आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निर्भय’ क्षेपणास्त्राचे यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ या सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या अलीकडील यशस्वी चाचणीने भारताच्या तांत्रिक क्षमतेची प्रचिती पुन्हा एकदा सा-या जगाला आली आहे. ही चाचणी म्हणजे देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या अत्याधुनिक अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राच्या सामिलीकरणामुळे भारतीय सैन्यदलांच्या मारक क्षमतेत बरीच वाढ होणार असून त्याचे सामिलीकरण भारताच्या राष्ट्रहितांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जसे महत्त्वाचे आहे. तसेच हे क्षेपणास्त्र भारताची आण्विक त्रयी (न्यूक्लियर ट्रायड) अधिक सक्षम करण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच यंदा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या उपस्थितीत पार पडणा-या प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतील संचलनात हे क्षेपणास्त्र प्रथमच सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) ‘निर्भय’ क्षेपणास्त्राच्या विकास कार्यक्रमावर गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. या क्षेपणास्त्राची १२ मार्च २०१३ रोजी पहिली चाचणी घेण्यात आली होती. पण त्यावेळी उड्डाणानंतर काही सेकंदांनी नियोजित मार्गापासून भरकटल्यामुळे क्षेपणास्त्र हवेत नष्ट करावे लागले होते. त्या चाचणीच्या अपयशाची कारणमीमांसा करून क्षेपणास्त्रातील त्रुटी दूर करण्यात आल्या आणि पुढील चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १७ ऑक्टोबर रोजी झालेली दुसरी चाचणी यशस्वी ठरली होती. ‘निर्भय’ हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. हे सब-सॉनिक क्षेपणास्त्र असल्याने त्याचा वेग आवाजाच्या वेगाच्या सुमारे ०.८ पट आहे. याच्या आरेखनामध्ये स्टिल्थ तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे शत्रूच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा व रडारला त्याचा सहजासहजी वेध घेता येत नाही. त्याचबरोबर शत्रूच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी हे क्षेपणास्त्र जमीन व पाण्यापासून अतिशय कमी उंचीवरून उडते. थोडक्यात, अगदी एखाद्या झाडाच्या उंचीवरून किंवा समुद्राच्या पृष्ठभागापासून काहीच मीटर उंचीवरून ते उडू शकते. हे क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने डागल्यानंतर आवश्यकतेनुसार त्याच्या मार्गात नियंत्रण कक्षातून बदल करणे शक्य आहे. त्या वेळी अत्याधुनिक दळणवळणाच्या सुविधांमुळे उपग्रहावर आधारित जीपीएस यंत्रणेद्वारे त्याला दिशादर्शन करता येणे शक्य झाले आहे.

ब्रह्मोसनंतर ‘निर्भय’ हे भारताचे वैशिष्ट्यपूर्ण क्षेपणास्त्र असणार आहे. सुमारे ६ मीटर लांबीच्या ‘निर्भय’ला विमान, युद्धनौका, पाणबुडी, जमीन असे कोठूनही डागता येणे शक्य आहे. त्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या विकसित करण्यात येत आहेत. सध्या एकाचवेळी या विविध आवृत्त्यांवर काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व आवृत्त्यांचा पल्ला ७०० ते १००० किलोमीटरपर्यंत असणार आहे. ‘निर्भय’ चलित प्रक्षेपकावरून (मोबाइल लाँचर) डागता येणारे क्षेपणास्त्र असल्याने त्याचा पल्ला अप्रत्यक्षपणे वाढलेला आहे. ‘निर्भय’वरून एक टन वजनाची स्फोटके वाहून नेता येतात. या क्षेपणास्त्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावरून २४ प्रकारची वेगवेगळी स्फोटके वाहून नेता येतात. प्रत्येक मोहिमेच्या स्वरूपानुसार यावर कोणती स्फोटके बसवायची हे ठरवता येते. ‘निर्भय’ अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र म्हणूनही उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय हवाई दलासाठी ‘निर्भय’ची खास आवृत्ती विकसित करण्यात येत आहे. सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानावर ‘निर्भय’ बसवण्याची हवाई दलाची योजना आहे. त्यामुळे याच्या १७ ऑक्टोबरच्या चाचणीवर हवाई दलाचेही बारीक लक्ष होते. हवाई दलाची आवृत्ती अन्य आवृत्त्यांच्या मानाने आकाराने लहान आणि वजनाने हलकी ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे हवाई दलाच्या ‘निर्भय’मध्ये बुस्टरला दूर करण्यात येणार आहे. ते क्षेपणास्त्र विमानातून डागले जाणार असल्याने त्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जावे लागणार नाही. परिणामी त्याला बुस्टरचीही आवश्यकता राहणार नाही. हवाई दलाच्या आवृत्तीचा पल्लाही अन्य आवृत्त्यांपेक्षा जास्त म्हणजे १५०० किलोमीटर असणार आहे. ‘निर्भय’ द्विस्तरीय क्षेपणास्त्र आहे. ‘निर्भय’ क्षेपणास्त्र सुरुवातीला रॉकेटप्रमाणे हवेत सरळ रेषेत झेपावते. त्या वेळी घन इंधनावर चालणा-या बुस्टरच्या मदतीने हे क्षेपणास्त्र वेगाने १०० मीटर उंचीपर्यंत जाते आणि क्षेपणास्त्राचे बुस्टर आपोआप गळून पडले की, क्षेपणास्त्राचा मार्ग जमिनीला समांतर होतो. त्यानंतर दुस-या टप्प्यात लगेचच क्षेपणास्त्रावर बसविलेले पंख उघडतात आणि त्याच वेळी क्षेपणास्त्राचे टर्बोप्रॉप इंजिनही चालू होते. टर्बोप्रॉप इंजिनामुळे क्षेपणास्त्राला अपेक्षित गती मिळण्यास मदत होते. त्याच वेळी पंखांच्या सहाय्यानेच ‘निर्भय’ला एखाद्या विमानाप्रमाणे संचार करणे शक्य होते. हे क्रूझ क्षेपणास्त्र असल्यामुळे लक्ष्याच्या दिशेने जात असताना मार्गात येणा-या अडथळ्यांना पार करणेही त्याला शक्य होते. लक्ष्यापर्यंत पोहोचल्यावर त्याच्यावर घोंगावत राहण्याची आणि योग्य वेळी अचूक मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.

हवाई दलाच्या आवृत्तीचे कार्य काहीसे वेगळे असणार आहे. विमानातून डागल्यावर ‘निर्भय’ इतर बॉम्बप्रमाणे वेगळे होईल. आधी खालच्या दिशेने जात विमानापासून थोडे लांब गेल्यावर त्याचे टर्बोप्रॉप इंजिन प्रज्वलित होईल आणि ते क्षेपणास्त्र त्वरित लक्ष्याच्या दिशेने झेपावेल.
‘निर्भय’ हे शत्रुच्या नजरेत न येता जमिनीवरील लक्ष्याचा अचूक वेध घेणारे क्षेपणास्त्र आहे. पाकिस्तानचे बाबर हे ‘निर्भय’च्या श्रेणीतील क्षेपणास्त्र आहे. मात्र त्याच्यापेक्षा ‘निर्भय’ अधिक आक्रमक आहे. नौदलासाठी विकसित करण्यात येणारे ‘निर्भय’ युद्धनौका आणि पाणबुड्यांवरूनही डागले जाणार आहे. त्यावेळी हे क्षेपणास्त्र समुद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळून मार्गक्रमण करणार असल्यामुळे दूरवरून त्याचा शोध घेणे अशक्य होणार आहे. ‘निर्भय’चे प्रामुख्याने अमेरिकेच्या टॉमाहॉक क्षेपणास्त्राशी साधर्म्य असल्याचे मानले जाते.
‘निर्भय’वर बसवलेल्या आधुनिक नियंत्रण प्रणालीमुळे क्षेपणास्त्र उडत असताना त्यावर नियंत्रण ठेवणेही शक्य झाले आहे. त्याच वेळी नियोजित लक्ष्याच्या ठिकाणी जर एकसारखी अनेक लक्ष्ये असतील, तर त्यातील अचूक लक्ष्य निवडून त्यावर मारा करण्याचीही क्षमता ‘निर्भय’मध्ये आहे. त्या सर्व मोहिमेत त्याला जमिनीवरील किंवा युद्धनौकेवरील नियंत्रण कक्षातून मार्गदर्शन करता येते.
हवाई दलाच्या बाबतीत ही जबाबदारी संबंधित लढाऊ विमान पार पाडू शकते.
‘निर्भय’ अगदी झाडाएवढ्या उंचीवरूनही उडू शकते. त्यामुळे शत्रुसैन्याच्या नजरेपासून दूर राहण्यास क्षेपणास्त्राला मदत होते. भारताचे अशा प्रकारचे हे पहिलेच स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. ‘निर्भय’च्या भूदल आवृत्तीच्या दोन चाचण्या सध्या पार पडलेल्या आहेत. भविष्यात आणखी काही चाचण्या झाल्यावर ते पुढील ३ वर्षांमध्ये भूदलाकडे सोपवण्यात येणार आहे. त्यानंतर थोड्याच काळात नौदल व हवाई दलाकडेही ते सोपविले जाईल. आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळात भारताच्या राष्ट्रहिताचा विस्तार जगाच्या विविध भागांमध्ये झालेला आहे. अशा वेळी भारताच्या परराष्ट्र धोरणातही बदल झालेले पाहायला मिळत आहेत. परिणामी आपल्या राष्ट्रहिताच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्यदलांनी आपल्या कार्यपद्धतीत वाढ करून कमीत कमी वेळेत संबंधित ठिकाणी पोहोचण्याची क्षमता मिळवलेली आहे. भारताच्या राष्ट्रहिताच्या संरक्षणाच्या हेतूने या क्षमतेला अतिशय महत्त्व आले आहे. आज भारताच्या युद्धनौका, पाणबुड्या विविध देशांमधील बंदरांना वरचेवर भेटी देऊ लागलेल्या आहेत. अशा वेळी त्यांच्यावर तैनात करण्यात येणा-या ‘निर्भय’सारख्या क्षेपणास्त्राचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. कारण सुमारे दीड हजार किलोमीटर दूरवर वसलेल्या शत्रूच्या ठिकाणावर पारंपरिक शस्त्रे वा अण्वस्त्रांच्या मदतीने हल्ला चढवण्याची क्षमता भारतीय सैन्यदलांना ‘निर्भय’मुळे प्राप्त होणार आहे. त्या वेळी भारताच्या युद्धनौका, पाणबुड्या, लढाऊ विमानांना शत्रूच्या प्रदेशाच्या जवळ जाण्याचीही आवश्यकता राहणार नाही. पोखरण येथील मे १९९८च्या अणुचाचण्यांनंतर भारताने आपल्या आण्विक धोरणाची अधिक सुस्पष्ट मांडणी केली. त्याची तत्त्वेही निश्चित केली होती. त्यातील एका तत्त्वात स्पष्ट करण्यात आले आहे की, भारत जमीन, हवा व समुद्र असे कोठूनही अण्वस्त्र डागण्याची क्षमता कायम स्वतःजवळ बाळगेल. त्यामुळे ‘निर्भय’ची तैनाती भारताच्या त्या तत्त्वाची पूर्तता करणारी आणि आण्विक त्रयीला पूरक ठरणारी घटना असणार आहे.