhil Wagale On CM Devendra Fadanvis

कॅलिडोस्कोप : प्रिय देवेंद्र फडणवीस...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ होर्डिंग्ज आणि पोस्टर्सवर ‘छत्रपती का आशीर्वाद’ असं म्हणून तो मिळत नाही. त्यासाठी शिवाजीराजांच्या मनातली कल्याणकारी राज्याची कल्पना अमलात आणावी लागेल. नव्या मुख्यमंत्र्यांकडे जनतेच्या अपेक्षा मांडणारे खुले पत्र...

राज्याचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून सूत्रं स्वीकारल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. एवढ्या तरुण वयात मुख्यमंत्री होण्याची संधी फारच थोड्या राजकारण्यांना मिळते. १९७८ मध्ये महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार आलं, तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार केवळ ३८ वर्षांचे होते. त्यानंतर तुमचाच नंबर लागेल. तुम्ही या संधीचा योग्य तो फायदा घ्याल आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण कराल अशी आशा आहे.
देवेंद्र, तुम्ही तरुण आहात, तडफदार आहात आणि तुमची प्रतिमाही स्वच्छ आहे. विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं तुम्ही नेटाने लावून धरली होती; पण विरोधी पक्षात काम करणं वेगळं आणि सत्ता राबवणं वेगळं. अलीकडेच माजी झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमाही स्वच्छ होती. किंबहुना आपल्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत या प्रतिमेला कोणताही डाग लागणार नाही अशीच त्यांची धडपड होती. पण त्यामुळे त्यांच्या हातून फारसं काही काम झालं नाही, अनेक फायली धूळ खात पडल्या, असा आरोप त्यांचेच सहकारी करत आहेत. स्वच्छ प्रतिमा आणि कार्यक्षमता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही दोन्हींचा मेळ घालाल अशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कारकीर्दीची सुरुवात उत्तम झाली, असं मी म्हणणार नाही. शपथविधीचा डामडौल टाळता आला असता, तर बरं झालं असतं. विरोधी पक्षात असताना तुम्ही सरकारी उधळपट्टीवर घणाघाती टीका केली होती. मग आता सत्तेत आल्यावरती भूमिका कशी काय बदलली? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार हा खर्च सरकारने नाही तर पक्षाने केला आहे. खर्च कुणीही करो, पैसे तर लागतातच. पक्षाकडे हे कोट्यवधी रुपये कुठून आले याचा कधीतरी हिशेब द्यावा लागेलच. शिवाय पैसे देणाऱ्यांनाही खुश ठेवावं लागेल. अशा देणग्या लोक निव्वळ प्रेमाने देत नाहीत, हे पंचवीस वर्षे राजकारणात काढल्यावर तुम्हाला निश्चितच ठाऊक असेल.

३१ ऑक्टोबरचा शपथविधीचा दिवसही टाळता आला असता तर बरं झालं असतं. ही सरदार पटेलांची जयंती आहे हे खरं, पण त्याहीपेक्षा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा हा मृत्युदिन आहे. दहशतवाद्यांनी त्यांची केलेली हत्या इतिहासात नोंदली गेली आहे. अशा दिवशी शपथविधीचा मुहूर्त साधून तुम्ही आणि तुमच्या पक्षानं नेमकं काय साधलं? इंदिराजी या केवळ काँग्रेसच्या नेत्या नव्हत्या, तर देशाच्या पंतप्रधान होत्या, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं होतं.

देवेंद्र, मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही नागपूरला जाऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांचं दर्शन घेतलं. त्याबरोबरच मुंबईत चैत्यभूमीला आणि नागपूरला दीक्षाभूमीलाही भेट दिली. हेडगेवार आणि गोळवलकरांना नमन केल्याबद्दल मी आक्षेप घेणार नाही. तो तुमचा बालपणीचा संस्कार आहे; पण मुख्यमंत्री म्हणून कुणाच्या विचाराने राज्य चालवायचं याचा निर्णय आता तुम्हाला घ्यावा लागेल. हेडगेवार- गोळवलकर गुरुजी यांचा आणि फुले- शाहू- आंबेडकरांचा विचार एक नाही हे भान तुम्हाला असेलच. महाराष्ट्राच्या परंपरेने फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार स्वीकारला आहे आणि त्या मार्गानेच तुम्हाला जावं लागेल.

शपथविधी होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने तुमच्या सरकारला पाठिंबा जाहीर केला. तुम्ही पाठिंबा मागितला नव्हतात हे खरं, पण नाकारलाही नाहीत. शिवसेनेने दबावाचं राजकारण केल्यास राष्ट्रवादीचे आमदार हाताशी राहू देत असा चतुर राजकारणी विचार तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी केला; पण तुम्हाला मतं देणाऱ्या जनतेला हे फारसं आवडलेलं नाही. भ्रष्टाचारी नेत्यांना, विशेषतः सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या अजित पवार यांच्यासारख्या पुढाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा तुम्ही केली होती. आता राष्ट्रवादीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्यावर तुमच्या या भ्रष्टाचार निर्मूलनाचं काय होणार हा प्रश्न लोकांना सतावतो आहे.

काही कळीच्या मुद्द्यांवर तुमच्या सरकारची कसोटी लागणार आहे. टोलचा प्रश्न आ वासून उभा आहे. टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन भाजपने दिलेलं नाही, असं तुमचे प्रवक्ते आता सांगत आहेत. पण तुमच्या अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात ही गर्जना केल्याचं मतदारांनी ऐकलं आहे. टोलच्या निमित्ताने महाराष्ट्राची लूट करण्यात आली आणि राजकारणी-कंत्राटदारांची एक अभद्र युती इथे थैमान घालू लागली. तिचा नायनाट तुम्हाला करावाच लागेल, अन्यथा घोर आश्वासन भंगाचा आरोप तुमच्यावर होऊ शकतो.

जे टोलबाबतीत तेच एलबीटी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत. व्यापारी आणि शेतकरी तुमच्या सरकारच्या निर्णयांकडे डोळे लावून बसले आहेत. याशिवाय एका वर्षात राज्य लोडशेडिंगमुक्त करण्याचं आश्वासन तुम्ही दिलं आहे. नरेंद्र मोदींपासून स्फूर्ती घेऊन राज्यात दहा स्मार्ट शहरं निर्माण करण्याचा वादाही तुमच्या जाहीरनाम्यात आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने काँग्रेस- राष्ट्रवादीपेक्षा ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन तुम्ही पूर्वीच दिलं होतं. मुंबई आणि राज्यातल्या महानगरांच्या विकासाबद्दल तुम्ही कोणतं धोरण स्वीकारता याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबईविषयीच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी एका सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा तुमचा निर्णय वास्तविक चांगला आहे; पण शिवसेनेने ‘हा मुंबई वेगळी करण्याचा डाव आहे’ असं म्हणून त्याला विरोध केला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती श्वेतपत्रिका काढून सुधारणार नाही याची जाणीव तुम्हाला असणारच. त्यासाठी खर्चाला कात्री आणि महसूल वाढवण्याचे कल्पक उपाय योजावे लागतील.

राइट टू सर्व्हिसचा कायदा करण्याचं सूतोवाच तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर केलं आहे. ही मूलतः अण्णा हजारेंच्या आंदोलनातली मागणी आहे. २००६ मध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवा नियमांबाबत अशा प्रकारचा कायदा मागच्या सरकारने केला आहे; पण तो निष्प्रभ ठरला आहे.

तुम्ही २०११ मध्ये राइट टू सर्व्हिसचं खासगी विधेयक मांडलं होतं. आता हा नवा कायदा करायचा असेल, तर जुन्या कायद्याचं काय होणार आणि नव्याची अंमलबजावणी प्रभावीपणे कशी होणार, हे तुम्हाला पटवून द्यावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाचखोरीचा रोग लागलेल्या सरकारी यंत्रणेला कामाला कसं लावायचं हे तुमच्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.

देवेंद्र, तुम्ही यशस्वी व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे; पण त्यासाठी तुम्हाला एक भान बाळगावं लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने भ्रष्टाचाराचे डोंगर रचले हे खरं, पण त्याहीपेक्षा भयंकर होता त्यांना आलेला सत्तेचा माज. जनता ही गुलाम आणि आपण मालक आहोत, असा समज त्यांनी करून घेतला होता. तुम्ही तुमच्या सहकारी मंत्र्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना या रोगापासून कसं दूर ठेवता यावर बरंच काही अवलंबून राहील. जनतेला पारदर्शक कारभार आणि उत्तरदायी सरकार हवं आहे.

शेवटी एकच. घरभेद्यांपासून जरा सावध राहा. राज्याचं गृहमंत्रिपद स्वतःकडे ठेवून तुम्ही भाजप नेत्यांना संदेश दिला आहे. यापैकी काही नेते एवढे आतुर झाले होते की निवडणूक प्रचारातच त्यांनी आपण गृहमंत्री होणार असं जाहीर केलं होतं. काही जणांना मुख्यमंत्रिपदाची आस लागली होती. ती अजूनही शमलेली नाही. राज्याचा मुख्यमंत्री बहुजन समाजातला असायला हवा होता, असे उद््गार तुमच्याच एका ज्येष्ठ सहकाऱ्याने काढले आहेत. या निमित्ताने बहुजन-दलितांमध्ये वेगळा संदेश पसरवण्याचा प्रयत्न होत आहे.

या सगळ्या संकुचितपणाच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य तुम्हाला निर्माण करावं लागेल. केवळ होर्डिंग्ज आणि पोस्टर्सवर ‘छत्रपती का आशीर्वाद’ असं म्हणून तो मिळत नाही. त्यासाठी शिवाजीराजांच्या मनातली कल्याणकारी राज्याची कल्पना अमलात आणावी लागेल. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे राज्य मराठा नव्हे, तर मराठी असेल असं निक्षून सांगितलं होतं. आज वेगळ्या संदर्भात त्याच मार्गावर पुढे चालण्याची सुवर्णसंधी तुम्हाला लाभली आहे. तिचं तुम्ही सोनं करावं ही शुभेच्छा.
घरभेद्यांपासून जरा सावध राहा. राज्याचं गृहमंत्रिपद स्वतःकडे ठेवून तुम्ही भाजप नेत्यांना संदेश दिला आहे. यापैकी काही नेते एवढे आतुर झाले होते की निवडणूक प्रचारातच त्यांनी आपण गृहमंत्री होणार असं जाहीर केलं होतं. काही जणांना मुख्यमंत्रिपदाची आस लागली होती. ती अजूनही शमलेली नाही.
nikhil.wagle23@gmail.com